२०२६च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अखेर बंगाली जनतेने परिवर्तन घडवलेच. हे परिवर्तन घडवण्यासाठीची बंगाली जनतेची इच्छाशक्ती ही खर्या अर्थाने दुर्दम्यच होती. काहीशा अशाच इच्छाशक्तीचे दर्शन बंगालच्या फाळणीच्यावेळी बंगाली जनतेने दाखवले होते. त्यावेळीही ‘वन्दे मातरम्’ हाच त्यांच्यासाठीचा महामंत्र होता, जो पुढे स्वातंत्र्याचा बीजमंत्र ठरला. बंगालच्या विधानसभा निवडणुकीतही ‘वन्दे मातरम्’ला विरोध करणार्यांच्या पदरी जनतेने पराभवाचे दान टाकले आहे. बंगालचा इतिहास, वंदे मातरम् आणि विधानसभेतील एतिहासिक विजय याचा आढावा घेणारा हा लेख...
पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालांनी संपूर्ण देशाला अचंबित आणि आनंदितही केले. डिसेंबर २०२५ आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये, मला बंगालला जाण्याची संधी मिळाली. तिथे बहुतांश लोकांना परिवर्तनाची इच्छा तर होती; परंतु हे परिवर्तन खरोखरच शक्य होईल, असा विश्वास खूपच कमी लोकांना होता. परिस्थितीही अशी होती की, बदल होणे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हते. निष्पक्ष आणि स्वतंत्र मतदानासाठी आवश्यक असलेले मुक्त आणि निर्भय वातावरण तयार करणे, हेच सर्वांत मोठे आव्हान होते. परंतु, निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय, केंद्रीय गृहमंत्रालय आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त प्रयत्नांमुळेच हे शक्य होऊ शकले.
बंगालच्या जनतेने यावेळी उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या संख्येने मतदान केले. मागील पाच निवडणुकांमध्ये (२००१, २००६, २०११, २०१६ आणि २०२१) मतदानाची सरासरी ७९.२२ टक्के होती, तर २०२६ मध्ये ती वाढून ९२.४७ टक्के झाली. अचानक झालेल्या या सुमारे १३ टक्के गुणांच्या वाढीमध्ये, ‘एसआयआर’चे योगदान नाकारता येणार नाही. परंतु, यासोबतच ही वाढ निर्भय वातावरण आणि जनतेचा अभूतपूर्व उत्साहदेखील दर्शवणारी ठरते. या निवडणुकीत बंगालमधील जनतेने याकडे एक सांस्कृतिक संघर्ष म्हणून पाहणे, सुरक्षा दलांनी आपल्या भूमिकेचे चोख पालन करणे आणि नागरिकांना त्यांच्या लोकशाही हक्कांच्या वापराबाबत आश्वस्त करणे, याचेही महत्त्व नाकारता येऊ शकत नाही.
फेब्रुवारी २०२६ मध्येच माझी कोलकात्यात एका वरिष्ठ महिला पत्रकाराशी भेट झाली, ज्या पूर्णपणे डाव्या विचारसरणीच्या आहेत. दि. २९ मे रोजी त्यांच्याशी पुन्हा बोलणे झाले. त्यांनी सांगितले की त्या १८ वर्षांच्या असताना त्यांनी, पहिल्यांदा मतदान केले होते. त्यानंतर आता २०२६ मध्ये त्यांनी पुन्हा मतदान केले. त्या सध्या ४६ वर्षांच्या आहेत. परिवर्तनाची तीव्र इच्छा आणि बदल शक्य आहे हा विश्वास, हीच त्यांच्या मतदानाची प्रमुख प्रेरणा ठरली. बंगालमधील निवडणुकांचा इतिहास हा हिंसेचा राहिला आहे. अशा परिस्थितीत, यंदाची निवडणूक तुलनेने शांततेत पार पडली. याचे श्रेयही केंद्रीय गृहमंत्रालयाला दिलेच जाऊ शकते. याच कारणामुळे, लोकांनी निर्भयपणे घराबाहेर पडून मतदानही केले.
