मुंबई : (Yugpravartak Dr Hedgewar Play) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सादर करण्यात आलेले 'युगप्रवर्तक : डॉ. हेडगेवार' हे नाटक राष्ट्रकार्यामागील गहन विचार, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त साकारण्यात आलेल्या 'युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार' या भव्य-दिव्य दोन अंकी नाटकाचा ५१ वा प्रयोग सोमवार, दि. २९ जून रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात पार पडला.
या प्रसंगी व्यासपीठावर मुंबई महानगर सह संघचालक विष्णू वझे, राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजप अध्यक्ष अमीत साटम, हावरे बिल्डर्सचे अध्यक्ष सुरेश हावरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधित करताना राज्यपाल म्हणाले, डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी केवळ एका संघटनेची स्थापना केली नाही, तर सामाजिक समरसता, राष्ट्रीय एकात्मता आणि 'राष्ट्र प्रथम' ही भावना युवकांच्या मनात रुजविणारे व्यापक जनआंदोलन उभे केले. त्यांच्या कार्यातून राष्ट्राला सर्वोपरी मानणारे, सेवा आणि समर्पणाची भावना जपणारे स्वयंसेवक घडले.
संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असताना सादर करण्यात आलेली ही नाट्यप्रस्तुती शताब्दी वर्षाला वाहिलेली अर्थपूर्ण श्रद्धांजली असल्याचे त्यांनी नमूद केले. सेवा, समर्पण, राष्ट्रभक्ती आणि तपश्चर्या या मूल्यांच्या आधारावर आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संघटनांपैकी एक म्हणून ओळखला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. (Yugpravartak Dr Hedgewar Play)
शिक्षण, सेवा, ग्रामविकास, आपत्ती व्यवस्थापन, सामाजिक समरसता आणि जनकल्याण अशा विविध क्षेत्रांत संघ सातत्याने योगदान देत असल्याचे राज्यपालांनी अधोरेखित केले. संघामध्ये जात, पंथ किंवा सामाजिक स्तराच्या आधारावर कोणताही भेदभाव नसून सर्व समाजघटकांना एकत्र आणण्याचे कार्य केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या काळात तळागाळातील समाज, तसेच जनजाती क्षेत्रांमध्ये सेवा आणि संघटनकार्य अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी समाजाने संघटित होऊन पुढाकार घेण्याचे आवाहनही राज्यपालांनी यावेळी केले.
रवींद्र नाट्यमंदिरात पार पडलेल्या नाटकाच्या ५१ व्या प्रयोगाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहायला मिळाला.
नागपूरच्या नादब्रह्म संस्थेची निर्मिती असलेल्या या नाटकाचे लेखन डॉ. अजय प्रधान यांनी केले असून, दिग्दर्शनाची धुरा सुबोध सुरजीकर यांनी सांभाळली आहे. नाटकासाठी संघाचे ज्येष्ठ प्रचारक रवीजी भुसारी यांचे मार्गदर्शन या लाभले आहे. सतीश खेताळे यांनी डॉ. हेडगेवार यांचे पात्र सांभाळण्याचे शिवधनुष्य लिलया पेलले आहे. सुमारे ४० कलाकार आणि तंत्रज्ञांच्या सहभागातून उभ्या राहिलेल्या या भव्य निर्मितीत आधुनिक प्रकाशयोजना, नेपथ्य, ध्वनी-संगीत आणि तांत्रिक सादरीकरणाची प्रभावी सांगड घालण्यात आली आहे. (Yugpravartak Dr Hedgewar Play)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक