मुंबई (विशेष प्रतिनिधी) - राज्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून सोडलेल्या भारतीय गिधाडाने (लाँग-बिल्ड व्हल्चर) तब्बल ३ हजार किलोमीटरचे अंतर पार करून राजस्थानातील रणथंभोर व्याघ्र प्रकल्प गाठला आहे (melghat vulture). विशेष म्हणजे या प्रवासादरम्यान या गिधाडाने मध्य प्रदेशातील पचमढी जवळील सातपुडा व्याघ्र प्रकल्प तसेच भारतातील चित्त्यांचे नवीन अधिवास असलेल्या कुनो राष्ट्रीय उद्यानालाही भेट दिली आहे (melghat vulture). 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने (बीएनएचएस) 'जीपीएस टॅग' लावून या गिधाडाला मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सोडले होते. (melghat vulture)
देशातून नामशेष होण्याच्या वाटेवर असणाऱ्या गिधाडांच्या संवर्धनासाठी 'बीएनएचएस' गेल्या कित्येक वर्षांपासून काम करत आहेत. याअंतर्गत हरिणायातील पिंजोर येथे 'बीएनएचएस'ने गिधाड प्रजनन केंद्र उभारले आहे. या केंद्रात प्रजनन करण्यात आलेल्या गिधाडांना राज्यातील पेंच, ताडोबा आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरित करुन त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येत आहे. यामधील X67 या क्रमांकाच्या मादी भारतीय गिधाडाला २ जानेवारी २०२६ रोजी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सोमठाणा परिक्षेत्रातून मुक्त करण्यात आले होते. मुक्त केल्यानंतर हे गिधाड सुमारे चार महिने सोडलेल्या परिसरातच मृत प्राण्यांवर उपजीविका करत राहिले. यादरम्यान त्याने नैसर्गिक परिस्थितीशी जुळवून घेतले. २८ मे रोजी X67 ने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा परिसर सोडून मध्य भारतातील दीर्घ भ्रमंतीस सुरुवात केल्याची माहिती बीएनएचएसचे जीवशास्त्रज्ञ भास्कर दास यांनी दिली. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांतून प्रवास करत हे गिधाड अखेरीस रणथंभोर राष्ट्रीय उद्यानात पोहोचले. २७ दिवसांच्या कालावधीत त्याने एकूण ३ हजार ३३४ किमी अंतर पार केले. या प्रवासादरम्यान त्याने सातपुडा राष्ट्रीय उद्यान, भोपाळ परिसर आणि कुनो राष्ट्रीय उद्यान येथे तात्पुरते मुक्काम केला.
बीएनएचएसचे संचालक किशोर रिठे यांनी सांगितले की, X67 हे गिधाड जंगलात कोणत्याही पूरक खाद्यपुरवठ्याशिवाय यशस्वीरित्या जिवंत राहिले आहे. यामुळे बंदिस्त प्रजननातून वाढविलेली गिधाडे नैसर्गिक अधिवासाशी जुळवून घेऊ शकतात, स्वतः अन्न शोधू शकतात आणि लांब पल्ल्याचे स्थलांतर करू शकतात, हे सिद्ध झाले आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधून मुक्त केलेल्या सर्व १५ गिधाडांच्या पायात ओळख क्रमांक असलेल्या निळ्या रंगाच्या रिंग बसविण्यात आल्या आहेत. निळा रंगाचे रिंगिंग हे भारतामध्ये केल्याचे दर्शविते, तर “M” हे अक्षर महाराष्ट्र हे मुक्तीस्थळ असल्याचे सूचित करते. गिधाडांना बसविण्यात आलेले सौरऊर्जेवर चालणारे जीपीएस टॅग हे त्यांची हालचाल, प्रवासाचे अंतर, सुरक्षितता आणि जंगलातील जगण्याची क्षमता यांचे वैज्ञानिक निरीक्षण करण्यास मदत करत आहेत.