उत्पन्न वाढवा, अन्यथा कारवाईला सामोरे जा; एसटीतील अकार्यक्षम अधिकाऱ्यांना एक महिन्याचा अल्टिमेटम-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा

Pratap Sarnaik ST Revenue Ultimatum
 
मुंबई : (Pratap Sarnaik ST Revenue Ultimatum) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ करण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सर्व स्तरावरील अधिकाऱ्यांना एक महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. या कालावधीत उत्पन्न वाढीसाठी ठोस परिणाम दिसून आले नाहीत, तर संबंधित अधिकाऱ्यांवर बदली, पदावनती अथवा निलंबनासारखी कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
 
मंत्री सरनाईक म्हणाले की, एसटी ही केवळ वाहतूक सेवा नसून राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. शासनाने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्या मान्य करून मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे आता व्यवस्थापन आणि अधिकारी वर्गानेही आपल्या जबाबदारीचे भान ठेवून उत्पन्न वाढीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणे आवश्यक आहे. केवळ बैठका घेऊन किंवा कागदोपत्री नियोजन करून चालणार नाही, तर प्रत्यक्ष परिणाम दिसला पाहिजे.(Pratap Sarnaik ST Revenue Ultimatum)
 
विशेष तपास पथकाची नियुक्ती
 
एसटी महामंडळातील आर्थिक अफरातफर अथवा अनियमिततेची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. यासाठी महाव्यवस्थापक माहिती व तंत्रज्ञान यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली असून त्याद्वारे प्रत्येक आगार, विभाग, प्रादेशिक कार्यालय आणि मुख्यालयातील अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे स्वतंत्र मूल्यमापन केले जाणार आहे. प्रवासी वाढ, उत्पन्नवाढ, फेऱ्यांचे नियोजन, खर्च नियंत्रण, बसचा कार्यक्षम वापर आणि स्थानिक स्तरावरील नाविन्यपूर्ण उपक्रम या सर्व बाबींचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल.(Pratap Sarnaik ST Revenue Ultimatum)
 
"एसटीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अधिकारी वर्गाने आता निकाल देण्याची वेळ आली आहे. काम करणाऱ्यांना संपूर्ण पाठबळ मिळेल; मात्र अकार्यक्षमता, उदासीनता आणि निष्क्रियता खपवून घेतली जाणार नाही. एक महिन्यानंतर कामगिरीच्या आधारे निर्णय घेतले जातील आणि आवश्यक असल्यास बदली, पदावनती किंवा निलंबनासारखी कठोर कारवाई करण्यात येईल."
 
- प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
 
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर