नको गाठीया समुद्री पक्ष्यांना

    29-Jun-2026
 
Seabirds Feeding
 
समुद्रकिनार्‍यावर गेल्यावर अचानक कुणीतरी हातातल्या गाठीया हवेत उधळतो आणि क्षणातच गल्स पक्ष्यांचा थवा त्यावर झेपावतो. अनेकांना हे दृश्य निरुपद्रवी किंबहुना आनंददायी वाटते. पक्षी जणू उत्साहाने कृतज्ञताच दाखवत आहेत, असे भासते. पण काळजीपोटी केलेली ही कृती त्यांच्या आयुष्यावर नकळत खोल परिणाम करत आहे. वरवर दया वाटणारे हे दृश्य हळूहळू समस्येत बदलत आहे. त्याविषयी दि. ३ जुलै रोजी असलेल्या जागतिक समुद्री पक्षी दिनाचे औचित्य साधून लिहिलेला हा लेख...
 
दरवर्षी ऑक्टोबर ते मे या कालावधीत उत्तर व मध्य आशियातील थंड प्रदेशातून हजारो कुरव म्हणजेच गल्स पक्षी भारताच्या किनारपट्टीवर हिवाळा घालवण्यासाठी येतात. Black-headed Gull, Brown-headed Gull, Slender-billed Gull, Lesser Black-backed Gull आणि Pallas's Gull या प्रजाती महाराष्ट्राच्या किनार्‍यावर नियमितपणे दिसतात. येथे ते विश्रांती घेतात, अन्न मिळवतात आणि परतीच्या लांब प्रवासासाठी ताकद साठवतात. निसर्गतः गल्स हे कुशल अन्नशोधक आहेत. त्यांच्या आहारात मासे, कोळंबी, खेकडे आणि इतर सागरी जीव असतात, जे प्रथिने व आवश्यक ‘फॅटी अ‍ॅसिड्स’ने समृद्ध असतात. अशा अन्नामुळे स्नायू मजबूत राहतात, अवयव निरोगी राहतात आणि दीर्घ उड्डाणासाठी आवश्यक ऊर्जा मिळते. मात्र, अलीकडच्या वर्षांत गाठीयांनी त्यांच्या अन्नात मिळविलेले स्थान चिंताजनक आहे.
 
गल्स बुद्धिमान आणि संधिसाधू पक्षी आहेत. सोपे अन्न मिळाले की ते लगेच स्वीकारतात. समस्या जास्त खाण्याची नाही, तर चुकीचे अन्न खाण्याची आहे. गाठीया माणसांसाठी बनवलेले तळलेले पदार्थ असून त्यात मैदा, तेल आणि मीठ मोठ्या प्रमाणात असते. गल्ससाठी हे ‘जंक फूड’ आहे. गाठीया नियमित खाल्ल्याने गल्सचे वजन लवकर वाढते; पण ही चरबी पोषणदृष्ट्या निकृष्ट असते. नैसर्गिक अन्नाप्रमाणे आवश्यक ‘फॅटी अ‍ॅसिड्स’ नसल्यामुळे ही चरबी अंतर्गत अवयवांभोवती साचू लागते, ज्याने उड्डाण कठीण होते आणि पक्षी मंदावतात. ऑलिम्पिककरिता सराव करणार्‍या खेळाडूने चिप्स आणि तळलेले पदार्थ खाऊन वजन वाढवावे, तशी अवस्था गल्सची होते. वजन वाढते, पण ताकद कमी होते. पंख काम करत असले, तरी सहनशक्ती घटते. याचा परिणाम स्थलांतर, शिकार्‍यांपासून बचाव आणि रोगप्रतिकारक शक्तीवर होऊ शकतो.
 
यातून एक अदृश्य समस्या निर्माण होते, ती म्हणजे, पोट आणि पचनावर परिणाम. नैसर्गिक आहारामुळे पचन व रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक असलेले उपयुक्त जीवाणू टिकून राहतात. गाठीया आणि इतर मानवी अन्नामुळे हा समतोल बिघडतो; रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि संसर्गाचा धोका वाढतो. मानवी अन्नावर अवलंबून असलेले पक्षी रोगांना अधिक बळी पडतात, असे अभ्यासातून दिसून आले आहे. बाहेरून ठीक दिसणारे पक्षी हळूहळू आतून कमजोर होत जातात. गाठीया खाऊ घातल्यामुळे गल्सच्या वर्तनातही बदल होतो.
 
माणसांकडून अन्न मिळते, हे लक्षात आल्यावर, ते नैसर्गिक अन्नशोध कमी करतात आणि माणसं, मासेमारीच्या होड्या, तसेच कचर्‍याच्या ठिकाणी फिरू लागतात. काही गल्स आक्रमक होतात. ही सवय पिल्ले प्रौढांकडून शिकतात आणि पिढ्यान्पिढ्यांचे अवलंबित्व तयार होते.
 
आनंददायी वाटणारे हेच गल्स काही काळाने लोकांना त्रासदायक वाटू लागतात. आवाज, घाण आणि आक्रमक वर्तनाबद्दल तक्रारी वाढतात आणि संघर्ष निर्माण होतो. ज्यात शेवटी नुकसान पक्ष्यांचेच होते. हेही लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, गल्स हे ‘वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२’अंतर्गत संरक्षित आहेत. गल्ससह कोणत्याही वन्य पक्ष्यांना अन्न देणे कायद्याने अमान्य आहे; कारण त्यामुळे त्यांच्या नैसर्गिक वर्तनात हस्तक्षेप होतो. चांगल्या हेतूने केलेली कृतीही कायदेशीर गुन्हा ठरू शकते. या कायद्याचा उद्देश शिक्षा करणे नसून, दीर्घकालीन नुकसानापासून वन्यजीवांचे संरक्षण करणे, हा आहे.
 
गल्स ऐतखाऊ नाहीत; ते उत्क्रांतीने घडवलेले कुशल शिकारी आहेत. गाठीया देऊन आपण त्यांच्या नैसर्गिक जगण्याऐवजी त्यांना परावलंबी करत आहोत. गल्सचे संरक्षण म्हणजे त्यांना अन्न देणे नव्हे. कधीकधी फक्त पाहणे, समजून घेणे आणि निसर्गचक्रात हस्तक्षेप न करता त्याचा आनंद घेणे, हेच खरे संरक्षण असते.
 
ऋषिकेश राणे
(लेखक कांदळवन प्रतिष्ठानमध्ये उपसंचालक (क्षमता बांधणी) म्हणून कार्यरत आहेत.)
९१६७४६६४०८




संबंधित मजकूर