फैसला ‘ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम’

    29-Jun-2026   

Messi vs Ronaldo GOAT Debate
 
फुटबॉलविश्वातील गेली जवळपास दोन दशके चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी दोन नावे म्हणजे लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो. या दोघांमधील ‘ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम’ (GOAT) वाद कदाचित कधीच संपणार नाही. पण यंदाच्या ‘फुटबॉल विश्वचषक २०२६’ स्पर्धेत जगाला पडलेल्या ‘ग्रेटेस्ट कोण’ या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची शयता आहे. विशेष म्हणजे, हा सामना स्पर्धेच्या कोणत्याही टप्प्यावर नाही, तर फक्त आणि फक्त विश्वचषकाच्या अंतिम फेरीतच होऊ शकतो आणि हो जर असे झाले, तर हा सामनाही ‘ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम’ असाच असेल.
 
स्पर्धेच्या ‘ड्रॉ’ची रचना अशी करण्यात आली आहे की पोर्तुगाल आणि अर्जेंटिना यांचे मार्ग पूर्णपणे वेगळे आहेत. त्यामुळे उपांत्य फेरीपर्यंत हे दोन्ही संघ एकमेकांसमोर येऊच शकत नव्हते. पण आता अंतिम ३२ संघांची जो ‘ड्रॉ’ तयार झाल्यामुळे आता थेट हे संघ अंतिम फेरीतच आमने-सामने येतील.
 
पोर्तुगालने गट ‘के’मध्ये कोलंबियाविरुद्ध गोलशून्य बरोबरी करत उपविजेतेपद मिळवले. आता त्यांच्यासमोर क्रोएशियासारखे बलाढ्य आव्हान उभे आहे. तेथून पुढे स्पेन, त्यानंतर संभाव्य बेल्जियम आणि मग फ्रान्स किंवा जर्मनीसारख्या युरोपीय महासत्तांना हरवतच त्यांना अंतिम फेरी गाठावी लागणार आहे.
 
दुसरीकडे, अर्जेंटिनाने गट ‘जे’मध्ये अव्वल स्थान पटकावत बाद फेरीत प्रवेश केला आहे. त्यांचा पहिला सामना स्पर्धेतील सर्वांत मोठा आश्चर्यकारक संघ ठरलेल्या केप व्हर्डेविरुद्ध आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया किंवा इजिप्त, पुढे कोलंबिया आणि उपांत्य फेरीत ब्राझील किंवा नेदरलॅण्ड्ससारख्या प्रतिस्पर्ध्यांचा सामना करण्याची शक्यता आहे.
 
दोन्ही संघांची वाटचाल वेगवेगळ्या दिशांनी होत असल्याने, ते कितीही सामने जिंकले, तरी अंतिम फेरीपूर्वी त्यांची गाठ पडणार नाही. म्हणजेच, विश्वचषकाच्या सुवर्णचषकासाठी मेस्सी आणि रोनाल्डो समोरासमोर उभे राहू शकतात, तो एकमेव क्षण म्हणजे अंतिम सामना!
 
हो, एक अपवाद आहे. जर दोन्ही संघ उपांत्य फेरीत पराभूत झाले, तर तिसर्‍या क्रमांकाच्या सामन्यात त्यांची भेट होऊ शकते. पण त्या सामन्याला विश्वविजेतेपदाचे महत्त्व नसेल.
 
यामुळे आता जगभरातील फुटबॉल चाहत्यांच्या नजरा एका स्वप्नवत अंतिम सामन्याकडे लागल्या आहेत. फुटबॉलच्या आधुनिक इतिहासाला आकार देणारे हे दोन महानायक त्यांच्या कारकिर्दीच्या संध्याकाळी विश्वचषकाच्या अंतिम रंगमंचावर एकमेकांसमोर उभे राहतील का, हा प्रश्न प्रत्येक चाहत्याच्या मनात आहे.
 
कल्पना करा... एका बाजूला रोनाल्डो, दुसर्‍या बाजूला मेस्सी... आणि मधोमध विश्वचषकाची सुवर्ण ट्रॉफी!
 
फुटबॉल इतिहासाला यापेक्षा अधिक रोमांचकारी आणि भावनिक शेवट कदाचित मिळूच शकणार नाही! आता या स्वप्नवत अंतिम लढतीसाठी दोन्ही संघांनी आपापला कठीण प्रवास यशस्वीपणे पार करणे आवश्यक आहे. जगभरातील कोट्यवधी चाहत्यांप्रमाणेच फुटबॉललाही या अंतिम भेटीची प्रतीक्षा आहे.




संबंधित मजकूर