मुंबई : (Bangladesh Hindu Student Kidnapped) बांगलादेशातील हिंदूंवरील कथित अत्याचाराच्या घटनांमध्ये आणखी एका प्रकरणाची भर पडल्याचे निदर्शनास आले आहे. ढाका येथील वारी परिसरातून एका हिंदू विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याचा काही अज्ञात व्यक्तींकडून छळ करण्यात आल्याचा आरोप आहे. मंदिरात अधूनमधून सहाय्यक पुजारी म्हणून सेवा देणाऱ्या या विद्यार्थ्याकडून खंडणीचीही मागणी करण्यात आल्याचे सांगण्यात येते आहे. २५ वर्षीय सुभाष देउरी याच्यावर ढाका मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा काही अज्ञात व्यक्तींनी सुभाष देउरी यांना लक्ष्य केले. देउरी हा जुन्या ढाका परिसरातील सेंट्रल लॉ कॉलेजमध्ये प्रथम वर्षाचा विद्यार्थी असून, तो जगन्नाथ विद्यापीठाच्या मुख्य मंदिरात अधूनमधून सहाय्यक पुजारी म्हणूनही सेवा देतो. मात्र, त्याला त्याच्या धार्मिक ओळखीमुळे लक्ष्य करण्यात आल्याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. देउरी यांच्या नातेवाईकांनी सांगितले की, सुभाष देउरी रिक्षाने स्वामीबाग परिसरात पोहोचले असता त्यांचे अपहरण करण्यात आले. मंगळवारी सकाळी ते अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या रूममेटशी संपर्क साधला. रूममेटने त्यांना ढाका मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल केले. (Bangladesh Hindu Student Kidnapped)
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, एका अज्ञात व्यक्तीने फोन करून २६ हजार बांगलादेशी टक्यांची खंडणी मागितली होती. अपहरणकर्त्यांपैकी एका व्यक्तीने पैसे पाठवण्यासाठी एक मोबाईल क्रमांक दिला. त्या क्रमांकाशी संबंधित खात्यात २६ हजार टके जमा केल्यानंतर सुभाष देउरी यांना जुन्या ढाका परिसरातील एका रस्त्यावर सोडून देण्यात आले. देउरी यांच्या पायाचे आणि नितंबाजवळील हाड मोडले असून, सध्या उपचार सुरु आहेत. पोलीस देखील संबंधित प्रकरणाचा तपास घेत आहेत. (Bangladesh Hindu Student Kidnapped)
तो मंदिराचा कायमस्वरूपी पुजारी नाही
जगन्नाथ विद्यापीठाच्या केंद्रीय मंदिर समितीचे सदस्य सचिव अनिक कुमार दास यांनी स्पष्ट केले की, सुभाष देउरी हे मंदिराचे कायमस्वरूपी पुजारी नाहीत. मंदिराचे नियमित पुजारी सैकत पाठक आहेत. त्यांच्या अनुपस्थितीतच सुभाष देउरी अधूनमधून धार्मिक विधी पार पाडत असत. या घटनेचा मंदिराशी थेट संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले असून, यासंदर्भात मंदिराच्या फेसबुक पेजवर स्पष्टीकरणही प्रसिद्ध करण्यात आले आहे. (Bangladesh Hindu Student Kidnapped)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक