नागपूर : (Chandrashekhar Bawankule Uddhav Thackeray Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय भविष्याची चिंता करण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या पक्षाची काळजी घ्यावी. त्यांच्या पक्षातील नेते आणि कार्यकर्ते पक्ष सोडून का जात आहेत, याचे आत्मपरीक्षण त्यांनी करण्याची गरज असल्याचे मत राज्याचे महसूलमंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रगल्भ, विकासाभिमुख आणि अष्टपैलू नेतृत्व असून महाराष्ट्राला विकसित राज्य बनविण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यांच्या नेतृत्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचाही ठाम विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय भविष्याबाबत कोणतीही शंका घेण्याचे कारण नसून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २०३४ पर्यंत महाराष्ट्राला हवेत, असे ते म्हणाले.
🟧 29 - 06 - 2026 | 📍नागपूर | माध्यमांशी संवाद
उद्धव ठाकरेंनी आपल्या भविष्याची चिंता करावी. मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांचे भविष्य उज्वल आहे. राज्यातील १४ कोटी जनतेचे विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणाऱ्या मा. देवेंद्रजींचे नेतृत्व महाराष्ट्रातील जनतेला २०३४… pic.twitter.com/mfEZgIoEcU
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) June 29, 2026
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी भाष्य करण्यापेक्षा स्वतःच्या राजकीय भविष्याचा विचार करावा. भाजपाने हिंदुत्वाच्या विचारांवर आपले राष्ट्रीय अस्तित्व उभे केले असून पक्ष हा सत्ता किंवा पैशासाठी नव्हे, तर विचारांसाठी काम करतो. मात्र, उद्धव ठाकरे यांनी आपले विचार काँग्रेसच्या दावणीला बांधले असून काँग्रेसने त्यांचा पक्ष संपविण्याचे काम केले आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडे टीका-टिप्पणी करण्याशिवाय काहीच उरलेले नाही, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली.
केवळ मनातील राग आणि भीतीपोटी उद्धव ठाकरे भाजपावर टीका करत आहेत. मात्र, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच पक्ष पुढे नेत असल्याचा निर्णय जनतेने दिला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राज्यातील १४ कोटी जनतेला विकसित महाराष्ट्र देण्याची क्षमता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आहे. त्यामुळे त्यांच्या वाटेत कोणी आले तरी फरक पडणार नाही. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भविष्याची चिंता करण्याऐवजी स्वतःच्या पक्षाचे भविष्य जपावे, असा सल्लाही बावनकुळे यांनी दिला.
२८८ विधानसभा मतदारसंघांत 'छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २२ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त महसूल विभागाच्या वतीने राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांत 'छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान' राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून सेवा हमी कायद्यांतर्गत विविध महसूल सेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचविण्यात येतील.
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) June 29, 2026
या अभियानात शेतकऱ्यांसाठी पांदण रस्ते, वृक्षारोपण, महसूल विभागाच्या विविध सेवा तसेच सेवा हमी कायद्यांतर्गत सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या जातील. राज्यातील सर्व मंत्री, पालकमंत्री आणि आमदार या अभियानात सहभागी होणार असून, एका दिवसात सुमारे १० लाख कुटुंबांना महसूल सेवा देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
बळीराजा पांदण रस्ते योजनेला गती
मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ते योजनेअंतर्गत पुढील चार ते पाच वर्षांत राज्यातील प्रमुख पांदण रस्ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेत पांदण रस्ते, वहिवाटीचे रस्ते आणि शेतरस्त्यांवरील अतिक्रमणे हटविणे, रस्ते पूर्ववत करणे, दोन्ही बाजूंना वृक्षलागवड करून सीमांकन करणे तसेच रस्त्यांना क्रमांक देण्याचे काम सुरू आहे. (Chandrashekhar Bawankule Uddhav Thackeray Devendra Fadnavis)
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) June 29, 2026
यासाठी राज्य शासनाने एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून जिल्हा नियोजन समिती आणि मायनिंग फंडातूनही मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी यासंदर्भात पुन्हा चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगताना बावनकुळे म्हणाले की, निवृत्तीनंतरही काही अधिकारी प्रभाव टाकत असून भ्रष्टाचाराच्या सुमारे १४० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशा अधिकाऱ्यांवर केंद्रीय व राज्यस्तरीय यंत्रणांमार्फत कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर कारवाईचा इशारा
शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या खासगी बँकांविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे सांगताना बावनकुळे म्हणाले की, अशा बँकांची शासकीय खाती बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या बँकांना अंतिम संधी देण्यात आली असून, शेतकऱ्यांना कोणताही मानसिक त्रास होणार नाही याची दक्षता बँकांनी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) June 29, 2026
महानगरपालिका शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी ३०० कोटी
महानगरपालिका शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी यंदाच्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सुमारे ३०० कोटी रुपये खर्च करण्याचे नियोजन असल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली. बंद पडत असलेल्या शाळा पुन्हा सक्षम करणे, शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (Chandrashekhar Bawankule Uddhav Thackeray Devendra Fadnavis)