लखनौ : (Yogi Adityanath Krishna Janmabhoomi) "अखिलेश यादव यांनी अयोध्येची चिंता करण्याऐवजी पहिल्यांदा श्रीरामाच्या भव्य मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. त्यामुळे सद्बुद्धी येईल,” असा टोला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लगावला.
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित दानपेटी देणगी गैरव्यवहार प्रकरणाची चर्चा सुरू असताना, योगी आदित्यनाथ यांनी मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीचा मुद्दा उत्तर प्रदेश राजकारणाच्या केंद्रस्थानी आणला आहे. योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना लक्ष्य करत "कृष्ण जन्मभूमी‘मुक्ती’साठी उघडपणे भूमिका घ्यावी,” असे आव्हान दिले आहे. हाथरसमध्ये ५४८ कोटींच्या विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात योगी आदित्यनाथ बोलत होते.
"श्रीराम मंदिराचे स्वप्न साकार झाले आहे; आता भगवान श्रीकृष्णाच्या जन्मभूमीसाठीही काम करण्याची वेळ आली आहे,” असे सांगत "मथुरा, वृंदावन आणि श्रीकृष्ण जन्मभूमीच्या प्रश्नावर समाजवादी पक्षाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी,” असे आव्हान योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादव यांना दिले आहे. "अखिलेश यादव यांच्या सत्ताकाळात रामभक्तांवर गोळीबार करण्यात आला होता,” याची आठवण करून दिली. "श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि कावड यात्रेवर बंदी घालण्यात आली होती,” याचाही उल्लेख योगींनी केला आहे. (Yogi Adityanath Krishna Janmabhoomi)
आठ आरोपींच्या घरी धाडी
अयोध्या : अयोध्या येथील श्रीराम मंदिर देणगी कथित गैरव्यवहार प्रकरणानंतर ट्रस्टचे पदाधिकारी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी राजीनामा दिला आहे. त्यातच, रविवार, दि. २८ जून रोजी सकाळी पोलिसांनी एकाचवेळी सर्व आठ आरोपींच्या घरांवर धाडी टाकल्या. या छाप्यात तब्बल ७९.८५ लाख रुपये जप्त करण्यात आले. या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने दि. २९ जून रोजीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (Yogi Adityanath Krishna Janmabhoomi)