गोकुळची रणधुमाळी वाढली, ठराव किती त्यावर ठरणार विजयाची शिट्टी

    01-Jul-2026
Gokul Election
 
मुंबई : (Gokul Election) गोकुळच्या निवडणुकीत पुन्हा एकदा ट्विस्ट आला असून माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी त्यांचे जुने सहकारी अरुण नरके यांच्यासोबत एकाच गाडीतून भाजपच्या मेळाव्यास हजेरी लावली. यामुळे गोकुळ निवडणुकीची रणधुमाळी वाढली आहे. महादेव महाडिक म्हणजे आप्पा यांची विजयाची शिट्टी भाजपच्या साथीने गोकुळमध्ये वाजणार का हे येणारा काळात कळेल. ठराव किती त्यावर विजयाची शिट्टी ठरणार आहे.
 
जवळपास २५ वर्षांपेक्षा जास्त काळ महादेव महाडिक, अरुण नरके आणि पी. एन. पाटील या तिघांनी मिळून गोकुळवर सत्ता मिळवली होती. जिल्ह्यात यास म. न. पा. पॅटर्न म्हणून ओळखले गेले होते. म. म्हणजे महाडिक न. म्हणजे नरके आणि पा. म्हणजे पाटील असे हे समीकरण होते.यातील अरुण नरके हे काही काळापूर्वी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यासोबत होते. आता मात्र त्यांनी महायुतीसोबत संधान बांधले आहे.२०२१ साली झालेल्या निवडणुकीत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी २१ पैकी १७ जागा जिंकत सत्ता मिळवली होती तर महादेवराव महाडिक गटाला केवळ चार जागा मिळाल्या होत्या.(Gokul Election)
 
तब्बल ३० वर्षानंतर त्यावेळी सत्तांतर झाले होते.आताच्या निवडणुकीसाठी चित्र वेगळे असून मंत्री हसन मुश्रीफ महायुतीत आहेत तर सतेज पाटील विरोधी आघाडीत त्यामुळे आता समीकरण पूर्णपणे बदलले आहे. बोगस दूध संस्था, आवसानयानातील दूध संस्था यावर काही दिवसांपासून प्रकाश बेलवाडे आणि आमदार शिवाजी पाटील यांनी रान उठवले होते.त्यामुळे सुद्धा गोकुळची निवडणूक चर्चेत होती. सध्या गोकुळ वर प्रशासक आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर मात्र ठराव गोळा करण्यासाठी जिल्ह्यातील नेते कामाला लागले आहेत.सोमवार दि.२९ पर्यंत महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मंत्री हसन मुश्रीक यांच्या नेतृत्वात सर्वाधिक १९०० ठराव, शिवसेनेतर्फे मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वात १५२५ तर भाजपतर्फे माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली १४३० ठराव दाखल करण्यात आले आहेत.(Gokul Election)
 
काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार दि.३० रोजी राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीमार्फत १८५१ दूध संस्थांचे ठराव दाखल केले. तर राधानगरी येथील ए. वाय.पाटील यांनी मंगळवार दि.३० रोजीच स्वतंत्रपणे २०४ ठराव दाखल केले आहेत.म्हणजे ए.वाय. पाटील मागील काळात सतेज पाटील यांच्यासोबत होते.सध्या ते ना महायुतीकडे ना सतेज पाटील यांच्या पॅनल मध्ये आहेत.गोकुळ निवडणुकीत एक एक ठरावास महत्त्व असते.त्यामुळे स्वतंत्र ठराव असल्याने त्यांचे महत्व वेगळेच असणार आहे.तर शिवसेनेच्या ठराव धारकांच्या मेळाव्यात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी गोकुळ निवडणूक बिनविरोध व्हावी असा प्रस्ताव ठेवला होता.पण सध्याची रणधुमाळी पाहता निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे.(Gokul Election)
 
सध्या आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी सौ .शौमिका अमल महाडिक या गोकुळची खिंड महाडिक गटातर्फे लढवत आहेत. भाजपने यावेळी पहिल्यांदाच गोकुळच्या निवडणुकीत लक्ष घातल्याचे पहावयास मिळत आहे. एकूणच पुढे काय होते ते संपूर्ण चित्र लौकरच स्पष्ट होईल.(Gokul Election)
 
"महायुतीत एकत्र गोकुळची निवडणूक लढवण्याची आम्ही घोषणा केली आहे.आम्ही आज ठराव सादर केले.अजून काही ठराव सादर होतील. ठराव गोळा करण्यात भारतीय जनता पक्ष आणि जनस्वराज्य हे महायुतीत मोठा भाऊ राहतील असे मी आवर्जून म्हणेन." अशी प्रतिक्रिया भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी माध्यमांशी बोलताना सोमवार दि.२९ रोजी दिली.(Gokul Election)
 
 
 




संबंधित मजकूर