जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर कठीण समजल्या जाणार्या ‘सीए’च्या परीक्षेत भव्य यश मिळवत, देशात पहिला येण्याचा मान मिळवणार्या शार्दुल शेखर विचारे याच्याविषयी...
यशाच्या शिखरावरचा क्षण हा दिसतो, तेवढा सहजसाध्य नसतो. त्यामागे असते, असंख्य रात्रींची मेहनत, वेळेशी केलेली शर्यत आणि ध्येयाप्रति असलेली अविचल निष्ठा. ‘सीए’ ही केवळ दोन अक्षरे. पण ती खर्या अर्थाने अथक परिश्रम, प्रचंड संयम आणि असामान्य चिकाटीची कठोर परीक्षाच ठरते. देशातील सर्वाधिक कठीण व्यावसायिक परीक्षांपैकी एक असलेल्या या परीक्षेत यश मिळवणे, ही मोठीच कामगिरी. त्यातही राष्ट्रीय स्तरावर सर्वोच्च स्थान मिळवणे म्हणजे, कठोर परिश्रम आणि सातत्याचा सर्वोच्च सन्मानच. अशा यशकथा केवळ गुणपत्रिकेपुरत्या मर्यादित राहात नाहीत, तर त्या पुढील पिढीला मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती प्रत्यक्षात उतरवण्याचीही प्रेरणा देतात. अशीच एक यशोगाथा म्हणजे, डोंबिवलीचा शार्दूल शेखर विचारे! त्याने यावर्षीच्या ‘सीए इंटरमिडिएट’ परीक्षेत देशात अव्वल येत, अलौकिक यश मिळवले.
शार्दुलचा जन्म डोंबिवलीत झाला. त्याचे संपूर्ण बालपणही डोंबिवलीतलेच. तो ठाकुर्ली येथील ९० फीट रोड येथे आपल्या आई-वडिलांसह वास्तव्यास आहे. शार्दुलला शर्वरी नावाची एक मोठी बहीण असून, सध्या ती ‘जैवतंत्रज्ञान’ विषयात ‘पीएचडी’ करत आहे. ती शिक्षणासाठी सध्या बंगळुरु येथे जाणार आहे. आई, वडील, मोठी बहीण आणि शार्दुल असे त्यांचे चौकोनी मध्यमवर्गीय कुटुंब.
शार्दुलने त्यांचे शालेय शिक्षण ‘ओमकार इंटरनॅशनल स्कूल’मधून पूर्ण केले. त्यानंतरचे महाविद्यालयीन शिक्षण तो माटुंग्याच्या ‘पोदार महाविद्यालया’तून घेत आहे. शार्दुलला सुरुवातीपासूनच वाणिज्य शाखेची प्रचंड आवड. त्यामुळेच त्याने पदवीसाठी वाणिज्य शाखेची निवड केली. यंदा तो पदवीच्या दुसर्या वर्षाला शिक्षण घेत आहे. लहानपणापासूनच अभ्यासात शार्दुलची प्रगती उत्तम होती. त्याने ‘आयसीएसई परीक्षा मंडळा’तून २०२२-२३ मध्ये, इयत्ता दहावीची परीक्षा दिली. यात त्याने तब्बल ९९.४० टक्के गुण मिळवून, देशात तिसरा क्रमांक पटकावला होता. इथूनच त्याच्या यशाची मालिका सुरू झाली. त्यानंतर शार्दुलच्या यशाचा आलेख सातत्याने चढताच राहिलेला दिसतो. दहावीत मिळवलेल्या देदीप्यमान यशानंतर, त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही.
