लेबनॉन / बैरूत (Israel Hezbollah Lebanon) : मध्य-पूर्वेतील संघर्ष थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. एका बाजूला अमेरिका आणि इराण एकमेकांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला इस्रायलने लेबनॉनमध्ये लष्करी कारवाई तीव्र करत हिजबुल्लाच्या अनेक तळांवर हल्ले चढवले आहेत. त्यामुळे संपूर्ण मध्यपूर्वेत तणाव अधिकच वाढला आहे.
इस्रायलने २८ जून २०२६ रोजी दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवर लष्करी कारवाई केली. या कारवाईत इस्रायली सैन्याने हिजबुल्लाचा भूमिगत गुप्त तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे. लेबनॉनच्या सरकारी नॅशनल न्यूज एजेन्सी (NNA) ने या हल्ल्याची माहिती दिली. दरम्यान, हिजबुल्लाने या हल्ल्याचा तीव्र निषेध करत, "या हल्ल्याला योग्य वेळी प्रत्युत्तर दिले जाईल," असा इशारा दिला आहे. (Israel Hezbollah Lebanon)
२६ जून २०२६ रोजी अमेरिकेच्या मध्यस्थीने इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीचे उद्दिष्ट दोन्ही देशांतील तणाव कमी करून संघर्ष थांबवणे हे होते. मात्र, बैठकीनंतर अवघ्या तीन दिवसांतच इस्रायलने लेबनॉनवर लष्करी कारवाई केली. त्यामुळे दोन्ही देशांतील तणाव पुन्हा वाढला असून, संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Israel Hezbollah Lebanon)
इस्रायलची भूमिका स्पष्ट!
इस्रायलने सांगितले की, या हल्ल्याचे प्रमुख उद्दिष्ट हिजबुल्लाचा भूमिगत तळ उद्ध्वस्त करणे हे होते. हा तळ सुमारे २०० मीटर लांब आणि २५ मीटर खोलीवर असल्याचा दावा करण्यात आला. या तळामध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि क्षेपणास्त्रे ठेवण्यात आली होती, ज्यांचा वापर इस्रायलवर हल्ले करण्यासाठी केला जात असल्याचा इस्रायलचा दावा आहे. इस्रायलच्या लष्करी प्रवक्त्यांनी सांगितले, "या कारवाईची पूर्वसूचना अमेरिका आणि लेबनॉनला देण्यात आली होती." (Israel Hezbollah Lebanon)
इस्रायलच्या या हल्ल्यानंतर हिजबुल्लाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. हिजबुल्लाने म्हटले, "इस्रायलची ही कारवाई शांतता कराराचे उल्लंघन आहे. आम्ही या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. आमच्या देशाच्या संरक्षणासाठी आवश्यक ते सर्व पाऊल उचलण्याचा अधिकार आम्हालाही आहे." (Israel Hezbollah Lebanon)