एकेकाळी भारताला क्रायोजेनिक तंत्रज्ञान देण्यास नकार देणार्या महासत्तांना आपल्या वैज्ञानिक क्षमतेने उत्तर देत, ‘इस्रो’ने दि. २४ जून रोजी सेमी-क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी चाचणी केली. भारताच्या भविष्यातील अंतराळ कार्यक्रमासाठी ही चाचणी मैलाचा दगड ठरणारी असून, आत्मनिर्भर भारताच्या वैज्ञानिक सामर्थ्याचे ती प्रतीक आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ अर्थात इस्रोने दि. २४ जून रोजी, अंतराळ प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला. तामिळनाडूतील महेंद्रगिरी येथील ‘इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेस’ येथे पुढील पिढीच्या सेमी-क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी चाचणी घेण्यात आली. ‘इस्रो’च्या ‘लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स सेंटर’चे संचालक डॉ. व्ही. नारायणन यांनी या यशाची माहिती देताना स्पष्ट केले की, ही चाचणी गगनयान मोहीम आणि भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमांसाठी नवी दिशा देणारी आहे.
या यशाचे खरे महत्त्व समजून घ्यायचे असेल, तर तीन दशकांपूर्वीच्या इतिहासाकडे पाहावे लागेल. ९०च्या दशकात भारताला आपल्या अंतराळ कार्यक्रमासाठी, क्रायोजेनिक तंत्रज्ञानाची नितांत आवश्यकता होती. त्यासाठी भारताने रशियाशी करारही केला होता. मात्र, त्या काळातील तंत्रज्ञान हस्तांतरणावरील निर्बंध आणि ‘मिसाईल टेनोलॉजी कंट्रोल रिजीम’ संदर्भातील अमेरिकेच्या आक्षेपांमुळे, रशियावर मोठाच दबाव निर्माण झाला. परिणामी, भारताला अपेक्षित तंत्रज्ञान मिळू शकले नाही. हा भारताच्या अंतराळ कार्यक्रमासाठी मोठा धक्का होता; परंतु स्वदेशी संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाची नवी प्रेरणाही ठरला. यामुळेच स्वबळावर पुढे जाण्याचा भारताचा निर्धार अधिकच दृढ झाला. आजचे ‘सेमी-क्रायोजेनिक इंजिन’ हे त्याच निर्धाराचे परिपक्व फळ आहे. मात्र, काँग्रेसने ‘क्रायोजेनिक’ इंजिनासाठी संशोधन करणार्या शास्त्रज्ञांनाही त्रासच दिला. यापैकी एक म्हणजे नंबी नारायणन होय! १९९४ मध्ये त्यांच्यावर शत्रू राष्ट्राला तंत्रज्ञान विकल्याचा आरोप करत, केरळमधील काँग्रेस सरकारने त्यांना अटक केली. यानंतर त्यांचा दीर्घ काळ छळही करण्यात आला. २०१९ मध्ये केंद्रातील मोदी सरकारने ‘इस्रो’चे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांना ‘पद्मभूषण’ देऊन गौरवले.
मात्र, स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांचा निर्धार दृढ होता. त्यामुळेच स्वदेशी तंत्रज्ञानाचा पाया रचला गेला. अथक परिश्रम आणि अनेक वर्षांच्या संशोधनानंतर भारताने स्वतःचे ‘क्रायोजेनिक इंजिन’ विकसित केलेच; पण आता त्यापुढचे पाऊल टाकत जगातील अत्यंत मोजया देशांकडे असलेले ‘सेमी-क्रायोजेनिक तंत्रज्ञान’ही पूर्णपणे स्वदेशी बनावटीत विकसित करून दाखवले आहे. जे तंत्रज्ञान आपल्याला नाकारले गेले, त्यापेक्षा अधिक प्रगत तंत्रज्ञान स्वतःच्याच बळावर निर्माण करणे, हे भारताने पाश्चात्य देशांना दिलेले चोख प्रत्युत्तर आहे. आज अनेक देश भारताच्या अंतराळ कार्यक्रमातील यशाचे कौतुक करत आहेत, हा भारतीय आत्मविश्वासाचा आणि जिद्दीचा अभूतपूर्व विजय आहे.
