मुंबईच्या वैचारिक आणि सांस्कृतिक जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा असणारी संस्था म्हणजे ‘एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई.’ काळाचे बहुरूपी प्रवाह पचवत या संस्थेने ज्ञानवंतांची पिढी घडवली. लाखो दुर्मीळ ग्रंथ, प्राचीन नाणी आणि हस्तलिखितांचा खजिना जतन करणार्या या ज्ञानमंदिरात सध्या अंतर्गत परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. ‘एशियाटिक सोसायटी’च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इतिहासाचा मागोवा, वर्तमानाचा अन्वयार्थ आणि भविष्याचा वेध घेणारी ही विशेष वृत्तमालिका...
ग्रज हे शत्रू होते हे खरेच; पण त्यांना प्रत्येक गोष्ट समजून घ्यावीशी वाटत असे. ते अत्यंत चौकस होते. भारतीय जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राचा अभ्यास करणे, निरीक्षण करणे आणि त्याच्या काटेकोर नोंदी ठेवणे, हे इंग्रजांचे वैशिष्ट्य होते. आधीच्या त्या विविध सुलतानांनी भारतीय जीवनाचा फक्त विद्ध्वंस केला होता. त्या तुलनेत इंग्रजांच्या ‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या मुंबईतल्या सरन्यायाधीशाने ‘लिटररी सोसायटी ऑफ बॉम्बे’ या संस्थेची स्थापना केली, हे इंग्रजांचे वेगळेपण होय. ही ‘लिटररी सोसायटी’च पुढे ‘एशियाटिक सोसायटी’ बनली.
१८०२ साली पेशवा दुसरा बाजीराव याने वसई येथे इंग्रजांच्या ‘ईस्ट इंडिया कंपनी’बरोबर करार केला आणि आज ना उद्या, मराठ्यांचे राज्य संपणार, हे नक्की झाले. यावेळी इंग्रजांच्या ‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या मुंबई इलाख्याचा गव्हर्नर होता, जोनाथन डंकन. भारतीय राजकारणी लोकांना विद्येचे प्रेम होते किंवा नवनवीन गोष्टींबद्दल कुतूहल होते, असे उल्लेख आढळत नाहीत. आताच्या राजकारण्यांनीही काही सन्मानीय अपवाद वगळता, तीच परंपरा चालू ठेवलेली दिसून येते. पण इंग्रजांचे तसे नव्हते. एकीकडे ते कुटिल मुत्सद्दी होते, धुरंधर सेनापती होते, त्याचवेळी ज्ञानप्रेमीसुद्धा होते.
गव्हर्नर डंकन जसा विद्याप्रेमी, ज्ञानपिपासू होता, तसाच सन १८०४ साली ‘ईस्ट इंडिया कंपनी’चा सरन्यायाधीश म्हणून मुंबईत दाखल झालेला जेम्स मेकिंटॉश हा माणूसही मोठी ज्ञानप्रेमी होता. आल्या आल्या त्याने मुंबईतल्या तत्कालीन इंग्रजी वर्तुळात चौकशी केली की, इथे एखादे ग्रंथालय, एखादी विद्वतसभा आहे का की जिथे नवनवीन माहितीची देवाण-घेवाण, चर्चा, विचारविनिमय होऊ शकेल? त्यावर उत्तर मिळाले की, सन १७८१च्या सुमारास फक्त वैद्यकशास्त्राची एक आणि फक्त कायदेपंडितांची एक, अशा दोन विशिष्ट क्षेत्रांच्या ज्ञानसभा मुंबईत होत्या. पण आता त्या केवळ नामधारी उरल्या आहेत.
यावर जेम्स मॅकिंटॉशने ठरवले की, आपणच अशी ज्ञानसभा स्थापन करूया. दि. २६ नोव्हेंबर १८०४ या दिवशी गव्हर्नर डंकनच्या निवासस्थानी म्हणजे परळच्या गव्हर्नर हाऊसमध्ये (आज या वास्तूत प्रसिद्ध ‘हाफकिन इन्स्टिट्यूट’ आहे.) सभा होऊन ‘लिटररी सोसायटी ऑफ बॉम्बे’ या विद्वत्सभेची स्थापना झाली. या सभेत स्वतः गव्हर्नर जोनाथन डंकन, सरन्यायाधीश जेम्स मेकिंटॉश, कर्नल जोसेफ बोडेन यांच्यासह एकूण १७ जण उपस्थित होते. कर्नल बोडेन हा ‘ईस्ट इम्डिया कंपनी’च्या सैन्यात क्वार्टर मास्टर जनरल या पदावर होता; शिवाय तो गव्हर्नरचा ‘ए.डी.सी.’ म्हणजे स्वीय सचिवही होता. या विद्वतसभेची बैठक दर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी व्हावी, असे ठरले. दोन बैठकांच्या दरम्यानच्या काळात सदस्यांनी कोणत्या ना कोणत्या पौर्वात्य विषयाचा काळजीपूर्वक अभ्यास करावा आणि प्रत्यक्ष बैठकीत सर्व काळ त्याचा उपयोग होईल, असा संकेत ठरला.
