पालघर : (Palghar World Drug Day Awareness Program) पालघर जिल्हा पोलीस दल आणि सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. २९ जून रोजी जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून 'सुसंगती सदा घडो...'या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .हा भव्य कार्यक्रम सकाळी १०:०० वाजता सोनोपंत दांडेकर कला, व्ही.एस. आपटे वाणिज्य आणि एमएच मेहता विज्ञान महाविद्यालय, पालघर येथील सभागृहात यशस्वीरीत्या पार पडला. तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यापासून दूर ठेवण्यासाठी आणि समाजात व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक आणि पालघर जिल्हा पोलीस दल मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेते सिद्धार्थ जाधव आणि पालघरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनायक नरळे उपस्थित होते. त्यासोबतच, अनिल व्हटकर (सहाय्यक पोलीस निरिक्षक, वाहतूक विभाग), विशाल कडणे (मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ प्रमुख), डॉ. किरण सावे (शिक्षणतज्ज्ञ), प्रो. मोहित पंडित (सचिव, एमपीए, पालघर), डॉ. हेमंत जोशी (बालरोगतज्ज्ञ), डॉ. सुरेश पाटील (प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ) आणि सचिन कोरे (सीए) हे मान्यवर देखील उपस्थित होते.(Palghar World Drug Day Awareness Program)
या सर्व मान्यवरांकडून तरुणांचे संबोधन करण्यात आले.आणि कार्यक्रमाच्या शेवटी, उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी 'व्यसनमुक्त आणि सुदृढ भारत' घडवण्याची सामूहिक शपथ घेतली. सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी आणि पालघर पोलीस दलाच्या विशेष सहकार्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला. महाविद्यालयाच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.(Palghar World Drug Day Awareness Program)
"जर तुम्हाला व्यसन करायचेच असेल तर बिंधास्त करा, पण त्याआधी स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा की मी हे का करतोय? स्वतःचा विचार बाजूला ठेवा, पण ज्या आई-वडिलांनी आपल्यासाठी उभं आयुष्य वेचलं, त्यांचा एकदा तरी विचार करा. मी स्वतः कधीही दारू किंवा सिगारेटला स्पर्श करत नाही. त्यामुळे व्यसनमुक्तीचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून काम करताना मी जे सांगायचो, तेच आज पुन्हा सांगेन. आज आपण मोठे झालोय, आपल्याला कदाचित त्यांची गरज भासणार नाही, पण या वयात आपल्या आई-वडिलांना आपली सर्वात जास्त गरज आहे. आपण त्यांच्यामुळे या जगात आलो आहोत, त्यांच्या नंतर आलोय; त्यामुळे त्यांच्या आधी या जगातून जाण्याचा आपल्याला अजिबात अधिकार नाही.(Palghar World Drug Day Awareness Program)
- सिद्धार्थ जाधव (प्रसिद्ध अभिनेते)
"अमली पदार्थांचे व्यसन हे केवळ एका व्यक्तीला नाही, तर संपूर्ण कुटुंबाला आणि पर्यायाने समाजाला उद्ध्वस्त करते. आजची तरुण पिढी ही देशाचे भविष्य आहे आणि या भविष्याला सुरक्षित ठेवणे ही पोलीस दलासोबतच संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. तरुणांनी कोणत्याही तात्पुरत्या आनंदासाठी किंवा मित्रांच्या दबावाखाली येऊन अशा घातक मार्गाकडे वळू नये. सुसंगतीत राहून स्वत:ची प्रगती कशी करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे आणि जेव्हा केव्हा आमच्यासारख्या पोलिसांना भेटायची वेळ येईल, तेव्हा ती एखाद्या चांगल्या कामासाठी असावी. गुन्हेगार म्हणून नाही."
- विनायक नरळे (अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पालघर जिल्हा)