मुंबई (विशेष प्रतिनिधी) : नसरापूर येथील तीन वर्षीय चिमुकलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने सोमवारी आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा निकाल दिला. अंतिम निकाल देताना न्यायालयाने शिक्षेमागील कारणेही सविस्तर स्पष्ट केली.
अशी माहिती आहे की, या निकालावेळी पुणे सत्र न्यायालय परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असल्याने न्यायालय परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस तैनात करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान पीडित चिमुकलीचे कुटुंबीयही न्यायालयात उपस्थित होते. सरकार पक्षाची बाजू विशेष सरकारी वकील अॅड. अजय मिसार यांनी मांडली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर बचाव पक्षाने आरोपीला फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा देण्याची विनंती केली होती. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली.
निकालाच्या दिवशी न्यायालयाबाहेर सामाजिक कार्यकर्ते आणि पीडित कुटुंबीयांचे समर्थक मोठ्या संख्येने जमले होते. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करणारे फलकही त्यांनी हातात घेतले होते आणि चिमुकलीला न्याय मिळावा, अशी जोरदार मागणी केली. या निकालासह महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या गुन्हेगारी प्रकरणांपैकी एका प्रकरणावर पुणे सत्र न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे.
न्यायालयाचा निर्णय अतिशय योग्य
न्यायालयाने अतिशय योग्य निर्णय घेतला, अशा नराधमांना समाजात राहण्याचा कुठलाच अधिकार नाही. माननीय न्यायालयाचे मनापासून आभार मानतो.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
अशा नराधमांना जगण्याचा अधिकारच नाही!
हे कायद्याचे राज्य आहे आणि इथे गुन्हेगारांना कोणतेही अभय नाही. या निकालाने न्याय मिळाला असून, महिलांवर आणि बालिकांवर अत्याचार करणाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाला आहे. यापुढे कुणी असे घृणास्पद कृत्य करण्यास धजावणार नाही, असा हा कडक इशारा आहे. अशा नराधमांना समाजात किंवा कायद्याच्या राज्यात कोणतीही जागा नाही. त्यांना जगण्याचा अधिकारच नाही! महिला, मुली आणि लहान बालिकांविरुद्ध होणाऱ्या अत्याचारांविरोधात महायुती सरकारची भूमिका सदैव कठोर राहिली आहे. प्रत्येक मुलगी आणि महिला सुरक्षित वातावरणात जगावी, यासाठी सरकार सातत्याने प्रभावी उपाययोजना राबवत आहे. जलद तपास, फास्ट ट्रॅक न्यायालयीन प्रक्रिया आणि कठोर शिक्षा यांसाठी सरकार कटिबद्ध आहे.
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
नरधमीवृत्तीच्या गुन्हेगारांविरोधात कारवाई सुरूच राहणार
न्यायालयाने दिलेला निर्णय हा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा आहे. अशा अमानुष कृत्यांना समाजात कोणतीही जागा नाही. प्रत्येक महिला व मुलीची सुरक्षितता ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असून, अशा गुन्ह्यांविरोधात कठोर कारवाईचा निर्धार कायम राहील. न्याय मिळाला, पण अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी समाज आणि प्रशासनाने एकत्रितपणे अधिक सजग राहण्याची गरज आहे. अत्याचार आणि हत्येसारख्या अमानुष गुन्ह्यांना कोणतीही माफी नाही. न्यायालयाने दिलेला निर्णय हा न्यायव्यवस्थेवरील विश्वास बळकट करणारा आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आपले सरकार कटिबद्ध असून, अशा नरधमीवृत्तीच्या गुन्हेगारांविरोधात कठोरात कठोर कारवाई सुरूच राहील.
- सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री
नराधम प्रवृत्तींवर कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी दिशादर्शक निकाल
नसरापूर प्रकरणातील नराधमास न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा खऱ्या अर्थाने पीडित बालिकेच्या आत्म्यास शांती देणारी आहे. या शिक्षेने पीडित कुटुंबाची झालेली हानी, या न्यायप्रक्रियेला सामोरे जाताना पीडित कुटुंबाला झालेल्या अनंत वेदना कधीही भरून येऊ शकत नाही याची जाणीव आहे, मात्र समाजासाठी शाप असलेल्या अशा नराधम प्रवृत्तींवर कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी हा निकाल दिशादर्शक ठरेल हा मला विश्वास आहे.
- आदिती तटकरे, महिला व बालकल्याण मंत्री