या विद्वत्सभेच्या सर्व सदस्यांचा अंतरीचा हेतू विशुद्ध ज्ञानप्राप्तीचा होता, असे समजण्याचे कारण नाही. पौर्वात्य ज्ञानाचा अभ्यास करून अखेरीत ते पाश्चिमात्य ख्रिश्चन ज्ञानापेक्षा हलके आहे, असे सिद्ध करणे. तसेच या ज्ञानाचा उपयोग इंग्रजी साम्राज्याच्या हितासाठी वापरून घेणे, हे छुपे हेतू होतेच. त्यामुळेच सन १८४० पर्यंत या सभेचे सदस्य फक्त इंग्रजच होते. मध्यंतरी म्हणजे सन १८२६ साली ‘लिटररी सोसायटी ऑफ बॉम्बे’ ही संस्था लंडनच्या ‘रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन अॅण्ड आयर्लंड’ या संस्थेमध्ये विलीन झाली. म्हणून १८२९ सालापासून तिला ‘बॉम्बे ब्रॅन्च ऑफ दि रॉयल एशियाटिक सोसायटी’ असे म्हटले जाऊ लागले. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर १९५४ साली तिचे नाव ‘एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे’ झाले. आणखी पुढे म्हणजे १९९५ साली भारतीय संसदेने ‘बॉम्बे’ हे नाव बदलून अधिकृतपणे ‘मुंबई’ केले. त्यानंतर २००२ साली संस्थेचे नाव ‘एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’ असे करण्यात आले.
इंग्रजांचा ‘बॉम्बे फोर्ट’ नामक जो किल्ला होता, त्याच्या साधारण मध्यवर्ती भागी प्रोटेस्टंट इंग्रजांनी स्वतःसाठी प्रोटेस्टंट चर्च उभारले. तेच सेंट टॉयस चर्च. त्याच्यासमोर खूप मोठा हिरवळीचा भाग होता. त्याला म्हणायचे ‘बॉम्बे ग्रीन.’ या ‘बॉम्बे ग्रीन’वर एक ‘टाऊन हॉल’ म्हणजे ‘समान मंदिर सभागृह’ उभारावे, असा विचार झाला. ‘लिटररी सोसायटी’ने या कामासाठी स्वतःचे दहा हजार रुपये (१८२१ सालचे) दिले. लष्कराच्या रॉयल इंजिनिअर दलाचा वास्तुशास्त्रज्ञ कर्नल काउपर याने बनवलेल्या आराखड्यानुसार भव्य इमारत उभी राहिली आणि सन १८३० साली ‘लिटररी सोसायटी ऑफ बॉम्बे’ किंवा आता नव्या नामकरणानुसार ‘बॉम्बे ब्रॅन्च ऑफ दि रॉयल एशियाटिक सोसायटी’ या भव्य वास्तूत गेली.
ग्रीस देशातल्या अथेन्स शहरात इसवी सन पूर्व पाचव्या शतकात बांधलेले ‘अथेना’ या देवतेचे मंदिर आहे. त्याला पार्थेनॉन असे म्हणतात. पायर्या-पायर्यांचा सुंदर जिना आणि तो संपताच डोरिक वास्तुशैलीत बांधलेले अत्यंत देखणे आणि भक्कम असे आठ खांब हे पार्थनॉनचे वैशिष्ट्य आहे. टाऊन हॉलच्या बांधणीसाठी तीच शैली वापरण्यात आली. आज या सुंदर वास्तूमध्ये एका बाजूला ‘एशियाटिक सोसायटी’चा अतिशय विशाल आणि अन्मोल असा ग्रंथसंग्रह आहे. मधल्या सभागृहात राज्य सरकारचे महत्त्वाचे शासकीय कार्यक्रम होतात. आग्नेयेला असलेल्या ‘दरबार हॉल’ या अत्यंत शोभिवंत सभागृहात पूर्वी गव्हर्नरच्या कायदेमंडळाची सभा भरत असे. मुंबई विद्यापीठ १८५७ साली स्थापन होऊन त्याची पहिली पदवी परीक्षा १८६२ साली पार पडली, ती याच ‘दरबार हॉल’मध्ये. या परीक्षेत महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, बाळ मंगेश वागळे आणि वामन आबाजी मोडक हे चार विद्यार्थी ग्रॅज्युएट झाले.
मध्यंतरी, म्हणजे सन १८११ साली, कर्नल जोसेफ बोडेन हा निवृत्त होऊन इंग्लंडला परत गेला आणि मरण पावला. त्याच्या इच्छापत्रानुसार त्याची मालमत्ता ‘ऑक्सफर्ड विद्यापीठा’ला दान करण्यात येऊन, त्या पैशातून एका शिष्यवृत्तीची निर्मिती करण्यात आली. या शिष्यवृत्तीच्या नियमांमध्ये स्पष्ट उल्लेख होता की, या शिष्यवृत्तीधारकाने संस्कृत भाषा आत्मसात करून सर्व ख्रिश्चन धर्मग्रंथ संस्कृतमध्ये भाषांतरित करावेत, जेणेकरून सर्व भारतीयांचे धर्मांतर करावे. हीच ती पुढे सुप्रसिद्ध झालेली ‘बोडेन प्रोफेसरशिप’ किंवा ‘बोडेन चेअर!’
असो. पुढे सन १८४० साली पहिल्या भारतीय माणसाला ‘लिटररी सोसायटी’चे सदस्यत्व देण्यात आले. त्याचे नाव होते, माणेकजी करसेटजी. म्हणजे पारशी माणूस. हिंदूंना सदस्यत्व न देण्याबाबत इंग्रज किती जागरूक होते पाहा! पुढे सन १८४५ साली जगन्नाथ शंकरशेट आणि सन १८४९ साली डॉ. भाऊ दाजी लाड या हिंदूंना सदस्यत्व देण्यात आले. हिंदू माणूस सोसायटीचा अध्यक्ष व्हायला आणखी ४० वर्षे जावी लागली. सन १८९३ साली पहिले भारतीय-हिंदू अध्यक्ष न्या. काशिनाथ त्र्यंबक तेलंग हे झाले, तर सोसायटीचे पहिले भारतीय-हिंदू कार्यवाह श्री. श्री. रा. टिकेकर हे होऊ शकले, ते थेट १९४७ साली.
ऐन इंग्रजी अमदानीत, इंग्रजांचा संपूर्ण वरचष्मा असतानादेखील जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट आणि विशेषतः डॉ. भाऊ दाजी लाड यांनी ‘एशियाटिक सोसायटी’साठी फारच मौल्यवान असे योगदान दिलेले आहे. १९३० साली सर जीवनजी जमशेदजी मोदी हे अध्यक्ष असताना सोसायटीला इटलीमधून एक भरघोस ‘ऑफर’ आली. दान्ते नावाच्या प्रख्यात इटालियन कवीच्या ‘डिव्हाईन कॉमेडी’ या काव्याची १५व्या शतकात भूर्जपत्रावर लिहिलेली प्रत सोसायटीच्या संग्रहात आहे. माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन या प्रख्यात गव्हर्नरने आपल्या खासगी संग्रहातली ही प्रत १८२७ साली इटलीचा तत्कालीन राज्यकर्ता बेनिटो मुसोलिनी, जो पुढे हिटलरचा सहकारी म्हणून कुप्रसिद्ध झाला. त्याने सोसायटीकडे दहा लाख पौंड किमतीत ती प्रत विकत मागितली. पण, सर जीवनजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटीने ही ‘ऑफर’ ठोकरली. अशी ही एके काळी इंग्रजांचा आणि नंतर लिब्रांडूंच्या वरचष्म्यामुळे आर्थिकदृष्ट्या जर्जर ‘एशियाटिक सोसायटी’ आता राष्ट्रीय विचारांच्या ‘एशियाटिक टुमॉरो’च्या प्रतीक्षेत आहे.
- मल्हार कृष्ण गोखले