राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त : हृदयोपचारांतून मानवसेवेचे व्रत अंगीकारलेले डॉ. गजानन रत्नपारखी

    01-Jul-2026
 
Dr Gajanan Ratnaparkhi
 
डॉक्टर’ या शब्दाचे वलय केवळ ‘रोगांवर उपचार करणारी व्यक्ती’ एवढेच मर्यादित नसून, डॉक्टर हे अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरणही ठरतात. रुग्णांना होणारा त्रास, त्यांच्या वेदनांकडे अतिशय संवेदनशीलतेने बघून, त्यावर योग्य ते उपचार करून, जीवनदान देणारे देवदूत म्हणजे डॉक्टर! असेच एक सेवाभावी, संवेदनशील आणि समर्पित डॉक्टर म्हणजे मुंबईतील ज्येष्ठ ‘इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट’ डॉ. गजानन रत्नपारखी.
 
यवतमाळ जिल्ह्यातील वणी या छोट्याशा गावात गजानन रत्नापारखी यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच अभ्यासात ते हुशार होते. डॉ. रत्नपारखी यांनी शिष्यवृत्त्या मिळवत, आपला शैक्षणिक आलेख कायम उंच ठेवला. ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ या उक्तीनुसार समाजसेवेचे माध्यम म्हणून त्यांनी वैद्यकीय क्षेत्राची निवड केली आणि ‘एमबीबीएस’, तसेच ‘एमडी (मेडिसिन)’ पदवी प्राप्त केली. त्यानंतर ‘डीएम कार्डिओलॉजी’च्या प्रवेश परीक्षेत देशभरातून सहावा क्रमांक पटकावून, त्यांनी आपल्या गुणवत्तेचा परिचय करून दिला.
 
मुंबईतील ‘ग्रँट मेडिकल कॉलेज’मधून त्यांनी ‘हृदयरोगशास्त्रा’चे उच्च शिक्षण घेतले, तर जर्मनीतील फ्रँकफर्ट येथे अत्याधुनिक एन्जिओप्लास्टी तंत्राचे प्रशिक्षण पूर्ण केले. ‘लीलावती’, ‘नानावटी’ आणि ‘होली स्पिरिट’सारख्या नामांकित रुग्णालयांमधील दांडग्या अनुभवाने त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. डॉ. रत्नपारखी यांनी २००५ साली अंधेरी येथे ‘गुरुकृपा हार्ट सेंटर’ची स्थापना केली. अल्पावधीतच अंधेरीतील पहिले ‘आयएसओ ९००१ : २०००’ प्रमाणित ‘हृदयरोग उपचार केंद्र’ म्हणून या संस्थेने एक वेगळी ओळख निर्माण केली. तसेच जुहू येथील ‘क्रिटिकेअर एशिया हॉस्पिटल’च्या ‘कॅथ लॅब’च्या स्थापनेतही डॉ. रत्नपारखी यांचे योगदान उल्लेखनीय असेच.
 
काही दशकांच्या आपल्या व्रतस्थ वैद्यकीय सेवेत डॉ. रत्नपारखी यांनी तीन लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार केले असून, २६ हजारांपेक्षा अधिक ‘इंटरव्हेन्शनल कार्डिअ‍ॅक’ प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. पण, त्यांचे कार्य एवढ्यापुरतेच मर्यादित नाही. ‘गुरुकृपा हार्ट फाऊंडेशन’च्या माध्यमातून ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोफत आणि सवलतीच्या दरात वैद्यकीय सेवाही उपलब्ध करून दिली जाते. आरोग्य शिबिरे, आणि प्रतिबंधात्मक आरोग्य उपक्रमांद्वारे जनजागृतीचे कार्यक्रमही हाती घेतले जातात. ’मिशन फिट इंडिया, हिट इंडिया, डिफीट डायबिटिज अ‍ॅण्ड हायपरटेन्शन’ हा डॉ. रत्नापारखी यांचा विशेष उपक्रमही त्याच विचारांची पुढची पायरी म्हणता येईल. "रोगावर वेळेवर निदान, रुग्णाची नियमित तपासणी आणि आरोग्यपूर्ण जीवनशैली या त्रिसूत्रीचा संगम साधल्यास, अनेक गंभीर आजारांवर मात करता येऊ शकते,” असा संदेश या माध्यमातून डॉ. रत्नापारखी देतात.
 
आरोग्य क्षेत्राच्या पलीकडेही डॉ. रत्नपारखी यांनी सामाजिक बांधिलकीचे व्रत जोपासले आहे. गेल्या १३ वर्षांपासून १३ शाळांमधील सुमारे ३ हजार, ५०० गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्याचे वाटप त्यांच्या माध्यमातून केले जाते. तसेच आदिवासी भागात सेवा उपक्रम, नैसर्गिक आपत्तीच्या काळातील मदतकार्य आणि समाजातील वंचित घटकांच्या कल्याणासाठी उचललेली पावलेही डॉ. रत्नपारखी यांच्या संवेदनशीलतेचीच साक्ष देणारी. कराड आणि सांगली येथील महापुरावेळी त्यांनी मदतकार्यांचे नेतृत्व करून, हजारांहून अधिक रुग्णांना वैद्यकीय सेवा आणि प्रभावित कुटुंबांना मदतीचा हात दिला. २०२४ मध्ये ‘रस्ता सुरक्षा जनजागृती’ उपक्रमांतर्गत हजारांहून अधिक गरजू नागरिकांसाठी मोफत नेत्रतपासणी आणि चष्मावाटप उपक्रम राबविण्यात आला.
 
डॉ. रत्नपारखींचे कार्यकौशल्य केवळ वैद्यकीय क्षेत्रापुरतेच मर्यादित नाही, तर त्यांनी साहित्य क्षेत्रातही मुशाफिरी केली आहे. डॉ. रत्नपारखी हे एक संवेदनशील कवी, लेखक आणि प्रभावी वक्तेही आहेत. त्यांच्या ‘दूर माझे घर’ या मराठी कवितासंग्रहाने, तसेच हृदयविकार प्रतिबंधावरील पुस्तकांनी समाजात आरोग्यविषयक जागृती निर्माण करण्याचे मोलाचे काम केले. विविध वैद्यकीय संघटनांमधील नेतृत्व आणि ‘अखिल भारतीय दैवज्ञ समाज परिषदे’चे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून डॉ. रत्नपारखी यांचे सामाजिक योगदानही वाखाणण्याजोगे असेच.
 
हजारो हृदयांचे ठोके सुरळीत ठेवताना समाजाच्या हृदयातही माणुसकीची धडधड कायम ठेवणारे डॉ. गजानन पी. रत्नपारखी हे वैद्यकीय सेवेला लाभलेले एक रत्नच! आज ‘राष्ट्रीय डॉक्टर्स दिना’निमित्त डॉ. रत्नपारखी यांच्या कार्याचा केलेला हा सन्मान, केवळ त्यांचा वैयक्तिक गौरव नव्हे, तर वैद्यकीय क्षेत्रातील करुणा, समर्पण आणि मानवतेच्या मूल्यांचाही हा यथोचित गौरव आहे.




संबंधित मजकूर