उद्धव ठाकरेंचा अहंकार आणि सकाळच्या बोलबच्चनमुळे पक्षाची ही अवस्था;मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

    01-Jul-2026   
Chandrashekhar Bawankule
 
मुंबई : (Chandrashekhar Bawankule) उद्धव ठाकरेंच्या पक्षाची ही अवस्था त्यांच्या अहंकारामुळे आणि सकाळच्या बोलबच्चनमुळे सुरु आहे. कुणालाही पक्षाची काळजी नाही, फक्त सकाळी पत्रकार परिषद घ्यायची एवढेच सुरु आहे. विचारसरणीच विकली गेल्याने हे परिणाम आहेत. भाजपशी युती तोडणे, हिंदुत्वाशी फारकत घेणे आणि काँग्रेसचा आणि तुष्टीकरणाचा विचार स्विकारणे यातूनच सगळे घडले आहे, अशी टीका महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
 
उबाठा गटाचे आ. सचिन अहिर यांनी मंगळवारी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून उपसभापती पदाचा अर्ज दाखल केला असून ते शिवसेनेत प्रवेशही करणार आहेत. यावर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली. विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "केवळ भाषण आणि उपरोधिक टीका करून लोकांना हिणवणे, देशाच्या पंतप्रधानांबद्दल खालच्या भाषेत बोलणे हे न करता उद्धव ठाकरेंनी स्वत:चे घर सांभाळले पाहिजे. त्यांचे चांगले चांगले शिलेदार त्यांना सोडून जात आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आपल्या भविष्याची काळजी केली पाहिजे.
 
शिवसेनेत अंतर्गत गटबाजीची चाहूल लागली होती तेव्हा त्यांनी फिरण्याची गरज होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे मंत्री असताना योग्य पद्धतीने खासदार, आमदारांना भेटून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले असते तर एवढा मोठा स्फोट झाला नसता. उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद जनादेशाच्या बाहेर होते पण, एक मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी त्यांनी विचारसरणीची बरबादी केली आणि महाराष्ट्राचा जनादेश तोडला. त्यामुळे हे त्याचे परिणाम असून त्यांना भोगावे लागतील."
 
यापेक्षा मोठा धक्का काय?
 
ते पुढे म्हणाले की, "सचिन अहिर यांचे जाणे म्हणजे उद्धव ठाकरेंना गंभीर धक्का आहे. यापेक्षा अजून मोठे काय हवे? आता फक्त आदित्य ठाकरे जायचे राहिलेत. अहंकारी भाषा वापरूनच उद्धव ठाकरेंचा पक्ष लयास गेला आहे. त्यामुळे त्यांनी आणि त्यांच्या लोकांनी अहंकार सोडला पाहिजे. शिवसेनेच्या या ऑपरेशनमध्ये आमचा काहीही संबंध नाही. एकनाथ शिंदे त्यांचा पक्ष वाढवतील आणि उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष सांभाळतील."
 
'ही' तर घराणेशाही
 
"उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यवतमाळमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी वाईट वागले. हे संजय देशमुख यांचे लोक असून त्यांना जवळ येऊ देऊ नका, अशी त्यांची अवहेलना केली. त्यामुळे तुम्ही जवळ आलेल्या कार्यकर्त्याला लाथ मारून हाकलत असल्यास कार्यकर्ते काय करतील? २०१९ मध्ये तुम्ही जनादेश आणि बाळासाहेबांचे विचार पाळले असते तर, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री झाले असते. एकनाथ शिंदेसुद्धा उपमुख्यमंत्री होऊ शकले असते. चांगल्या पद्धतीने सरकार चालले असते. महानगरपालिका असती. पण तुम्ही स्वत:च पदावर बसून मुलाला मंत्री केले. ही घराणेशाही असून जो घराणेशाही करेल तो बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही," असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.(Chandrashekhar Bawankule)
 
 





अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर