मुंबई : (Maharashtra Health Department Recruitment) " पदभरतीची प्रक्रिया या आठवड्यात वेगाने राबविण्यात येणार असून पाच हजार नव्या पदांना मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे राज्यातील आरोग्य विभागातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी हा निर्णय झाला आहे. तसेच आजच्या डॉक्टर्स दिनी १,४०० डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात येत आहेत. त्यानंतर आणखी ६०० डॉक्टरांची भरती केली जाणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १,९०० सीएचओ पदेही लवकरच भरली जातील." अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत बुधवार दि.१ रोजी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री आबिटकर बोलत होते.या प्रश्नावर सदस्य विजय वडेट्टीवार, देवराव भोंगळे, डॉ. ज्योती गायकवाड, संजय मेश्राम, अजय चौधरी, सुलभा खोडके आदी सदस्यांनी उपप्रश्न विचारले.(Maharashtra Health Department Recruitment)
मंत्री आबिटकर म्हणाले की, "अनेक ठिकाणी रुग्णालयांच्या इमारती पूर्ण झाल्या असल्या तरी डॉक्टर व इतर मनुष्यबळाअभावी सेवा सुरू होऊ शकल्या नव्हत्या. आता नव्या पदमान्यतेमुळे आणि डॉक्टरांच्या नियुक्त्यांमुळे राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये आवश्यक मनुष्यबळ, उपकरणे आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.राज्यातील रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने आवश्यक निर्णय घेतले असून या आठवड्यात भरती प्रक्रियेला गती दिली जाईल."(Maharashtra Health Department Recruitment)
"रुग्णालयांच्या बांधकामांबाबत शासनाने प्राधान्यक्रम निश्चित केला असून ५०, ७०, ७५ आणि ९० टक्के पूर्ण झालेल्या प्रकल्पांना प्राध्यान्याने निधी देण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींसाठी केंद्र शासनाच्या निकषांनुसार निधी उपलब्ध होत असला तरी आवश्यकतेनुसार निधी वाढविण्याबाबत समिती स्थापन करून आढावा घेतला जाईल. कोरोना काळात सेवा बजावलेल्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांची प्रलंबित देयके असल्यास ती प्राधान्याने अदा करण्यात येतील." असेही मंत्री आबिटकर यांनी सांगितले.(Maharashtra Health Department Recruitment)