‘जागतिक संगीत दिवस’ अलीकडेच साजरा झाला. हे विश्वच सारे संगीतमय आहे. संगीत नाही, असे एकही क्षेत्र नाही, अगदी क्रीडादेखील! अलीकडे अनेक भारतीय क्रीडाप्रकारांतही संगीताचा वापर केला जातो, तर अनेक भारतीय संगीतकार आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये संगीतसेवा करत आहेत. अशाच क्रीडा आणि संगीताच्या घट्ट जोडीचा आढावा घेणारा लेख...
जसा योग दिवस रविवार दि. २१ जून रोजी साजरा झाला. त्याच दिवशी जागतिक संगीत दिवसही होता. तसं म्हटलं, तर गाण्याचा असा कुठलाच राखीव दिवस नसतो; पण साधारण १९८२ पासून दि. २१ जून हा दिवस जगभर संगीतासाठी साजरा केला जातो. त्यानिमित्त या दिवशी जगभरात संगीतविषयक अनेक कार्यक्रमांचे आयोजनही होते. त्याचा रसास्वाद अनेक रसिकांनी घेतला असेलच. कला-क्रीडा क्षेत्रांत गीत-संगीताचे महत्त्व मोठ्या प्रमाणात असते. विविध खेळांमध्येही संगीताचा व्यापक प्रमाणात वापर सुरुच असतो. क्रीडाक्षेत्रात संगीत हा विषय नृत्याच्या जोडीने येतो. अनेकदा व्यायामप्रकार करताना संगीताच्या लयीचा आधार घेतला जातो. त्याचे ठळक उदाहरण म्हणजे झुंबा नृत्य. हा नृत्य प्रकार आजकाल प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. यात पाश्चात्य संगीताचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. या प्रकारांत भारतीयांची कामगिरीही, जगप्रसिद्ध होत आहे.
संगीताच्या लयीवर व्यायाम करणे हा फिटनेस आणि खेळांमधील एक अत्यंत लोकप्रिय प्रकार म्हणजे झुंबा नृत्य! शिवाय, जिम्नॅस्टिकमध्येही ’फ्लोर एसरसाईज’ प्रकारात, खेळाडू संगीताच्या तालावर कसरत करतातच. जलतरणाच्या ‘सिंक्रोनाईज्ड स्विमिंग’ या प्रकारातही, जलतरणपटू संगीताच्या लयीत पाण्यात अचूक हालचाली करताना दिसतात. ‘जंप रोप’ अर्थात दोरीच्या उड्या मारताना किंवा वॉर्म-अप करतानाही, खेळाडू ‘एरोबिक डान्स’च्या एका विशिष्ट लयीचाच आधार घेतात.
नुकत्याच भारतात साजरा झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेसारख्या स्पर्धांमध्येही, संगीत महत्त्वाचे अंग झाले आहे. विशेषतः आर्टिस्टिक आणि रिदमिक योग प्रकारात, खेळाडू आपल्या आवडीच्या किंवा संकल्पनाआधारित संगीताच्या तालावर योगासनांच्या कठीण प्रकारांचे सादरीकरण करतात. योगासन स्पर्धेत बहुतांश खेळाडू भारतीय संस्कृती, अध्यात्म किंवा निसर्गाची गाणी, मंत्रोच्चार किंवा शास्त्रीय संगीतांचाच वापर करतात. योगसन स्पर्धेत संगीताची निवड करताना काही नियम पाळावे लागतात. जसे की, यात वापरात येणारे संगीत सामान्यतः बोल नसलेले इंस्ट्रूमेंटल किंवा केवळ शांत मंत्रोच्चारांचेच असावे. यामुळे खेळाडूंना श्वास आणि आसनांवर लक्ष केंद्रित होण्यास मदत होईल. आवाजाची पातळीही ठरवून दिलेल्या मर्यादेत असणे आवश्यक असते, जेणेकरून ते इतरांना विचलित करणार नाही. भारतीय संस्कृतीचे हे एक वैशिष्ट्य आहे. काही स्पर्धांमध्ये भारतीय संस्कृतीवर आधारित गीत-नृत्यांचे सादरीकरण होत असले, तरी जगात अनेक ठिकाणी पाश्चात्य नृत्य व संगीताचाच वापर सर्रास होताना दिसतो. यात भारतीय कलाकार, क्रीडापटू आघाडीवर असलेले आपल्याला नक्कीच आढळतील. जवळजवळ सगळ्याच महत्त्वाच्या क्रीडास्पर्धांमध्ये, अलीकडे विविध संघांच्या अधिकृत अँथेम अर्थात क्रीडागीतांचे सामूहिक गायन केले जाते.