या निवडणुकीत केवळ भाजपच विजयी झाला नाही, तर बंगालच्या जनतेने भारताची आध्यात्मिक परंपरा आणि हिंदुत्वाच्या विचारांचा विजयही सुनिश्चित केला. बंगालचा आत्मा पुन्हा जागृत झाला आहे, असे यावरून प्रतित होते. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, श्री अरविंद, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, रवींद्रनाथ टागोर, जगदीशचंद्र बसू आणि बिपिनचंद्र पाल यांसारख्या आध्यात्मिक आणि राष्ट्रीय प्रबोधनाचे अग्रदूत असलेल्या महापुरुषांच्या बंगालच्या आत्म्याचाच हा विजय ठरला.
हा क्षण मला १९०५ मध्ये ब्रिटिश राजवटीने प्रस्तावित केलेल्या, बंगालच्या फाळणीविरुद्धच्या विरोधाची आठवण करून देतो. त्याकाळात बंकिमचंद्रांच्या ‘वन्दे मातरम्’च्या घोषणेसह, बंगालमध्ये अदम्य ऊर्जा, अभूतपूर्व एकता आणि राष्ट्रीय चेतनेचा उदय झाला होता. त्या जागृतीचा स्फोट इतका शक्तिशाली होता की, त्याचा परिणाम म्हणून ब्रिटिश राजवटीला १९११ मध्ये बंगालच्या फाळणीचा प्रस्तावच रद्द करावा लागला. एवढेच नव्हे, तर ब्रिटिश शासनाला आपली राजधानीदेखील १९११ मध्ये, कोलकात्याहून दिल्लीला स्थलांतरित करावी लागली. या दृष्टिकोनातून पाहिल्यास, २०२६मधील बंगाल विजयास भारताची आध्यात्मिक परंपरा आणि हिंदुत्वाच्या विचारांच्या विजयाला, बंगालची ‘वन्दे मातरम् चळवळ’ म्हटले जाऊ शकते.
‘वन्दे मातरम्’ हे गीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७५ मध्ये त्यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीसाठी लिहिले होते. १८९६ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोरांनी ते पहिल्यांदा गायले. यानंतर १९०५ मध्ये इंग्रजांनी प्रस्तावित केलेल्या बंगालच्या फाळणीच्या निषेधार्थ, बंगालच्या जनतेने ‘वन्दे मातरम्’ला स्वातंत्र्य चळवळीचा युद्धमंत्र केले. बंगाल फाळणीच्या प्रस्तावाविरुद्ध संपूर्ण भारत एकदिलाने उभा राहिला होता. लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांच्या ‘लाल, बाल, पाल’ जोडीला सर्वांनीच आपले नेते मानले होते. त्याकाळी ‘वन्दे मातरम्’चे गायन होताच, लोकांमध्ये अदम्य ऊर्जा आणि राष्ट्रीय चेतना संचारत असे. अनेक क्रांतिकारकांनी ‘वन्दे मातरम्’च्या घोषणेसह, फासाच्या दोराचे चुंबन घेत हसतमुखाने आपल्या प्राणांचे बलिदान दिले.
ब्रिटिश सरकार प्रस्तावित बंगाल फाळणीच्या विरोधात, ‘वन्दे मातरम्’ची भूमिकाही अत्यंत महत्त्वाचीच राहिली. दि. १६ ऑटोबर १९०५, रविवारी कोलकात्यात साजरा करण्यात आलेला रक्षाबंधन उत्सव, ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचा होता. सामान्यतः रक्षाबंधन हा सण श्रावण पौर्णिमेला म्हणजेच, ऑगस्ट महिन्यात येतो. परंतु, बंगालच्या फाळणीच्या निषेधार्थ दि. १६ ऑटोबर रोजी, कोलकात्याच्या हिंदू आणि मुस्लीम महिला-पुरुषांनी गंगा नदीत स्नान केले. त्यानंतर एकमेकांना राखी बांधत संकल्प केला की, ‘या रेशमी धाग्याप्रमाणे आम्ही बंगालला एका सूत्रात बांधून एकजूट ठेवू आणि बंगालची फाळणी होऊ देणार नाही.’
त्यावेळी अरविंद घोष यांनी पहिल्यांदाच ‘वन्दे मातरम्’ला, स्वातंत्र्याचा मंत्र म्हटले. राष्ट्रीय चेतना जागृतीसाठी, अरविंद घोष ‘वन्दे मातरम्’ नावाचे साप्ताहिक-मासिक चालवत असत. १९०७ मध्ये जर्मनीमध्ये मॅडम भिकाजी कामा यांनी स्वतंत्र भारताचा जो ध्वज फडकवला, त्यावरही ‘वन्दे मातरम्’ लिहिलेले होते. तेव्हापासूनच ‘वन्दे मातरम्’ स्वातंत्र्याचे ‘मंत्रगान’, देशभक्तीचे ‘स्फूर्तिगीत’ आणि क्रांतिकारकांचा ‘चेतना-मंत्र’ झाले.
‘वन्दे मातरम्’मुळे प्रज्वलित झालेल्या क्रांतीच्या ज्वालांना घाबरून, ब्रिटिश सरकारने एप्रिल १९०६ मध्ये याच्या सार्वजनिक गायनावरच बंदी घातली. परंतु, या दडपशाहीच्या विरोधात बंगालमध्ये अदम्य उत्साह आणि ऊर्जेचा संचार झाला. अखेर ब्रिटिश शासनाला बंगालच्या फाळणीचा प्रस्तावच मागे घ्यावा लागला. ही ऊर्जा आणि उत्साह केवळ बंगालपुरताच मर्यादित राहिला नाही, तर या जागृतीची ज्वाला संपूर्ण भारतभर पसरली. नागपुरात संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांनी, दहावीत असतानाच ‘वन्दे मातरम्’ची सार्वजनिक घोषणा देऊन, शाळा प्रशासनाचा रोषही सहन केला. यामुळे त्यांना शाळेतून काढूनही टाकण्यात आले होते.
तेव्हापासूनच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रत्येक वार्षिक अधिवेशनात, संपूर्ण ‘वन्दे मातरम्’चे गायन केले जात असे. रवींद्रनाथ टागोर, सरला देवी चौधराणी, पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर आणि ओंकारनाथ ठाकूर यांसारख्या मूर्धन्य गायकांनी, याला आपले स्वर दिले होते. काँग्रेसचे सर्व सदस्य, मग ते हिंदू असोत वा मुस्लीम, याला स्वातंत्र्य चळवळीचा ‘प्राण-मंत्र’ मानून गात असत. परंतु, १९२१ नंतर ब्रिटनच्या फाळणीच्या राजकारणाने प्रभावित होऊन, काँग्रेसच्या आत जातीय शक्तींचा प्रभाव वाढू लागला. याचा परिणाम म्हणून, तुर्कीयेच्या खिलाफत चळवळीला पाठिंबा देणे आणि ‘वन्दे मातरम्’ला जातीय अथवा सांप्रदायिक ठरवून त्याचा विरोध करणे, यांसारख्या प्रवृत्ती डोके वर काढू लागल्या. जे गीत १९२० पर्यंत स्वातंत्र्य चळवळीचा ‘प्राण-मंत्र’ मानले जात होते, तेच १९२३ नंतर ‘जातीय’ म्हटले जाऊ लागले. इथूनच भारताच्या फाळणीची बीजे पेरण्याची प्रक्रिया सुरू झाली.
भारतीय चिंतनात मनुष्याला केवळ शरीर मानलेले नसून शरीर, प्राण, मन, बुद्धी आणि आत्मा यांनी युक्त अशी पंचकोषात्मक सत्ता म्हणून पाहिले गेले आहे. त्याचप्रमाणे ‘वन्दे मातरम्’मध्ये भारताचे समग्र स्वरूप प्रस्तुत होते. याच्या पहिल्या पदामध्ये भारतभूमीचे वर्णन आहे, दुसर्या पदामध्ये भारताचे जन म्हणजेच, लोकजीवनाचे चित्रण आहे; तर नंतरच्या पदांमध्ये भारताचे मन, बुद्धी, प्राण आणि आध्यात्मिक चेतनेचे निरूपण आढळते.
