मुंबई : (Ayodhya Donation Theft Case) अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामभक्तांनी अर्पण केलेल्या चढाव्याच्या कथित चोरीप्रकरणात आठ आरोपींना अटक करण्यात आली. या आठही आरोपींच्या घरांवर रविवारी पोलिसांनी एकाचवेळी छापेमारी केली. पोलिसांच्या विविध पथकांनी अनुकल्प मिश्रा, अविनाश शुक्ला, मनीष यादव आणि रामशंकर उर्फ टिन्नू यादव यांच्यासह सर्व आरोपींच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली. याशिवाय शेजारी आणि स्थानिक रहिवाशांशीही संवाद साधून माहिती गोळा करण्यात आली तसेच त्यांचे जबाब नोंदविण्यात आले.
छापेमारीदरम्यान पोलिसांनी घरांची कसून तपासणी केली असता या प्रकरणाशी संबंधित कोणतीही माहिती किंवा पुरावे असल्यास ते सादर करण्याची संधी स्थानिक नागरिकांनाही देण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तपासात कोणताही अडथळा येऊ नये आणि अनधिकृत व्यक्तींना प्रवेश मिळू नये यासाठी संबंधित घरांबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.(Ayodhya Donation Theft Case)
या कारवाईचा भाग म्हणून आरोपी अविनाश शुक्लाशी संबंधित कौशलपुरी फेज-१ येथील भाड्याच्या घराचीही पोलिसांनी झडती घेतली. घराचे प्रवेशद्वार कुलूपबंद असल्याने तपासादरम्यान त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आणि घराची तपासणी करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींकडून सुमारे ७९ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक, म्हणजेच सुमारे २० लाख रुपये, अविनाश शुक्ला याच्याकडून जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.(Ayodhya Donation Theft Case)
आरोपींची बाजू न लढण्याचा फैजाबाद बार असोसिएशनचा निर्णय
अटक करण्यात आलेल्या आरोपींची न्यायालयात बाजू मांडणार नसल्याचा निर्णय फैजाबाद बार असोसिएशनने सोमवारी घेतला. बार असोसिएशनच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय एकमताने घेण्यात आला. बैठकीत असा ठरावही करण्यात आला की, बार असोसिएशनमधील कोणत्याही वकिलाने या प्रकरणातील आरोपींचे वकीलपत्र स्वीकारून त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित वकिलावर ५ लाख रुपयांचा दंड आकारण्यात येईल. सर्वांच्या धार्मिक भावना दुखावल्या असल्याने अटक करण्यात आलेल्या आरोपींची बाजू न्यायालयात मांडणार नसल्याचे बार असोसिएशनचे सचिव शैलेंद्र जायसवाल यांनी सांगितले.(Ayodhya Donation Theft Case)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक