मुंबई : (Mohan Bhagwat India's Voice) "संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी भारताच्या समग्र जीवनदृष्टीवर आधारित विचार जगासमोर मांडले गेले पाहिजेत. भारताचा आवाज जगाने ऐकणे अपरिहार्य आहे", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. भारतीय शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० ची अंमलबजावणी : भारतीय ज्ञान-प्रणालींचा समावेश' या तीन दिवसीय अखिल भारतीय प्रांत टोळी बैठकीच्या समारोप सत्रात ते बोलत होते. आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटर, बंगळुरू येथे झालेल्या या बैठकीत त्यांनी भारताच्या समग्र जीवनदृष्टीचे महत्त्व अधोरेखित करत, आज जग ज्या प्रश्नांची उत्तरे शोधत आहे ती भारताच्या सर्वसमावेशक तत्त्वज्ञानात असल्याचे त्यांनी सांगितले.
उपस्थितांना संबोधित करताना सरसंघचालक म्हणाले, भारतीय शिक्षण मंडळाचे कार्य हे केवळ एका संस्थेचे काम नसून, जगाला पूर्णत्वाकडे नेणाऱ्या व्यापक सांस्कृतिक आणि वैचारिक अभियानाचा भाग आहे. भारत इतर कोणत्याही विचारप्रणालीला चुकीचे मानत नाही. प्रत्येक समाज आपल्या जीवनानुभवातून आपली विचारप्रणाली घडवतो आणि त्यालाही स्वतःचे महत्त्व असते. भारतीय तत्त्वज्ञानातील 'अनेकता' या संकल्पनेत सर्व अनुभवांचे स्वागत आहे, कारण सत्य इतके व्यापक आहे की ते एका दृष्टिकोनात पूर्णपणे सामावू शकत नाही. त्यामुळे वादविवादाऐवजी 'शास्त्रार्थ', म्हणजेच विद्वत्तापूर्ण संवादातून प्रत्येक विचारातील सार स्वीकारण्याची भारतीय परंपरा आहे. याच समग्रतेमुळे भारताची भूमिका वैशिष्ट्यपूर्ण आहे.(Mohan Bhagwat India's Voice)
भारतीय शिक्षण मंडळाचे कार्य हे भारतीय मूल्यांवर आधारित सर्वसमावेशक शिक्षणव्यवस्था उभारण्याच्या व्यापक राष्ट्रीय ध्येयाशी जोडलेले आहे. ही शिक्षणदृष्टी केवळ उपजीविकेपुरती मर्यादित नसून, मानवी जीवनाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देते. प्रत्येक गोष्टीचे मूल्य केवळ पैशाच्या निकषावर मोजण्याऐवजी संपूर्ण मानवकेंद्री दृष्टिकोन स्वीकारते, असे सरसंघचालकांनी सांगितले.
भारतीय शिक्षण मंडळ कोणत्याही राजकीय पक्षापासून स्वतंत्र असल्याचेही सरसंघचालकांनी स्पष्ट केले. स्वातंत्र्यलढ्यातील अनेक थोर नेत्यांनीही अशा प्रकारचे सामाजिक आणि वैचारिक कार्य राजकीय पक्षांपासून वेगळे ठेवले होते, याची आठवण करून देत ते म्हणाले, अशा प्रकारचे कार्य राजकीय पक्षांसोबत राहून योग्य प्रकारे करता येत नाही. भारतीय मूल्यांशी असलेली निष्ठा, स्वायत्तता आणि विश्वाच्या पूर्णत्वाची संकल्पना हीच भारतीय शिक्षण मंडळाची वैशिष्ट्ये आहेत.
याप्रसंगी डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते भारतीय शिक्षण मंडळाच्या नव्या संकेतस्थळाचेही उद्घाटन करण्यात आले. या माध्यमातून भारतीय शिक्षणाची संकल्पना देश-विदेशातील शिक्षक, संशोधक, अभ्यासक आणि नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. समारोप कार्यक्रमाला भारतीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. सच्चिदानंद जोशी, अखिल भारतीय महामंत्री डॉ. भारतशरण सिंह यांच्यासह देशभरातील सुमारे ३८० प्रतिनिधी, शिक्षणतज्ज्ञ, प्राध्यापक, संशोधक आणि अभ्यासक उपस्थित होते.(Mohan Bhagwat India's Voice)
भारतीय शिक्षण मंडळाच्या या तीन दिवसीय बैठकीचे उद्घाटन कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते झाले होते. भारतीय मूल्ये, संस्कृती आणि ज्ञानपरंपरेवर आधारित शिक्षणव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी देशभरातील कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ आणि अभ्यासक यांना विचारमंथनाचे व्यासपीठ या बैठकीमुळे उपलब्ध झाले.(Mohan Bhagwat India's Voice)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक