कोकणचे कातळसौंदर्य

    29-Jun-2026
 

Konkan Laterite Plateaus
 
पहिल्या पावसाच्या सरींनी कोकणातील लाल जांभ्या कातळांना स्पर्श केला की ओसाड वाटणारा सडा क्षणात रंगीबेरंगी फुलांच्या गालिच्यात रूपांतरित होतो. अवघ्या काही आठवड्यांच्या आयुष्यात शेकडो दुर्मीळ वनस्पती, कीटकभक्षी प्रजाती आणि सूक्ष्म परिसंस्था येथे बहरून येतात. निसर्गाचा हा अल्पायुषी पण अन्मोल चमत्कार म्हणजेच, कोकणच्या सड्यांचे अद्वितीय कातळसौंदर्य.
 
कोकणात पाऊस पडायला सुरुवात झाली की ओसाड माळरानाचा, किंचित खाचर्‍यांनी भरलेला कातळी प्रदेश एका नवीन परिसंस्थेला जन्म देतो, त्यालाच ‘सडा’ असे म्हटले जाते. उन्हाळ्याच्या दिवसांत ओसाड पडलेला हा प्रदेश पावसाळ्यात आपल्या वैविध्यतेने कोकणातील निसर्गसौंदर्यात अधिकच भर घालतो. जांभ्या कातळाचा किंचित मातीचा थर असलेला हा भूभाग पावसाळ्यात वनस्पती, सूक्ष्मजीव यांचे आश्रयस्थान बनून जातो. आपण कल्पनाही करू शकणार नाही, इतया वनस्पतींच्या प्रजाती कोकणातील सड्यांची शोभा वाढवत आहेत. कोकणातील प्रत्येक सड्याची स्वतःची अशी वेगळी ओळख तेथील सजीवसृष्टीच्या नावीन्यतेने केलेली दिसते. सड्यावरच्या प्रत्येक अधिवासात रानफुलोरा, गवतवर्गीय वनस्पती, त्यावर आढळणारे कीटक पाहणे, ही निसर्गप्रेमींसाठी खर्‍या अर्थाने पर्वणीच असते.
 
रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांशी सड्यांवर प्रामुख्याने दीपकांडी (Dipcadi concanense), सोनकी (Senecio bombayensis), चिचुरकांदा (Habenaria grandifloriformis), रानहळद (Curcuma decipiens) या वनस्पती पाहायला मिळतात. माणसांप्रमाणेच या वनस्पतींमध्येदेखील विविधता दिसून येते. काही सड्यांवर या वनस्पती अगदी दाटीवाटीने वाढलेल्या दिसतात, तर काही ठिकाणी छोट्या-छोट्या खाचरांमध्ये त्या वाढताना दिसतात. प्रवासातून लांबून दिसणार्‍या सड्यांचे मनोहर रूप अगदी जवळ जाऊन पाहिले की त्याहूनही खूप विलक्षण दिसते. विशेषतः रत्नागिरीतील बर्‍याचशा सड्यांवर गुलाबी रंगाचा तवंग घेऊन गुंडण (Neanotis foetida) ही वनस्पतींची प्रजात निसर्गप्रेमींना भुरळ पाडते. त्याचप्रमाणे कंदवर्गीय वनस्पतींमध्ये फोडशी (Chlorophytum borivilianum), सड्यांवरील सौंदर्य अबाधित ठेवण्याचे काम करतात. या वनस्पती साधरण जून-जुलै या दोन महिन्यांच्या अल्प कालावधीतच आपल बीजांकुरण करून कार्यकाळ संपवतात. पुन्हा मधेच हिरवळीच्या गर्द गवताली भागात सीतेची आसव (Utricularia graminifolia) ही कीटकभक्षी वनस्पती आकर्षक निळ्या रंगांच्या पाकळ्यांच्या मदतीने सारा सडा निळाशार करून जाते. उरलेल्या कातळांवरील खाचरांमध्ये मुरडानियाच्या प्रजाती आपल्या तीन जांभळट निळ्या रंगाच्या पाकळ्या फुलवून कातळालादेखील आपली वेगळी ओळख करून देतात.
 
