
एरवी पावसाच्या आगमनानंतर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गुजरातला परतणारे फ्लेमिंगो अजूनही नवी मुंबईतील सीवूड्सयेथील एनआरआय पाणथळीवर ठिय्या मांडून आहेत. तसेच टी.एस. चाणक्य पाणथळीवर हजाराहून अधिक किनारी पक्षी विश्रांती घेताना आणि एकत्रित थव्यांमध्ये आकाशात उडताना दिसत आहेत. या पक्ष्यांमध्ये सुमारे ७०० ते ८०० च्या संख्येत लहान आणि तिबेटी सँड प्लोव्हर, मोठ्या संख्येने ग्रेटर सँड प्लोव्हर तसेच कमी संख्येत कर्ल्यू सँडपायपर, रुडी टर्नस्टोन आणि टेरेक सँडपायपर यांचा समावेश आहे. पक्षीतज्ज्ञ, मुंबई बर्ड कट्टा संस्थापक आणि महाराष्ट्रातील आशियाई जलपक्षी गणनेचे राज्य समन्वयक डॉ. राजू कसंबे यांनी २१ जून २०२६ रोजी या पाणथळ भागांना भेट दिली. त्यांनी टी.एस. चाणक्य पाणथळीवर सुमारे ७,५०० लहान रोहित आणि ५० ते ६० मोठे रोहित यांची नोंद केली. याविषयी डॉ. कसंबे यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात टी.एस. चाणक्य पाणथळीवर २,५०० हून अधिक किनारी पक्षी आढळले होते. नवी मुंबईतील उत्साही पक्षीनिरीक्षक डॉ. मुरली पोडुवल यांनी २१ जून २०२६ रोजी येथे तीन रुडी टर्नस्टोन पाहिले. विशेष म्हणजे, २२ जून २०२६ पर्यंत मुंबईत मान्सून पूर्णपणे दाखल झाला नव्हता आणि उन्हाचा तडाखा कायम होता.
तिबेटी सँड प्लोव्हर वगळता इतर सर्व लहान किनारी पक्षी हे मुंबईहून अत्यंत दूरच्या प्रदेशांत प्रजनन करतात. लहान आणि तिबेटी सँड प्लोव्हर हे मंगोलिया, तिबेट, चीन, किर्गिझस्तान, ताजिकिस्तान, अफगाणिस्तान आणि हिमालयीन प्रदेशात प्रजनन करतात. ग्रेटर सँड प्लोव्हर हे पश्चिम चीन, मंगोलिया, दक्षिण सायबेरिया (तुवा), कझाकस्तान आणि मध्य आशियातील अल्ताई पर्वतरांगांमध्ये प्रजनन करतात. कर्ल्यू सँडपायपर हे उत्तर सायबेरियातील आर्क्टिक प्रदेश, चुकोटका द्वीपकल्प आणि दक्षिण टुंड्रा प्रदेशात प्रजनन करतात. विशेष म्हणजे, हिमालयीन आणि त्याही उत्तरेकडील दूरस्थ प्रदेशांत प्रजनन करणारे इतर बहुतांश पक्षी आतापर्यंत आपल्या प्रजननस्थळी पोहोचले असतील आणि त्यांपैकी अनेक सध्या आपल्या पिल्लांचे संगोपनही करत असतील. पक्षीनिरीक्षकांच्या निरीक्षणावरुन स्पष्ट होते की, सँड प्लोव्हर पक्ष्याच्या रंग त्यांच्या आकर्षक प्रजनन रंगामध्ये परावर्तित झाला आहे. तर एकमेव टेरेक सँडपायपर आणि तीन कर्ल्यू सँडपायपर हे अजूनही अप्रजनन रंगात आहेत. पूर्वीच्या नोंदींचा संदर्भ देताना डॉ. कसंबे सांगतात की, या प्रजातींपैकी काही पक्षी जून-जुलै महिन्यांत मुंबई परिसरातयापूर्वीही आढळले आहेत. मात्र इतक्या मोठ्या थव्यांमध्ये त्यांचे दर्शन होणे हे एक गूढ आणि अभ्यासाची गरज असलेले निरीक्षण आहे.
मागील काही वर्षांतही मुंबईतील पाणथळ भागांमध्ये काही किनारी पक्ष्यांचा मुक्काम वाढलेला दिसून आला होता. परंतु यावर्षी जूनच्या उत्तरार्धापर्यंत एवढ्या मोठ्या संख्येने पक्षी टिकून राहणे अत्यंत उल्लेखनीय आहे. सामान्यतः तिबेटी सँड प्लोव्हर, कॉमन रेडशँक आणि कॉमन सँडपायपर यांसारख्या काही प्रजातीच अपेक्षेपेक्षा जास्त काळ थांबतात. मात्र यंदा अनेक दूरवर स्थलांतर करणाऱ्या प्रजातींनीही परतीचा प्रवास उशिरा सुरू केला आहे. यामागे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे मुंबई परिसरात उशिरा आलेला मान्सून आणि हवामानातील अस्थिर बदल. - आदेश शिवकर, पक्षीतज्ज्ञ