नियतीचा न्याय!

    29-Jun-2026   
 
Churchill Bengal Famine
 
लंडन सध्या उष्णतेच्या लाटेमध्ये पोळून निघाले आहे. सध्याच्या उष्णतेने मागील अनेक वर्षांचा विक्रम मोडला आहे. यामुळे एका बाजूला लोकांच्या प्रवासात व्यत्यय आला, तर दुसर्‍या बाजूला शाळाही बंद ठेवण्याची वेळ आली आहे. सबंध युरोपलाच उन्हाची काहिली सहन करावी लागत आहे. एका बाजूला उष्णतेची लाट असताना, दुसर्‍या बाजूला इंग्लंडच्या राजकारण आणि समाजकारणातसुद्धा तापमान वाढीचा अनुभव मागील काही आठवड्यात लोकांनी घेतला आहे. लंडनच्या ‘नॅशनल पोर्ट्रेट गॅलरी’तील एका कलाकृतीवरून, ब्रिटनच्या सांस्कृतिक विश्वात मोठाच वाद झाला आहे.
 
‘टर्नर पुरस्कार’विजेती कलाकार हेलन कॅमॉक हिने, ‘पर्सिस्टन्स’ नावाचा ४० मिनिटांचा एक व्हिडिओ तयार केला होता. यामध्ये तिने १७व्या शतकातील ब्रिटिश नेते ऑलिव्हर क्रॉमवेल आणि ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांची तुलना केली. व्हिडिओमध्ये तिने दावा केला की, "विन्स्टन चर्चिल यांनी ज्याप्रमाणे भारतीय लोकांवर जाणीवपूर्वक उपासमार लादली, काहीसे तसेच क्रॉमवेलने आयर्लंडमध्ये केले.” याचे तीव्र पडसाद ब्रिटनच्या राजकीय वर्तुळात उमटले.
 
आता विन्स्टन चर्चिल यांच्या कारकिर्दीचे वास्तव, लपून राहिलेले नाही. मात्र, तरीही आपल्या नेत्याची आब राखण्याच्या हेतूने, काही माणसे पुढे सरसावलीच. चर्चिल यांचे चरित्र लिहिणारे इतिहासकार लॉर्ड अ‍ॅण्ड्—यू रॉबर्ट्स यांनी, या कलाकृती विरोधात गॅलरीला एक खुले पत्र लिहिले. त्यावर चर्चिल यांचे नातू सर निकोलस सोम्स आणि ब्रिटिश संसदेच्या काही सदस्यांनी, स्वाक्षर्‍याही केल्य. त्यांनी या कलाकृतीतील दाव्यांना चुकीचे आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले. त्यांच्या मते, बंगालचा दुष्काळ हा चक्रीवादळ, महागाई आणि युद्धामुळे पडला होता.
 
वास्तविक, ब्रिटनची ओळख ही व्यक्तिस्वातंत्र्य आणि विचारांचे मुक्त आदान-प्रदान यामुळे आहे. म्हणजेच अमूक एका कलाकृतीला विरोध करणार्‍याला, विरोधाचे स्वातंत्र्य आणि आपली अभिव्यक्ती मांडणार्‍याला त्याचे म्हणणे मांडण्याचे स्वातंत्र्य! मात्र, इथे कॅमॉक यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर, त्यांनी स्वतःहून प्रदर्शनातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. इतर राष्ट्रांना उदारमतवादा शिकवणार्‍या ‘साहेबाच्या देशात’, अशी घटना घडणेच अत्यंत खेदजनक.
 
या वादाच्या मुळाशी १९४३चा बंगालचा भीषण दुष्काळ आहे, ज्यामध्ये सुमारे ३० लाख भारतीयांच्या तोंडचा घास पळवण्यात आला. अनेक इतिहासकारांचे स्पष्ट मत आहे की, चर्चिल यांच्या चुकीच्या धोरणांमुळेच, ही वेळ आली होती. अन्नधान्याची साठेबाजी आणि भारतीय धान्याची निर्यात दुसर्‍या देशांतील सैनिकांसाठी केल्याने, हा दुष्काळ अधिकच तीव्र झाला होता. मात्र, ब्रिटनमधील हुजूर धोरणाचे राजकारणी आणि इतिहासकार अजूनही, चर्चिल यांच्यावरील आरोप स्वीकारण्यास तयार नाहीत. या सत्याला चुकीचे ठरवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आजही सुरू आहे.
 
‘नॅशनल पोर्ट्रेट गॅलरी’च्या प्रदर्शनातून, तो व्हिडिओ हटवण्यासाठी ब्रिटनमधील दिग्गजांनी संपूर्ण शक्ती पणाला लावली. वास्तविक, ही त्यांच्यातील भीती आहे. स्वतःला मानवाधिकाराचे कैवारी म्हणवणार्‍या ब्रिटनला त्यांच्या पूर्वजांनी वसाहतवादाच्या माध्यमातून केलेल्या लूटमारीतून, नैतिकदृष्ट्या स्वतःचा बचाव करायचा आहे की काय? असाच प्रश्न त्यामुळे पडतो. अर्थातच, वर्तमानातील ब्रिटन हे त्याच भूतकाळातील सत्तेचे लाभार्थी आहे, हे विसरता येणार नाही. ब्रिटनने कितीही प्रयत्न केले, तरी ३० लाख बंगाली लोकअंच्या प्रेतांची सावली, चर्चिल यांच्या प्रतिमेची पाठ सोडणार नाही. या सगळ्यावर व्यक्त होताना कॅमॉक हिने खंत व्यक्त केली की, "आजकाल कलाकारांवर आणि सांस्कृतिक संस्थांवर, बाहेरील शक्तींचा दबाव वाढत आहे.”
 
या संपूर्ण प्रकरणाकडे पाहिल्यास असे जाणवते की, एका अर्थाने हा नियतीचा न्याय आहे. ज्या लंडनने भारताचे वैभव लुटून स्वतःचे महाल उभारले केले, आज त्याच भूमीवरचे कलाकार त्यांच्या क्रूर साम्राज्यवादाचा बुरखा टराटरा फाडत आहेत. लंडनसह युरोपमध्ये सध्या सुरू असलेली उष्णतेची लाट ओसरेलही कदाचित; मात्र सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ झालेली, प्रश्न विचारणारी नवी पिढी वातावरणातील ही गरम हवा अचूक ओळखते. शिवाय, त्याची जाणीवही इतरांना करून देते, याचीच प्रचिती यानिमित्ताने आली.




मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.
संबंधित मजकूर