जळगावातील काही भागांमध्ये एकेकाळी कम्युनिस्टांचे प्राबल्य होते. अशा प्रतिकूल वातावरणात निर्भयपणे संघकार्य उभे करून कम्युनिस्टांची दहशत संपविण्यात मोलाची भूमिका बजावणारे स्वयंसेवक म्हणजे कै. नारायण तथा दादा मराठे. संघनिष्ठा, धैर्य आणि राष्ट्रकार्याला समर्पित त्यांचे जीवन आजही स्वयंसेवकांसाठी प्रेरणादायी आहे.
जळगाव शहरातील शिवाजीनगर, शाहूनगर, वाल्मिकनगर आणि शनिपेठेतील गुरुनानकनगर हे परिसर एकेकाळी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रभावाखाली होते. या भागांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य करणे म्हणजे सतत संघर्षाला सामोरे जाणे. कम्युनिस्टांच्या दहशतीमुळे अनेक जण संघकार्य करण्यास कचरत असत. अशा प्रतिकूल परिस्थितीत संघकार्याची मशाल हातात घेऊन निर्भयपणे उभे राहिले ते कै. नारायण तथा दादा मराठे. आपल्या धैर्य, संघनिष्ठा आणि सातत्यपूर्ण कार्यामुळे त्यांनी या भागातील कम्युनिस्टांचे वर्चस्व संपुष्टात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे त्या परिसरात हिंदुत्ववादी विचारांची भक्कम पायाभरणी झाली आणि संघकार्याला नवी दिशा मिळाली.
दादांचा जन्म ८ जून १९३३ रोजी एका अत्यंत सामान्य कुटुंबात झाला. घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. वडील गुरांच्या बाजारात नोकरी करत, तर आई सुईणीचे काम करून संसाराला हातभार लावत असे. कष्ट, प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान यांचे संस्कार त्यांना घरातूनच लाभले. दादांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जळगावच्या भगिरथ इंग्लिश स्कूलमध्ये झाले. लहानपणापासूनच त्यांना व्यायाम, खेळ आणि विशेषतः कबड्डीची प्रचंड आवड होती. शरीरसंपदा, शिस्त आणि संघभावना यांचा संगम त्यांच्या स्वभावात बालपणापासूनच दिसून येत होता.
बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर घरच्या परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेणे शक्य झाले नाही. त्यांनी भारतीय रेल्वेत कॅबिनमन म्हणून नोकरी स्वीकारली. नोकरी सांभाळत असतानाच त्यांनी संघकार्याची अखंड साधना सुरू ठेवली. याच काळात त्यांचा विवाह वत्सलाबाई यांच्याशी झाला. संसार आणि समाजकार्य यांचा सुंदर समतोल त्यांनी आयुष्यभर राखला. दादांचे औपचारिक शिक्षण मर्यादित असले तरी त्यांचे खरे विद्यापीठ म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा होती. शाखेतील नियमित उपस्थिती, शिस्त, स्वयंशिक्षण आणि कार्यकर्त्यांमधील सततचा सहवास यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रभावी बनले.
त्यांना शारीरिक विभागाची विशेष आवड होती. दंड हा त्यांचा अत्यंत आवडीचा विषय होता. अनेक संघशिक्षा वर्गांमध्ये त्यांनी दंडाचे प्रशिक्षण दिले. त्यांच्या शिकवण्यातील अचूकता, उत्साह आणि शिस्त यामुळे अनेक स्वयंसेवक प्रेरित झाले. घोष विभागातही त्यांचे मोठे योगदान होते. ते उत्कृष्ट आनकवादक होते आणि दीर्घकाळ घोषप्रमुख म्हणून त्यांनी काम केले. घोषाच्या माध्यमातून संघकार्य अधिक प्रभावी करण्यासाठी त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवले. संघाच्या प्रत्येक कार्यक्रमात दादा अग्रभागी असत. विशेषतः दरवर्षी होणाऱ्या हेमंत शिबिराच्या तयारीत त्यांचा सिंहाचा वाटा असे.
शिबिर सुरू होण्याच्या चार दिवस आधीच ते शिबिरस्थळी पोहोचत. मंडप उभारणी, स्वच्छता, व्यवस्था, साहित्य मांडणी, स्वयंसेवकांचे नियोजन अशा प्रत्येक कामात ते स्वतः पुढाकार घेत. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते, ही भावना त्यांनी कृतीतून दाखवून दिली. १९७५ मध्ये देशात आणीबाणी लागू झाल्यानंतर संघाच्या हजारो कार्यकर्त्यांप्रमाणे दादांनाही शासनाने अटक केली. त्यांना सहा महिने नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. त्यावेळी त्यांची मुले लहान होती. घरातील सर्व जबाबदारी पत्नी वत्सलाबाईंवर आली. अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी संसाराचा गाडा समर्थपणे चालवला. दुसरीकडे कारागृहात असतानाही दादांची राष्ट्रनिष्ठा आणि संघावरील श्रद्धा डळमळली नाही.
