मुंबई : (Vadhvan Port Skill Development Program) वाढवण बंदर कौशल्य विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला अधिक गती देण्यासाठी वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड (व्हीपीपीएल) तर्फे उच्चस्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. सोमवार, दि.२९ रोजी आयोजित या बैठकीत आतापर्यंत झालेल्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला, तसेच प्रकल्पाच्या विविध टप्प्यांपूर्वीच स्थानिक युवकांना उद्योगाच्या गरजांनुसार आवश्यक कौशल्ये प्राप्त करून देण्यासाठी विविध महत्त्वाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा वर्मा, वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौरव दयाल, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे आयुक्त, कौशल्य विकास तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी, पालघर जिल्हाधिकारी इंदूराणी जाखर, वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवीश कुमार सिंह तसेच व्हीपीपीएल, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (डीव्हीईटी), महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Vadhvan Port Skill Development Program)
या बैठकीतील प्रमुख आकर्षण म्हणजे 'मनुष्यबळ प्रक्षेपण अभ्यास अहवाल' सादर करण्यात आला. वाढवण बंदर प्रकल्पाच्या विविध टप्प्यांनुसार भविष्यातील मनुष्यबळाची गरज, उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी, आवश्यक तांत्रिक कौशल्ये आणि विविध पदांची आवश्यकता यांचा सविस्तर अभ्यास या अहवालात मांडण्यात आला आहे. तसेच, प्रकल्पाच्या कालबद्ध अंमलबजावणीशी मनुष्यबळाच्या मागणीची सांगड घालणारा हा अहवाल कौशल्य विकासाचे नियोजन, प्रशिक्षण कार्यक्रमांची वेळेवर अंमलबजावणी आणि आवश्यक क्षमताविकासासाठी दिशादर्शक ठरणार आहे. (Vadhvan Port Skill Development Program)
या बैठकीदरम्यान व्हीपीपीएल आणि महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत कार्यरत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीचाही आढावा घेण्यात आला.
वाढवण बंदर कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत आजपर्यंत 24 विविध प्रशिक्षण अभ्यासक्रमांद्वारे 7000 हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, या उपक्रमाची यशस्वी वाटचाल सातत्याने सुरू आहे. प्रकल्पाच्या प्रगतीसोबतच व्हीपीपीएल आणि त्याच्या सहयोगी संस्थांकडून कौशल्य विकासाच्या संधींचा आणखी विस्तार करण्यात येणार आहे. यामुळे स्थानिक युवकांना उद्योगाभिमुख प्रशिक्षण मिळण्यास चालना मिळेल आणि भारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी सागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक असलेल्या वाढवण बंदरासाठी आवश्यक कुशल व उद्योगसज्ज मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होईल. (Vadhvan Port Skill Development Program)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.