सध्या चालू असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेचीही अधिकृत गाणी आहेत. भारतासाठी या गाण्याच्या बाबतीत एक अभिमानाचा क्षण म्हणजे, केरळम्मध्ये जन्मलेला आणि मुंबईत वाढलेला राजिद देव या नृत्यदिग्दर्शकाने, ‘फिफा विश्वचषक २०२६’च्या १८ गाण्यांपैकी एका गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. त्या गाण्याचे नाव ‘सिर सिर’ असे आहे, ज्याचा अर्थ ‘जा’ असा होतो. ते गाणे मोरोअन लोकांकडून म्हटले गेले आहे. जेव्हा ते ‘सिर सिर’ म्हणतात, तेव्हा त्याचा अर्थ ‘चला, टीम गो’ असा होतो. जगभरातील विविध कलाकारांनी ‘फिफा’कडे गाणी सादर केली होती. त्यातूनच १८ गाण्यांची निवड करण्यात आली. यांपैकी एका गाण्यासाठी मूळच्या मोरोक्कन वंशाच्या कॅनेडियन नर्तक आणि अभिनेत्री नोरा फतेहीचीही निवड झाली. जेव्हा तिला हे गाणे करण्याची संधी मिळाली, तेव्हा तिने रजितला नृत्यदिग्दर्शनासाठी आग्रह धरला. यासाठी नर्तक वगैरे निवडण्याची जबाबदारीही त्याच्यावरच देण्यात आली.
सहसा भारताबाहेर चित्रीकरणाच्या वेळी येणार्या व्हिसा, आर्थिक जुळवाजुळव अशा अनेक अडचणी टाळण्यासाठी, त्या त्या देशातील कलाकारांनाच प्राधान्य दिले जाते. परंतु, असे पहिल्यांदाच घडले की, भारतीय कलाकार बाहेर गेले. रजित देवचा ‘रजित देव एसलूझिव्ह’ अर्थात ‘आरडीएस’ नावाचा गट तिथे जाऊन सादरीकरण करणार होता. त्यासाठी ‘आरडीएस’चा गट, दोन दिवस आधीच तिकडे पोहोचला. ‘फिफा’च्या अधिकार्यांनी ‘आरडीएस’ला प्रत्यक्ष मैदानावर म्हणजेच जिथे खेळाडू खेळतात, त्या भागात गाण्याच्या चित्रीकरणासाठी मोजून १५ मिनिटांची परवानगी दिली. रजित देव आणि त्याच्या गटासाठी हे एक मोठेच आव्हान होते; कारण त्यांना गाण्यांच्या चित्रीकरणासाठी सहसा किमान दोन दिवस मिळतात. अर्थात, त्यांनी कॅसाब्लांका शहरात एक दिवस चित्रीकरण केलेच होते; दुसर्या दिवशी मोरोक्कोतील कॅसाब्लांका आणि रबात अशा दोन्ही ठिकाणी काम झाले. पण ती १५ मिनिटे म्हणजे त्यांच्या लेखी काहीच नव्हती.
वास्तविक, एखाद्या कामाची मांडणी करण्यासाठीच १५ मिनिटे लागतात. ही १५ मिनिटे कशी निघून जातात, हे देखील कळत नाही. इथे सर्व काही १५ मिनिटांत पूर्ण करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. भारतातून आलेल्या छायाचित्रकारांच्या गटासोबत, सगळ्यांनी आधी सराव केला. स्टेडियमच्या ‘डगआऊट’ भागातही, त्यांनी १५ ते ३० मिनिटे सराव केला. ते काय करणार होते? ते आत जाणार, पहिलं चित्रीकरण करणार, मग दुसरं चित्रीकरण करणार; नर्तक हे करणार, नोरा ते करणार अशा प्रकारे त्या ३० मिनिटांत त्यांनी पूर्ण सलग सराव केला. यामुळे आत गेल्यावर त्यांना काय करायचे आहे, याची पूर्ण कल्पना आली होती. तसेच, एकदा का १५ मिनिटे सुरू झाली की, सरावाप्रमाणेच सर्व काही करणे भाग होते. तिथे प्रयोग करण्याचा वेळ नव्हता. किंबहुना तेवढा वेळच त्यांच्याकडे नव्हता. त्यांना कोणतीही सवलत किंवा अतिरिक्त वेळ मिळणार नसल्याने, त्यांना नक्की काय करायचे आहे याचे नोयोजन त्यांनी पूर्ण केले होते. त्यानुसारच सर्व काही यशस्वीपणे पारही पाडले.
टोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये भारतीय जिम्नॅस्ट
प्रणती नायक हिने श्रेया घोषालने गायलेल्या ‘एक था टायगर’ चित्रपटातील, ‘माशाल्ला’ या गाण्यावर एक सादरीकरण केले होते. तिचे ते सादरीकरण प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारे ठरले. त्याआधीच्या दशकात, २०१०च्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये, अमेरिकेच्या मेरिल डेव्हिस आणि चार्ली व्हाईट यांनी व्हँकुव्हर येथे ‘कजरा रे’, ‘सिलसिला ये चाहत का’ आणि ‘डोला रे डोला’ या गाण्यांवर, एका मंत्रमुग्ध करणार्या बर्फावरील नृत्याच्या सादरीकरणाने प्रेक्षकांना थक्क केले. या जोडीने केवळ प्रेक्षकांची प्रशंसाच मिळवली नाही, तर स्पर्धेत रौप्यपदकही जिंकले होते. भारतातील ३८व्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धेतही, अशाच प्रकारची देशातील सांस्कृतिक एकता अनुभवायला मिळाली होती. त्यावेळी पश्चिम बंगालच्या अनुश्रिता भट्टाचार्य आणि अंकृश करमाकर यांनी जिम्नॅस्टिकच्या ‘अक्रोबॅटिक’ मिश्र गटात ‘झिंगाट’ या मराठी गीतावर सादरीकरण करून भाषा व संस्कृतीच्या सीमा ओलांडल्या होत्या.
चित्रकलेतही संगीत कसे समाविष्ट असते, हे आपण जाणून घेऊ. ज्येष्ठ चित्रकार व बोधचित्रकार रवी परांजपे, हे भारतीय शास्त्रीय संगीताचे निस्सीम चाहते होते. त्यांच्या कलाकृतींमध्ये संगीताचे प्रतिबिंब स्पष्ट दिसे. संगीत आणि चित्रकला या दोन्ही कला एकाच संवेदनेतून येतात, असा त्यांचा ठाम विश्वास होता. रवी परांजपे हे त्यांच्या चित्रांना ‘दृश्यसंगीत’ असे म्हणत. त्यांना जे चित्र काढायचे असे, त्यांचा विषय जो आहे, त्याचा राग ते पहिल्यांदा तयार करत असत. चित्राविषयीच्या रागाची निर्मिती करणे आणि नंतर त्याचे गायन करणे, अशीच त्यांची भावना होती. ‘व्हेन आय सिंग थ्रू कलर्स’ नावाचं एक पुस्तकही, त्यांनी लिहिलं होतं. त्या पुस्तकात रवी परांजपे यांनी त्यांची परंपरा, गुरू आणि चित्रकला-संगीत यांच्यातील संबंधांवर त्यांचे विचार मांडले आहेत.
संगीत हा त्यांच्या चित्रकलेचा आत्मा आहे असं ते म्हणत. त्यांना भीमसेन जोशींच्या गाण्याची शैली विलक्षण आवडत असे. भीमसेन जोशींच्या पंचाहत्तरीसाठी, रवी परांजपेंनी खास पोर्ट्रेट्स साकारली होती. त्यानंतर "माझी चित्रे बघायला या,” म्हणून रवी परांजपेंनी, भीमसेन जोशींना निमंत्रणही दिलं होतं. त्याप्रमाणे ते गेलेही. " आम्ही संगीतातून गाण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही चित्रांमधून गात आहात. ” असे एका संगीततज्ज्ञाने, एका चित्रकर्म्याला तेव्हा सांगितलं होतं.
लेखाचा समारोप करण्यापूर्वी, या ‘आरडीएस’मधील प्रारंभीच्या ‘आर.डी.’ या वर्णाक्षरांपासून नावारूपास आलेल्या पंचम अर्थात राहूलदेव बर्मन यांचा उल्लेख केल्याशिवाय राहावत नाही. कारण दि. २७ जून (१९३९) हा त्यांचा वाढदिवस! पाश्चात्य आणि भारतीय संगीताचा अनोखा मिलाप असलेल्या पंचम यांची एक सत्यकथा सांगत, त्यांना अभिवादन करावेसे वाटते. आर. डी. बर्मन यांना जर वडिलांप्रमाणे संगीतकार होता नसते आले, तर ते एक क्रीडापटू, एक सायकलपटू म्हणून नावारूपास आले असते.
‘पंचम’ शाळेत असताना, एक सायकलपटू होते. ‘पंचम’ यांचे वडील जेव्हा त्यांच्या शाळेत बक्षीस समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून आले, तेव्हा एक घोषणा त्यांच्या कानांवर पडली. ती घोषणा अशी होती की, "...आणि यावेळच्या सायकलिंग स्पर्धेचा विजेता आहे, राहूलदेव बर्मन,” हे ऐकल्यावर ते चकितच झाले. पंचम यांन पहिले क्रीडेतले बक्षीस त्यांच्या वडीलांच्या हस्तेच मिळाके होते. मग त्या सायकलपटूने चित्रपट संगीत क्षेत्रात जे काय पायडल मारले, त्याचा वेग विलक्षण होता.
असे हे संगीत भारतीय जनमनांत ठासून भरलेलं आपण बघतो. म्हणूनच संगीत दिवसाचा विषय कायमच ताजा वाटतो. गाण्याचा असा कुठलाच राखीव दिवस नसतो, ‘आरडी’ आणि ‘आरडीएस’सहित सार्यांनी हेच तर आपल्याला दाखवून दिलंय, नाही का?
श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४