रेल्वेतील नोकरी शिफ्टनिहाय असल्याने अनेकदा त्यांना रात्रपाळी करावी लागत असे. परंतु रात्रभर काम करूनही ते थेट प्रभात शाखेत उपस्थित राहत. थकवा, विश्रांती किंवा वैयक्तिक सोयी यांना त्यांनी कधीही संघकार्याच्या आड येऊ दिले नाही. त्यांची शारीरिक क्षमता आणि कार्यतत्परता पाहून काही काळ त्यांच्यावर जिल्हा शारीरिक शिक्षण प्रमुखाची जबाबदारीही सोपविण्यात आली. पुढे त्यांना भारतीय विचार साधनेचे दायित्व देण्यात आले. वैचारिक साहित्य समाजापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी अत्यंत निष्ठेने केले. याचबरोबर दैनिक तरुण भारत आणि साप्ताहिक विवेक यांच्या प्रसाराचे कार्यही त्यांनी उत्साहाने केले. राष्ट्रवादी विचार जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले.
दादांनी एका वर्षासाठी धुळे शहरात पूर्णवेळ विस्तारक म्हणून काम केले. नवीन शाखा सुरू करणे, कार्यकर्ते घडवणे, संपर्क वाढवणे आणि संघकार्याचा विस्तार करणे ही जबाबदारी त्यांनी अत्यंत यशस्वीपणे पार पाडली. सन २००० मध्ये वत्सलाबाईंची प्रकृती अत्यंत खालावली. दादांनी सर्व संघकार्य सांभाळत पत्नीची मनोभावे सेवा केली. उत्तम उपचारासाठी त्यांना मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि १४ सप्टेंबर २००० रोजी वत्सलाबाईंचे निधन झाले. पत्नीच्या निधनाचा मोठा आघात असूनही दादांनी स्वतःला खचू दिले नाही. वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून त्यांनी पुन्हा पूर्ण क्षमतेने संघकार्य सुरू ठेवले.
नवीन प्रांतरचनेनंतर देवगिरी प्रांताची स्थापना झाली. या काळात त्यांनी प्रांत कार्यालय प्रल्हाद भवन येथे काही काळ जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जळगाव आणि भुसावळ येथील संघ कार्यालयांमध्येही त्यांनी निष्ठेने कार्य केले. संघकार्यालय म्हणजेच आपले घर, अशी त्यांची भावना होती.
२२ ऑगस्ट २००६ चा दिवस. नेहमीप्रमाणे पहाटे ते शिवाजी प्रभात शाखेत गेले. शाखा संपल्यानंतर त्यांनी एकनाथराव जाधव यांना सांगितले, "मी भुसावळ कार्यालयात कामासाठी जात आहे." भुसावळ येथे पोहोचल्यानंतर एस.टी. स्थानकाजवळ त्यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि कार्यरत अवस्थेतच त्यांची प्राणज्योत मालवली. संघकार्य करत असतानाच आलेला हा मृत्यू त्यांच्या अखंड कर्मयोगी जीवनाचा जणू स्वाभाविक शेवट ठरला. दादांच्या पश्चात तीन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. सर्वजण आपापल्या संसारात स्थिरस्थावर झाले असून दादांनी आयुष्यभर जपलेले राष्ट्रसेवा, संघनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीचे संस्कार त्यांनीही जपले आहेत.
कै. नारायण तथा दादा मराठे हे केवळ शाखेवर जाणारे स्वयंसेवक नव्हते, तर संघविचार जगणारे कार्यकर्ते होते. मर्यादित शिक्षण, सामान्य आर्थिक परिस्थिती, कठीण नोकरी, आणीबाणीतील कारावास, पत्नीचा वियोग आणि अनेक संकटे यांवर त्यांनी संघनिष्ठा, परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर मात केली. कम्युनिस्टांच्या दहशतीने ग्रासलेल्या जळगावातील वस्त्यांमध्ये संघकार्य रुजविणे, असंख्य स्वयंसेवक घडविणे, शारीरिक आणि घोष विभागाला बळकटी देणे, वैचारिक साहित्याचा प्रसार करणे आणि शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रकार्य करत राहणे, हे त्यांच्या जीवनाचे वैशिष्ट्य ठरले. त्यांचे संपूर्ण जीवन हे संघाच्या स्वयंसेवकांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. संकटांपुढे न झुकता ध्येयासाठी अखंड कार्यरत राहणारा स्वयंसेवक कसा असावा, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कै. नारायण तथा दादा मराठे. त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील अनेक पिढ्यांना राष्ट्रसेवा, समाजकार्य आणि संघनिष्ठ जीवनाचा मार्ग दाखवत राहील.