(Image Credit - Eknath Shinde X post - Sachin Ahir joins Shiv Sena in a major political development after filing his nomination for the Deputy Chairman's post.)
मुंबई (प्रतिनिधी) (Sachin Ahir joins Shiv Sena) : उबाठा गटाचे विधानपरिषद आमदार आणि आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदार संघातील शिलेदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उपसभापती पदाचा अर्ज भरला आहे. उद्धव ठाकरे आणि विशेषतः आमदार आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. तसेच सचिन अहिर हे लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री संजय शिरसाट, आमदार कृपाल तुमाने, मनिषा कायंदे, दुष्यंत चतुर्वेदी, चंद्रकांत रघुवंशी आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
दुसरीकडे, उबाठा गटानेही उपसभापती पदासाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरेंना दिलेला हा दुसरा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, सचिन अहिर हे आदित्य ठाकरेंचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी मानले जातात. आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभेतील विजयात सचिन अहिर यांचा महत्त्वाचा वाटा होता.
महायुतीकडून आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदार संघात सुरुंग!
पक्ष सोडला की, नेत्यांना गद्दार म्हणणाऱ्या उबाठा गटाच्या नेत्यांना होमग्राऊंडवरच धक्का बसला आहे. काँग्रेसची कास धरुन मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊनही उद्धव ठाकरेंना आपला पक्षाची मोट बांधता आली नाही. आदित्य ठाकरे आमदार व्हावेत यासाठी त्यांनी विशेष रणनिती आखून वरळी विधानसभा काबीज करण्याचा प्रयत्न केला होता. त्यातील मोठे आणि महत्वाचे नाव हे सचिन अहिर हे होते. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेल्या सचिन अहिर यांना विधान परिषदेवर नेऊन त्यांनी आदित्य ठाकरेंसाठी मार्ग मोकळा केला होता.
मराठी विरुद्ध गुजराती वाद पेटवणाऱ्या उबाठाने केम छो वरळी म्हणत उच्चभ्रू मतदारांना साद घातली होती. आदित्य ठाकरेंचे निवडणूकीचे कॅम्पेन प्रसिद्ध रणनितीकार प्रशांत किशोर यांनी आखल्याचा दावा वारंवार केला जातो. याच रणनितीचा भाग इथल्या स्थानिक आमदार लोकप्रतिनिधींना पक्षप्रवेश करुन देण्यात होता. सचिन अहिर यांना पक्षप्रवेश दिल्यानंतर आपल्या पक्षनेतृत्वासाठी त्यांना मतदार संघावरील दावा सोडावा लागला होता.
त्यांनंतर आदित्य ठाकरेंनी वरळी विधानसभा सलग दुसऱ्यांदा जिंकली. शिवसेनेच्या मिलिंद देवरा यांचा त्यांनी ८,८०१ मतांनी पराभव केला होता. सचिन भाऊ अहिर यांना मानणारा मतदार आजही असल्याने त्यांच्या पाठिंब्याने आदित्य दुसऱ्यांदा आमदार झाले होते. मात्र, त्यांनी उपसभापतीपदासाठी महायुतीतर्फे अर्ज भरल्यानंतर आता अहिर हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे उबाठा पक्षापेक्षा आदित्य ठाकरेंसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.