भारतातून वटवाघळांच्या १३५ प्रजातींची नोंद; महाबळेश्वरमधील रॉबर्स गुहेतील वटवाघळांमध्ये घट

    29-Jun-2026

 state of bats report


 

मुंबई (अक्षय मांडवकर) - भारतातील वटवाघळांवर प्रसिद्ध झालेल्या पहिल्यावहिल्या 'स्टेट ऑफ इंडियाज बॅट्स (२०२४–२५)' या राष्ट्रीय अहवालाने देशातील वटवाघळांच्या संवर्धनाबाबत अनेक महत्त्वपूर्ण बाबी समोर आणल्या आहेत (state of bats report). अहवालानुसार, भारतातून सध्या वटवाघळांच्या १३५ प्रजातींची नोंद झाली असून, त्यापैकी १६ प्रजाती भारतासाठी प्रदेशनिष्ठ आहेत (state of bats report). विशेषतः पश्चिम घाट आणि पश्चिम महाराष्ट्रातील नैसर्गिक अधिवास झपाट्याने बदलत असून त्यामुळे अनेक प्रजातींच्या अस्तित्वावर धोका निर्माण होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. (state of bats report)

 

महाबळेश्वरमधील रॉबर्स केव्ह ही उत्तर-पश्चिम घाटाच्या मध्य भागातील वटवाघळांच्या सर्वांत मोठ्या वसाहतींपैकी एकाला आश्रय देणारी गुहा म्हणून प्रसिद्ध आहे. १९६० च्या दशकाच्या सुरुवातीला निसर्गतज्ज्ञ आंद्रे ब्रॉसेट यांनी या गुहेच्या प्रवेशद्वारापासूनच्या पहिल्या सुमारे ३० मीटर भागात तब्बल ३० ते ४० हजार वटवाघळे नोंदवली होती. 'स्पेलिओलॉजिकल असोसिएशन ऑफ इंडिया'ने 'डब्लूडब्लूएफ-इंडिया'च्या 'काॅन्झर्वेशन कॅटलिस्ट प्रोग्राम'अंतर्गत वर्षभर केलेल्या अभ्यासादरम्यान या गुहेतील वटवाघळांच्या संख्येत घट झाल्याचे निरीक्षण नोंदवले. त्यामुळे महाराष्ट्रातील पश्चिम घाटातील अद्याप पुरेसा अभ्यास न झालेल्या जांभ्या खडकांतील गुहांकडे तातडीने संवर्धनाच्या दृष्टीने लक्ष देण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. या पार्श्वभूमीवर, या संवर्धनाची निकड लक्षात घेऊन, 'स्टेट ऑफ इंडियाज बॅट्स' अहवालाच्या तयारीत सक्रिय सहभाग असलेल्या 'स्पेलिओलॉजिकल असोसिएशन ऑफ इंडिया'ने स्थानिक भागधारकांच्या सहभागातून रॉबर्स गुहेच्या दीर्घकालीन संरक्षणासाठी स्वतंत्र संवर्धन आराखडाही तयार केला आहे.

 

अहवालानुसार महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळांवरील वटवाघळांना असेलला धोका वाढत आहे. विशेषतः दौलताबाद किल्ल्यावर संवर्धन आणि पर्यटनाच्या कामांदरम्यान प्रकाशयोजना, भेगा बंद करणे आणि स्वच्छता मोहिमांमुळे वटवाघळांच्या निवासस्थानांवर परिणाम झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच, पूर्वी मुंबईतील कान्हेरी लेणी येथे आढळणाऱ्या काही वटवाघळांच्या वसाहती आता दिसत नसल्याची नोंद करण्यात आली असून, त्यामागे वाढता पर्यटन ताण हे संभाव्य कारण असल्याचे अहवालात म्हटले आहे. याशिवाय सातारा जिल्ह्यातील चाळकेवाडी परिसरातील पवनऊर्जा प्रकल्पांच्या परिसरातही दुर्मिळ वटवाघळांच्या हालचाली नोंदविण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात पवनऊर्जा आणि सौरऊर्जा प्रकल्पांचा वटवाघळांवर होणारा परिणाम अभ्यासणे आवश्यक असल्याचा अहवालाचा निष्कर्ष आहे.

 

 

विशेष नोंद
आतापर्यंत भारतातील पवनऊर्जा किंवा सौरऊर्जा (सोलर) प्रकल्पांच्या परिसरात जागतिक स्तरावर धोकाग्रस्त (Globally Threatened) म्हणून नोंद असलेल्या कोणत्याही वटवाघळाच्या प्रजातीची उपस्थिती आढळलेली नाही. मात्र, चाळकेवाडी पठारावर राॅटनचे फ्री-टेल्ड वटवाघूळ (Otomops wroughtoni) या प्रजातीच्या वटवाघळाची ध्वनी-आधारित (acoustic) निरीक्षण अनेक वेळा नोंदविण्यात आली आहेत. या प्रजातीला भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत वाघाऐवढी म्हणजेच प्रथम श्रेणीचे सर्वोच्च कायदेशीर संरक्षण प्राप्त आहे. याशिवाय, अलीकडेच वैज्ञानिकदृष्ट्या स्वतंत्र प्रजाती म्हणून ओळख मिळालेली लाॅग फ्रिंगर्ड केव्ह बॅट (Miniopterus phillipsi) ही प्रजातही तिच्या ज्ञात वितरण क्षेत्र आणि अधिवासाच्या स्वरूपावरून दक्षिण भारतातील तसेच पश्चिम घाटातील पवनऊर्जा प्रकल्पांच्या परिसरात आढळण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.

 

 

 
भारतात जगातील सुमारे १६ टक्के म्हणजेच १३५ वटवाघळांच्या प्रजाती आढळतात. परंतु त्यांचा अभ्यास करणारे संशोधक अत्यंत कमी आहेत. अशा परिस्थितीत डॉ. रोहित चक्रवर्ती यांच्या पुढाकारातून, नेचर कन्झर्व्हेशन फाउंडेशन (बंगळुरू) आणि बॅट कन्झर्व्हेशन इंटरनॅशनल (BCI) यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेला स्टेट ऑफ इंडियाज बॅट्स (SoI Bats) हा अहवाल अत्यंत महत्त्वाचा आणि देशातील पहिलाच व्यापक उपक्रम आहे. हा अहवाल शासकीय तसेच स्वयंसेवी संस्थांपर्यंत पोहोचून वटवाघळांच्या संवर्धनाचा समावेश त्यांच्या कृती आराखड्यांमध्ये व्हावा. तसेच, त्यांच्या निवासस्थानांचे जसे की गुहा, विसाव्याची झाडे आणि ऐतिहासिक वास्तू, संरक्षण करण्यावर विशेष भर देणे ही काळाची गरज आहे. - डाॅ. धनुषा कावलकर, सिनिअर प्रोजेक्ट असोसिएट- 'सॅकॉन' (SACON), सह-संस्थापक 'स्पेलिओलॉजिकल असोसिएशन ऑफ इंडिया'

 





संबंधित मजकूर