मुंबई : (NIA Red Fort Car Bomb Case) दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटात ११ जणांचा मृत्यू झालेल्या प्रकरणात एनआयएने आणखी तीन आरोपींविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये एका फरार आरोपीचाही समावेश आहे. एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात जम्मू-काश्मीरमधील जमीर अहमद आहंगर, तुफैल अहमद भट आणि मुजफ्फर अहमद उर्फ फराज उर्फ झफर यांना आरोपी ठरवण्यात आले आहे. यामुळे या प्रकरणात आरोपपत्र दाखल झालेल्या आरोपींची संख्या मुख्य आरोपी (मृत) डॉ. उमेर उन नबी याच्यासह १३ झाली आहे.
फरार आरोपी मुजफ्फर अहमद, जो व्यवसायाने बालरोगतज्ज्ञ आहे, हा सहआरोपी डॉ. आदिल अहमद राथर याचा मोठा भाऊ असून, अल-कायदाशी संबंधित 'एजीयूएच इंटरिम' या दहशतवादी संघटनेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असल्याचे एनआयएच्या तपासात उघड झाले आहे. तपासात असे निष्पन्न झाले की, १० नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या वाहनाधारित स्फोटक हल्ल्याचा कट रचण्यात मुजफ्फरने उमेर, मुजम्मिल, आदिल आणि मुफ्ती इरफान यांच्यासह प्रमुख भूमिका बजावली होती.
एनआयएच्या तपासानुसार, जून २०२२ मध्ये श्रीनगर येथील ईदगाहमध्ये झालेल्या गुप्त बैठकीत मुजफ्फर सहभागी झाला होता. याच बैठकीत एजीयूएच इंटरिम या दहशतवादी मॉड्यूलची स्थापना करण्यात आली होती. तपासात पुढे असेही समोर आले आहे की, फरीदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठात उमेर आणि मुजम्मिल यांनी चालविलेल्या गुप्त आयईडी निर्मिती केंद्रात टीएटीपी आधारित स्फोटकांची निर्मिती, चाचणी आणि साठवणूक करण्यामध्ये मुजफ्फरचा सक्रिय सहभाग होता. (NIA Red Fort Car Bomb Case)
मुजफ्फरविरुद्ध न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले असून, त्याचा शोध घेऊन अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एनआयएच्या तपासानुसार, जमीर अहमद हा एजीयूएच इंटरिमचा ओव्हरग्राउंड वर्कर म्हणून काम करत होता. तर तुफैल अहमद भट, जो बंदी घालण्यात आलेल्या लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा माजी ओव्हरग्राउंड वर्कर होता, तो या मॉड्यूलसाठी शस्त्रपुरवठादार म्हणून कार्यरत होता. त्याने एका सूत्रधाराच्या मार्गदर्शनाखाली 'डेड ड्रॉप' पद्धतीने एक एके-४७ रायफल, एक क्रिंकोव्ह रायफल, एक पिस्तूल, मॅगझिन आणि जिवंत काडतुसे मिळवून ती ३ लाख रुपयांच्या मोबदल्यात मुख्य आरोपी डॉ. उमेर उन नबी याला पुरवल्याचा आरोप आहे. (NIA Red Fort Car Bomb Case)
एनआयएने नवी दिल्लीतील पटियाला हाऊस विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, अटक करण्यात आलेल्या जमीर आणि तुफैल यांच्यावर बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) अंतर्गत कलम १३, १८, २०, २३, ३८ आणि ३९ तसेच भारतीय न्याय संहिता मधील कलम ६१(२), १४७, १४८ आणि १५२ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फरार आरोपी मुजफ्फरवर याशिवाय भारतीय न्याय संहितातील कलम ६१(२) सह १०३(१), १०९(१), ११८(१) आणि ११८(२), स्फोटक पदार्थ कायदा कलम ३, ४ आणि ५ तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा अंतर्गत कलम ३ आणि ४ अन्वये आरोप ठेवण्यात आले आहेत. (NIA Red Fort Car Bomb Case)
एनआयएने वैज्ञानिक आणि बहुआयामी तपासपद्धतीचा वापर करून विविध आरोपींमधील संबंध उघड केले आहेत. यामध्ये फॉरेन्सिक तपासणी, कट रचण्यात आलेल्या ठिकाणांचे भू-स्थान विश्लेषण आणि आर्थिक व्यवहारांचा सखोल मागोवा यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अद्याप सुरू आहे. (NIA Red Fort Car Bomb Case)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक