मुंबई (विशेष प्रतिनिधी) - गोंदिया जिल्ह्यात झालेल्या वार्षिक सारस पक्षी गणना-२०२६ मध्ये एकूण ३२ सारस पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे (sarus bird). 'सस्टेनिंग एनव्हायरमेंट अँड वाईल्डलाईफ असेंबलाज' (सेवा) संस्थेने वन विभागाच्या सहकार्याने आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागातून ही गणना यशस्वीरीत्या पूर्ण केली. (sarus bird)
२० जून २०२६ रोजी जिल्ह्यातील ५३ सारस अधिवास क्षेत्रांमध्ये ही गणना करण्यात आली. यासाठी जिल्हाभरात ३५ सर्वेक्षण पथके तयार करण्यात आली. प्रत्येक पथकात वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच दोन ते चार प्रशिक्षित स्वयंसेवकांचा समावेश होता. पहाटे ४.४५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत सारस पक्ष्यांच्या विश्रांतीस्थळांवर प्रत्यक्ष जाऊन निरीक्षण, गणना आणि आवश्यक नोंदी घेण्यात आल्या. या उपक्रमात सुमारे १४० ते १५० स्वयंसेवक आणि अधिकारी सहभागी झाले होते. गोंदियासह लगतच्या मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात ५० सारस पक्ष्यांची नोंद झाली असून, भंडारा जिल्ह्यातील सर्वेक्षण अद्याप सुरू आहे. तेथील अंतिम आकडेवारी सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर जाहीर करण्यात येणार आहे.
गेल्या काही वर्षांतील आकडेवारीनुसार गोंदिया जिल्ह्यातील सारस पक्ष्यांची संख्या २०२० मधील ४५ वरून २०२५ मध्ये ३० पर्यंत घसरली होती. यंदाच्या गणनेत ती ३२ वर पोहोचल्याने किंचित वाढ दिसून आली आहे. मात्र घरट्यांच्या संख्येत सातत्याने चढ-उतार होत असल्याचेही नोंदविण्यात आले आहे. २०२० मध्ये सात घरटी आढळली होती, तर २०२५ मध्ये ती पाच इतकी नोंदली गेली. ही गणना उपवनसंरक्षक पवन डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि 'सेवा' संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार यांच्या नेतृत्वात पार पडली. जिल्हाधिकारी, वन विभागाचे अधिकारी, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, 'सारस मित्र' स्वयंसेवक आणि स्थानिक शेतकऱ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.