बांधकामस्थळांवरील हवा गुणवत्ता यंत्रांची आता 'थर्ड पार्टी'कडून पडताळणी; पालिकेची १३.०७ कोटींची निविदा

    01-Jul-2026
BMC Air Quality Audit
 
मुंबई : (BMC Air Quality Audit) मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शहरातील विविध बांधकामस्थळांवर बसविण्यात आलेल्या सेन्सर-आधारित हवा गुणवत्ता देखरेख यंत्रांच्या कार्यक्षमतेची त्रयस्थ संस्थेमार्फत (थर्ड पार्टी) पडताळणी करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने सुमारे १३.०७ कोटी रुपये खर्चाची ऑनलाइन ई-निविदा प्रसिद्ध केली आहे.
 
मुंबईतील धूळ आणि प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी विकासकांना बांधकामस्थळांवर हवा गुणवत्ता देखरेख यंत्रे बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, ही यंत्रे योग्य प्रकारे कार्यरत आहेत का आणि त्यांच्याकडून मिळणारी माहिती अचूक आहे का, याची स्वतंत्र तपासणी करण्याची आवश्यकता होती. त्यासाठी आता त्रयस्थ संस्थेमार्फत या यंत्रांचे ऑडिट करण्यात येणार असून, त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेबाबत पारदर्शक अहवाल उपलब्ध होणार आहे. (BMC Air Quality Audit)
 
या ऑडिटमुळे महापालिकेला हवेच्या गुणवत्तेबाबत अधिक विश्वासार्ह आणि अचूक माहिती मिळेल. तसेच बांधकामस्थळांवर वायू प्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन होत आहे की नाही, यावर अधिक प्रभावीपणे देखरेख ठेवता येणार आहे. चुकीची किंवा दिशाभूल करणारी आकडेवारी दर्शविणारी सदोष यंत्रे तातडीने बदलण्याची प्रक्रियाही सुलभ होईल. परिणामी, प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा आहे. (BMC Air Quality Audit)
 
या कामासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली असून, इच्छुक अनुभवी संस्था आणि कंत्राटदारांना महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत ई-प्रोक्युअरमेंट पोर्टल तसेच मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून निविदा दस्तऐवज डाउनलोड करता येणार आहेत. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी कार्यालयीन वेळेत कार्यकारी अभियंता (पर्यावरण आणि हवामान बदल)-२, घाटकोपर (पूर्व) कार्यालयाशी संपर्क साधावा, असे पर्यावरण विभागाने स्पष्ट केले आहे. (BMC Air Quality Audit)
 
 
 




संबंधित मजकूर