मुंबई (अक्षय मांडवकर) - कोकण किनारपट्टीवरील समुद्री कासवांच्या विणीच्या यंदाच्या हंगामात सर्वाधिक घरटी रत्नागिरी जिल्ह्यात आढळून आली (konkan sea turtle). मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कासव विणीचा जन्मदर तीन जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नोंदविण्यात आला आहे (konkan sea turtle). यंदा राज्यातील ५६ समुद्रकिनान्यांवरुन एकूण १ हजार ७२४ कासवांच्या घरट्यांची नोंद करण्यात आली (konkan sea turtle). या घरट्यांमधील तब्बल १ लाख ८ हजार ५९६ कासवांच्या पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आलेले असून एकूण उबवण यशाचे प्रमाण ६१.२० टक्के नोंदविण्यात आले आहे. (konkan sea turtle)
महाराष्ट्र वन विभागांतर्गत कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान आणि स्थानिक कासव मित्र यांच्या संयुक्त सहभागातून दरवर्षी कोकण किनारपट्टीवरील समुद्री कासव संवर्धनाचे काम चालते. नोव्हेंबर ते मार्च या कासव विणीच्या काळात ऑलिव्ह रिडले समुद्र कासवांच्या घरट्यांचे संरक्षण आणि संवर्धन केले जाते. संवर्धन कार्यक्रमांतर्गत २०२५-२६ हंगामात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनाऱ्यांवरुन एकूण १ लाख ८ हजार ५९६ कासवांच्या पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आले. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक ९६४ घरटी नोंदविण्यात आली असून त्यामधून ५४ हजार २२७ पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७३८ घरट्यांमधून ५३ हजार ३२५ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. तर रायगड जिल्ह्यात २२ घरट्यांमधून १ हजार ४४ पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले. जरी रत्नागिरी जिल्ह्यात घरटी आणि सोडलेल्या पिल्लांची संख्या सर्वाधिक असली तरी सरासरी पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरट्यांमधून चांगल्या प्रमाणात पिल्ल जन्मेलेली आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वाधिक उबवण यशाचे प्रमाण हे ६९.९५ टक्क्यांसह सिंधुदुर्गातून नोंदविण्यात आले आहे.
यंदाच्या हंगामात रायगड जिल्ह्यातील आरावी, रत्नागिरी जिल्ह्यातील वेळणेश्वर, बरवडे, नेवरे, ढोकामळे, पूर्णगड, सालदुरे/पानंदे, कचरे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दाभोळी, कोंडुरा या समुद्रकिनाऱ्यांवर प्रथमच कासवांचे घरटी आढळून आली. रत्नागिरी जिल्ह्यातील घसरलेला उबवण दर पाहता कांदळवन कक्ष दक्षिण कोकण विभागाकडून जिल्ह्यात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकींमध्ये कासव मित्रांची कार्यपद्धती, नैसर्गिक घरट्यांमधील अंडी स्थानांतरित करण्याची वेळ अशा महत्त्वपूर्ण बाबाींवर उहापोह केला जाईल.
२०२५ साली कांदळवन कक्ष दक्षिण कोकण विभागाने भारतीय वन्यजीव संस्थानच्या विशेष प्रकल्पाअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारी अंडी घालण्यासाठी आलेल्या ६२ सागरी कासवांना फ्लिपर टॅग लावले होते. खास करुन गुहागर किनाऱ्यांवर अंडी घालण्यासाठी आलेल्या मादी कासवांना हे टॅग लावण्यात आले होते. गुहागर किनारी टॅग केलेल्या माद्यांपैकी सहा माद्या या २०२६ च्या विणीच्या हंगामात पुन्हा गुहागरच्या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आल्या. तर एक मादी दापोलीच्या मुरड किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आली होती.
तात्पुरते उपचार केंद्र
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर किनाऱ्यांवर जखमी अवस्थेत कासवे आणि सागरी जीव वाहून येतात. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी यंदा कांदळवन कक्ष दक्षिण कोकण विभागाकडून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तात्पुरत्या स्वरुपाचे उपचार केंद्राची उभारणी केली जाणार आहे. जेणेकरुन या जीवांना मुंबईपर्यंत पाठवावे लागणार नाही. कायमस्वरूपी उपचार केंद्राचा प्रस्ताव हा पुढील कारवाईकरिता पाठविण्यात आला आहे. - कांचन पवार, विभागीय वन अधिकारी, कांदळवन कक्ष दक्षिण कोकण विभाग