शार्दुलने बारावीची परीक्षाही ‘आर. ए. पोदार महाविद्यालया’तूनच दिली. या परीक्षेतही त्याला ९५.१७ टक्के गुण मिळाले. मे २०२५ मध्ये ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया’तर्फे घेण्यात आलेल्या, ‘सीए फाऊंडेशन’च्या परीक्षेत त्याने ४०० पैकी ३५६ गुण अर्थात ८९.०५ टक्के मिळवून, देशात तिसरा क्रमांक पटकावला. ‘चार्टर्ड अकाऊंटंट इंटरमिडिएट’ परीक्षेच्या अलीकडे लागलेल्या निकालातही त्याने, ६०० पैकी ५३१ गुण मिळवून ८८.५० टक्के गुणांसह देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
भल्या भल्यांना घाम फोडणार्या या परीक्षेत भव्य यश मिळविल्याने, ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स’कडून शार्दुलचे कौतुक करण्यात आले. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स’चे अध्यक्ष सनदी लेखापाल प्रसन्नकुमार डी. यांनी त्याचे कौतुक करताना "यश हा एक अखंड प्रवास असून, प्रत्येक टप्प्यानंतर नवी उद्दिष्टे निश्चित करून ती साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे,” असेही सांगितले.
शार्दुलला लहानपणापासूनच वाचनाची प्रचंड आवड. जशी आवड त्याला वाचनाची होती, तसेच क्रिकेट आणि फुटबॉल हे खेळही त्याचा जीव की प्राण. शार्दुलचे वडील शेखर आणि आई सीमा हे दोघेही ‘फायनान्स कन्सल्टंट’ म्हणून कार्यरत आहेत. आई आणि वडिलांच्या प्रेरणेनेच, शार्दुलने याच क्षेत्रात करिअर करण्याचे निश्चित केले होते. ‘सीए’ परीक्षेमधील अंतिम टप्पा हा पुढील महत्त्वाचा असून, त्यातही उत्तम यश मिळवण्याचे स्वप्न शार्दुल उराशी बाळगून आहे. यासाठी तो अहोरात्र मेहनत घेत आहे. ‘सीए’ परीक्षेच्या अंतिम टप्प्यातही तो असेच भव्यदिव्य यश मिळवेल, याची खात्री असल्याचे शार्दुलचे वडील शेखर विचारे विश्वासाने सांगतात.
उपजत बुद्धिमत्ता, सातत्यपूर्ण मेहनत आणि वित्तीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या पालकांचा भक्कम पाठिंबा यांच्या जोरावर, ‘सीए’च्या परीक्षेत यश मिळविल्याचे शार्दुल सांगतो. असे असले तरी, हे यश संपादण्यासाठी, दररोज सात ते आठ तास शिकवणी वर्गात त्याने मेहनत घेतली असून, त्यानंतर घरी आणखी दोन तास स्वयंअध्ययनावरही त्याने भर दिला. सात महिन्यानंतर शिकवणी वर्ग पूर्ण झाल्यावर, त्याने स्वयंअध्ययनावरच अधिक लक्ष दिले. परीक्षा जवळ आल्यानंतर तर त्याने अभ्यासाचा वेळ अधिकच वाढवला. कठोर परिश्रम, अभ्यासातील सातत्य आणि जिद्दीच्या जोरावरच शार्दुलने, देशाभरातील लाखो विद्यार्थ्यांशी स्पर्धा करत, अव्वल स्थान पटकावले. शार्दुलच्या या यशामुळे केवळ त्यांच्या कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण डोंबिवली शहराचे नावही देशपातळीवर उज्ज्वल झाले आहे.
शार्दुलला परीक्षेत चांगल्या कामगिरीचा विश्वास होताच, देशात पहिला येणे, हा त्याच्यासाठीही सुखद धक्काच ठरला. निकाल पाहून त्याला आनंदाचे भरतेच आले.
या देदीप्यमान यशानंतर इतरांना सल्ला देताना तो म्हणाला की, "तुम्ही कोणताही अभ्यास करा; पण तो आवडीने करा आणि त्यात सातत्य ठेवा. तुम्हाला फळ नक्की मिळेल.” या क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्या नवीन विद्यार्थ्यांना, शार्दुलचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी ठरणारा आहे. शार्दुलसारख्या हरहुन्नर विद्यार्थ्याला पुढील प्रवासासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!