दि. २४ जून रोजी ज्या ‘नेस्ट-जनरेशन सेमी-क्रायोजेनिक इंजिना’ची यशस्वी चाचणी झाली. याचे तांत्रिक आणि सामरिक महत्त्व मोठे आहे. पारंपरिक ‘क्रायोजेनिक’ इंजिनमध्ये द्रव हायड्रोजन आणि द्रव ऑसिजनचा वापर होतो. जे हाताळणे आणि साठवणे अत्यंत गुंतागुंतीचे असते. याउलट, नवीन ‘सेमी-क्रायोजेनिक’ इंजिनमध्ये इंधन म्हणून, ‘इस्रो’ने विकसित केलेेल्या परिष्कृत केरोसीन आणि ऑसिडायझर म्हणून द्रव ऑसिजनचा वापर होतो. त्यामुळे हे तंत्रज्ञान अधिक कार्यक्षम, अधिक सुरक्षित आणि उच्च ‘थ्रस्ट’ निर्माण करणारे ठरते. यामुळे भविष्यात भारतीय प्रक्षेपकांची उपग्रह वाहून नेण्याची क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल. ‘गगनयान’ मोहिमेसह जड उपग्रह प्रक्षेपणासाठी हे तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
आधुनिक काळात अंतराळ तंत्रज्ञानाचे महत्त्व, राष्ट्रीय सुरक्षा आणि सामरिक स्वायत्ततेच्या दृष्टीनेही मोठे आहे. दळणवळण, हवामान अंदाज, सीमावर्ती भागांवरील देखरेख, नौदल आणि हवाई दलासाठी आवश्यक उपग्रहाधारित माहिती, तसेच आपत्ती व्यवस्थापनासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये, सक्षम प्रक्षेपण क्षमता निर्णायक ठरते. स्वदेशी आणि अधिक शक्तिशाली प्रक्षेपकाच्या विकासामुळे, भारताला सामरिक गरजांनुसार उपग्रह प्रक्षेपित करण्याचे स्वातंत्र्य अधिक मिळेल. त्यामुळेच अंतराळ क्षेत्रातील आत्मनिर्भरता राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी देणारी गुंतवणूक आहे.
आज अनेक देश त्यांच्या उपग्रह प्रक्षेपणासाठी ‘इस्रो’कडे विश्वासाने पाहतात. अधिक वजनाचे उपग्रह कमी खर्चात प्रक्षेपित करण्याची क्षमता विकसित झाल्यास, भारतासाठी व्यावसायिक संधीही मोठ्या प्रमाणात वाढतील. त्याचबरोबर, भारतीय अंतराळ स्थानक उभारणे, २०४० पर्यंत भारतीयांना चंद्रावर पाठविण्याचे उद्दिष्ट साध्य करणे आणि दीर्घकालीन मानवी अंतराळ कार्यक्रम राबविणे, या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षांनाही यामुळे मोठीच चालना मिळेल. सायकल आणि बैलगाडीतून रॉकेटचे सुटे भाग वाहून नेणार्या देशापासून ते अत्याधुनिक अंतराळ तंत्रज्ञान विकसित करणार्या राष्ट्रापर्यंतचा भारताचा प्रवास, जिद्द, स्वावलंबन आणि दूरदृष्टी यांचा आहे. जागतिक अंतराळ क्षेत्रात भारताने निर्माण केलेली विश्वासार्हता ही अनेक दशकांच्या सातत्यपूर्ण संशोधन, नियोजन आणि वैज्ञानिक नेतृत्वाचे फलित आहे.
भारताने २०३३ पर्यंत जागतिक अंतराळ अर्थव्यवस्थेतील वाटा, वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी खासगी उद्योग, स्टार्टअप्स आणि संशोधन संस्थांच्या सहभागालाही चालना देणारी धोरणे राबविण्यात येत आहेत. ‘इन-स्पेस’ आणि ‘न्यूस्पेस इंडिया लिमिटेड’सारख्या संस्थांमुळे, सरकारी आणि खासगी क्षेत्रातील सहकार्याला नवे परिमाण मिळाले आहे. अशा परिस्थितीत ‘सेमी-क्रायोजेनिक’ इंजिनासारखे स्वदेशी तंत्रज्ञान, संपूर्ण भारतीय अंतराळ उद्योगासाठीच नव्या संधी निर्माण करणारे ठरणार आहे. उपग्रहनिर्मिती, प्रक्षेपण सेवा आणि अंतराळ तंत्रज्ञान निर्यात क्षेत्रांत, भारत अधिक स्पर्धात्मक होण्याची क्षमता या यशामुळे निर्माण झाली आहे.
‘इस्रो’चे हे यश भारताच्या दीर्घकालीन वैज्ञानिक आणि सामरिक क्षमतेचे ते द्योतक आहे. कोणत्याही संकटाचे संधीत रूपांतर करण्याची भारतीय संशोधन व्यवस्थेची क्षमताच, या यशातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. एके काळी प्रगत तंत्रज्ञानासाठी विदेशांकडे पाहणारा भारत आज स्वतःचे तंत्रज्ञान विकसित करून, जागतिक अंतराळ क्षेत्रात विश्वासार्ह स्थान निर्माण करत आहे. २१व्या शतकात अंतराळ क्षेत्रातील नेतृत्व हे वैज्ञानिक प्रतिष्ठेचे प्रतीक राहिलेले नाही; तर ते आर्थिक क्षमता, राष्ट्रीय सुरक्षा आणि भू-राजकीय प्रभावाचेही मोजमाप झाले आहे. दि. २४ जूनची ही यशस्वी चाचणी भारताला ‘अंतराळ महासत्ता’ बनविण्याच्या प्रवासातील एक मैलाचा दगड आहे, असेच म्हणावे लागेल.