मुंबई : (125-Year-Old Gurdwara Demolished in Pakistan) अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्थळांच्या संरक्षणात निष्काळजीपणा केल्याचा पाकिस्तान सरकारवरील आरोप पुन्हा एकदा समोर आला आहे. पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतात सुमारे १२५ वर्षे जुन्या 'गुरुद्वारा श्री सिंह सभा' या ऐतिहासिक गुरुद्वाराचा काही भाग पाडल्याने अल्पसंख्याकांमध्ये संतापाची लाट उसळली. समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये गुरुद्वाराचा काही भाग मलब्यात रूपांतरित झाल्याचे दिसत आहे. हा गुरुद्वारा पाकिस्तानातील ऐतिहासिक वारसा स्थळांपैकी एक मानला जात होता.
या घटनेनंतर पाकिस्तानकडून जुन्या हिंदू व शीख वारसा स्थळांना आणि ऐतिहासिक नावांना जतन करण्याच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. काही काळापूर्वी पाकिस्तानमधील काही रस्ते व इमारतींची जुनी हिंदू नावे पुन्हा बहाल करण्याच्या उपक्रमाचे सांस्कृतिक वारशाचा सन्मान म्हणून स्वागत करण्यात आले होते. मात्र, गुरुद्वाराच्या पाडकामाच्या घटनेमुळे ऐतिहासिक धार्मिक वारशाच्या संरक्षणाबाबत पाकिस्तानच्या भूमिकेवर टीका होत आहे.
गुरुद्वाराचा काही भाग पाडल्याच्या घटनेनंतर जगभरातील शीख समाजाने या प्रकाराचा निषेध व्यक्त केला आहे. पाकिस्तानातील शीख नागरिकांनीही या कारवाईला विरोध केला. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने संबंधित जागा सील केली असून, पुढील कोणतेही बांधकाम किंवा पाडकाम करण्यास तात्पुरती बंदी घातली आहे. (125-Year-Old Gurdwara Demolished in Pakistan)
अशी माहिती आहे की, सुमारे चार वर्षांपूर्वी भूमाफियांनी गुरुद्वाराचा मुख्य घुमट पाडल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी या घटनेचे व्हिडिओही सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाले होते. शीख समाजाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, त्यावेळी पोलिसांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, इव्हॅक्यूई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड तसेच पाकिस्तान शीख गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटी यांनी या ऐतिहासिक धार्मिक स्थळाच्या संरक्षणासाठी ठोस पावले उचलली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विरोधानंतर पाडकाम थांबवले
घटनेची माहिती मिळाल्यानंतर शीख समाजातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी आंदोलन केले. त्यानंतर प्रशासनाने पाडकाम थांबवून संबंधित परिसर सील केला. त्यामुळे पुढील कोणत्याही प्रकारचे बांधकाम किंवा तोडफोड रोखण्यात आली. मात्र, तोपर्यंत गुरुद्वाराचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. (125-Year-Old Gurdwara Demolished in Pakistan)
संबंधित संस्थांवर निष्काळजीपणाचा आरोप
शीख संघटनांनी आरोप केला आहे की, वारंवार तक्रारी करूनही ना पोलिसांनी, ना इव्हॅक्यूई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डने, ना पाकिस्तान शीख गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटीने या ऐतिहासिक धार्मिक वारशाच्या संरक्षणासाठी प्रभावी उपाययोजना केल्या. त्यामुळे या ऐतिहासिक गुरुद्वाराचे सातत्याने नुकसान होत गेले, असा आरोप त्यांनी केला आहे. (125-Year-Old Gurdwara Demolished in Pakistan)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक