सिंधुदुर्गात दुर्मीळ मलायन रात ढोकरीचे आगमन; विणीसाठी पावसाळा घालवणार
29-Jun-2026
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सिंधुदुर्गात पावसाळा घालवण्यासाठी दक्षिण पश्चिम घाटामधून मलायन रात ढोकरी पक्ष्याचे आगमन झाले आहे (malayan night heron). गेल्या दहा वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक स्थलांतर करुन येणाऱ्या या पक्ष्याची नोंद पक्षीनिरीक्षकांमार्फत होत आहे (malayan night heron). राज्यात फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केवळ तीन तालुक्यांमध्येच हा पक्षी पावसाळ्यात स्थानिक स्वरुपाचे स्थलांतर करुन येतो. (malayan night heron)
मलायन नाईट हेराॅन अर्थात मलायन रात ढोकरी पक्षी दक्षिण आणि आग्नेय आशियातील अनेक देशांत आढळतो. मात्र, भारतात तो ईशान्य भारत आणि पश्चिम घाटातच आढळतो. पश्चिम घाटातही तो प्रामुख्याने दक्षिणेकडे दिसतो. गोवा आणि दक्षिण महाराष्ट्रात हा पक्षी एप्रिल-मे महिन्यापासून दिसायला लागतो. पक्षीतज्ज्ञ आदेश शिवकर यांच्या मते तिबोटी खंड्याप्रमाणेच हा पक्षी विणीसाठी दक्षिण पश्चिम घाटातून महाराष्ट्रात स्थानिक स्वरुपाचे स्थलांतर करुन येतो. सिंधुदुर्गचे पक्षीनिरीक्षक प्रवीण सातोसकर यांचे गेल्या १० वर्षातील या पक्ष्याविषयीचे निरीक्षण याकडेच अधोरेखित करते. महाराष्ट्रात ही पक्षी पावसाळी हंगामात केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ आणि दोडामार्ग या तालुक्यात दिसतो. तो घनदाट जंगलातील पाण्याच्या झऱ्यांच्या ठिकाणी राहणे पसंत करतो. दोडामार्गातील तळकट वनउद्यानात तो घरटी बांधून वीण करत असल्याचे निरीक्षण सातोसकर यांनी टिपले आहे.
झाडांच्या उंच फांद्यांवर काटक्या व पानांचे घरटे बांधतो. नर आणि मादी मलायन नाईट हेरॉन दिसायला बहुतांश सारखेच असतात, म्हणजेच त्यांच्यामध्ये उघडपणे कोणताही मोठा शारीरिक फरक नसत. मात्र, विणीच्या हंगामात त्यांच्यात काही सूक्ष्म बदल दिसून येतात, ज्यावरून नर आणि मादी ओळखता येऊ शकतात. खास करुन नराच्या डोक्यावरील काळा तुरा मादीच्या तुलनेत थोडा जास्त लांब आणि अधिक गडद असतो. अत्यंत लाजाळू व एकाकी स्वभावाचा हा बगळा दिवसा झाडांच्या दाट फांद्यांमध्ये विश्रांती घेतो. संध्याकाळी खाद्य शोधण्यासाठी बाहेर पडतो. त्याचे मोठे डोळे आणि रात्रीची सक्रियता त्याला अंधारात शिकार करण्यास मदत करतात. अत्यंत गुप्तपणे राहणारा हा पक्षी असल्यामुळे त्याचे निरीक्षण करणे कठीण असते. सध्या हा पक्षी दोडामार्गातील वनउद्यानात अत्यंत गुप्तपणे तळ ठोकून आहे.