दर कोसावर जशी माणसाची भाषा बदलते, तसेच ठरावीक अंतरावर या वनस्पतीचे रंग, रूप, आकारमान बदलते. ‘केम्प्टोराईझा’सारखी प्रदेशनिष्ठ वनस्पती रत्नागिरीजवळील फणसोपच्या सड्यावर पाहायला मिळाली, तर ती सुमारे ४०-४२ किमी अंतरावर असणार्‍या देवरुखजवळील सड्यांवर पाहायला मिळते. या दोन्ही भागांमधील सड्यांची माहिती घेताना मधे कुठेही या प्रदेशनिष्ठ वनस्पतीचा मागमूसही लागत नाही. वनस्पतींचा अभ्यास करताना त्यांनी स्वतःमध्ये करून घेतलेले बदल, मानवी हस्तक्षेपामुळे सड्यांवरील वनस्पतींची धोक्यात आलेली प्रजात, अन् त्यातूनही मार्ग काढून त्यांनी निर्माण केलेले अधिवास, खरंच खूप काही शिकवून जातात.
 
कोकणात सड्यांचा उपयोग तसा गायी-गुरे चरण्यासाठीच केला जातो. पण अशा निसर्गरम्य सड्यांकडे त्याहून वेगळ्या दृष्टीने कधी पाहिले जात नाही. अनेक सड्यांवर काही वर्षांपूर्वी न दिसणारे बांध आता दिसू लागले आहेत. मात्र, तरीही या वनस्पती यातूनही मार्ग काढत, निसर्गाशी समतोल साधत आपला अधिवास टिकवून उभ्या राहिल्या आहेत. सड्यांवरील फुलोर्‍याचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी विलक्षणच! त्यात तुतारीसारख्या पांढर्‍या शुभ्र फुलांच्या वनस्पती सायंकाळी फुलतात, तर काही ठरावीक वेळेपुरत्याच. मुरडानिया प्रजातीची फुले चुकूनही कधी दुपारी पाहायला गेलात, तर फुललेली दिसणार नाहीत. कातळाच्या फुलांवर सतत भुणभुण करत प्रत्येक फुलावरचा मकरंद गोळा करताना मधमाश्या परागीभवनाची क्रिया सोपी करतात आणि या सड्यांवरील वनस्पतीचे त्यामुळे पुनरुत्पादन होते, तर गवती दवबिंदू (Drosera indica) सारख्या कीटकभक्षी वनस्पती छोट्या छोट्या कीटकांना आपल्या जाळ्यात सहजतेने अडकावतात. सड्यांवर चालताना, डबयातून न्याहाळताना गवतांच्या प्रजातीदेखील शैवालांच्या विळख्यात डौलाने उभ्या असलेल्या दिसतात. हे सारं काही न मिळणारं! एकदा या कोकणातल्या अमूल्य ठेव्याचं दर्शन झालं की त्यातच गढून जावंसं वाटतं. अन् सड्यावरील ही अजब-गजब परिसंस्था पाहताना किती वेळ निघून गेला, याचंही भान राहात नाही.
 
सड्यांवरती बंबाखु (Striga gesnerioides) वनस्पतीची गडद तपकिरी रंगाच्या खोडावर, तांबट निळ्या रंगाची फुले फुललेली दिसली की समजायचं, सडा वनस्पतींच्या वाढीसाठी अगदी पोषक आहे. सड्यांची सफर करताना खाच-खळग्यातून पिवळट, तांबड्या रंगाचा बहरून आलेला रानहळदीचा तुरा क्षणातच वेडा करून जातो. सड्यांवरून चालताना सोनकीच्या पिवळ्या फुलांचा स्पर्श थकवा नाहीसा करतो आणि हे सारं पाहताना सुरुवातीच्या काळात वार्‍याबरोबर डोलणार्‍या दीपकांडीच्या पांढर्‍या शुभ फुलांच्या कळ्या कोकणच्या सड्यांचं सौंदर्य खुलवतात. हे सारे काही अनुभवायला मिळते, ते फक्त आपल्या कोकणातच! नवोदित अभ्यासकांना, पर्यावरणप्रेमींना ‘कोकणचा सडा’ म्हणजे एक विलक्षण अभ्यासकेंद्रच! या कोकणातील अद्भुत सौंदर्याचं दर्शन घ्यायचेच झाले, तर नक्कीच या सड्यांना भेट दिली पाहिजे. त्यासाठी या सड्यांचा चिखल पायाला लागायला हवा!
 
परेश गुरव
(लेखक रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये ‘वनस्पतीशास्त्र’ विभागात साहा. प्राध्यपक म्हणून कार्यरत आहेत.)
७४४७३७६९९७




संबंधित मजकूर