‘तुमि विद्या, तुमि धर्म’- इथे ‘विद्या’ म्हणजे भारताची अध्यात्म-विद्या आहे, जी मोक्षाचा मार्ग शिकवते. ‘मी’पणा लहान करून ‘आम्ही’ ही भावना मोठी करणे आणि आपुलकीच्या भावनेने समाजाला देणे, समाजाचे ऋण परत करणे हाच ‘धर्म’ अभिप्रेत आहे. इथे ‘धर्म’ याचा अर्थ ‘रिलिजन’ असा नक्कीच नाही. भगिनी निवेदिता यांनी म्हटले आहे की, "ज्या समाजात लोक आपल्या परिश्रमाचा मोबदला केवळ स्वतःपाशीच न ठेवता समाजाला देतात, त्या समाजाकडे जमा झालेल्या सामाजिक भांडवलाच्या बळावर संपूर्ण समाज संपन्न आणि समृद्ध होतो. तसेच, समाजातील प्रत्येक व्यक्तीही संपन्न आणि समृद्ध होते. हाच खरा धर्म आहे. म्हणूनच, एका अर्थाने समाजाच्या या सामाजिक भांडवलाला समृद्ध करणे, म्हणजेच धर्म होय. याच कारणामुळे स्वातंत्र्यानंतर भारताच्या नेतृत्वाने, विचारपूर्वक लोकसभेसाठी ‘धर्मचक्र प्रवर्तनाय’, राज्यसभेसाठी ‘सत्यम् वद, धर्मं चर’, सर्वोच्च न्यायालयासाठी ‘यतो धर्मस्ततो जयः’ आणि राष्ट्रध्वजात धर्मचक्राचा समावेश केला. ही विद्या आणि हा धर्म भारतमातेच्या हृदयात आहेत; हेच भारताचे प्राण आहेत.”
ही ‘भारतमाता’ शक्तीची देवी दुर्गा, समृद्धीची देवी लक्ष्मी आणि ज्ञानाची देवी सरस्वती या तिन्हींचे एकत्रित रूप आहे. हाच भारत आहे. याच कारणामुळे १९०५ पासून, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनांमध्ये संपूर्ण ‘वन्दे मातरम्’चे गायन केले जात असे. हे गाण्यासाठी साधारण तीन मिनिटांचा वेळ लागतो. यात जातीयता अथवा सांप्रदायिकता कुठे आहे?
नंतरच्या काळात विभाजनकारी आणि जातीय तत्त्वांच्या प्रभावाखाली येऊन याला विरोध करण्याचा क्रम सुरू झाला, जो आजदेखील कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सुरूच आहे. यात जातीयता पाहणारे लोक भारताचा आध्यात्मिक वारसा आणि परंपरेविषयीचे आपले अज्ञानच प्रदर्शित करतात. आज असे प्रतित होते की, असे लोक तेव्हा ब्रिटिश राजवटीच्या आणि आज भारतविरोधी विभाजनकारी तत्त्वांच्या प्रभावाखाली असून, त्यांच्या हातातील बाहुले बनूनच खेळत आहेत. परंतु, ‘वन्दे मातरम्’ने भारताच्या प्राणांना झंकारले, राष्ट्रीय चेतना जागृत केली आणि जनमानसात स्वातंत्र्याची भावना प्रज्वलित केली. याच कारणामुळे बंगालच्या फाळणीविरुद्ध इतका व्यापक जनक्षोभ निर्माण झाला की, शेवटी ब्रिटिश शासनाला आपला प्रस्ताव मागे घ्यावा लागला. नुकतेच भारत सरकारने ‘वन्दे मातरम्’ला प्राथमिकता देऊन संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ गाण्याचा जो आग्रह धरला आहे, तो अत्यंत योग्य आणि कौतुकास्पद आहे.
२०२६च्या बंगाल निवडणुकीच्या निकालांनी १९०५ ते १९११ दरम्यान बंगालमध्ये झालेल्या जनजागृती, संकल्प, राष्ट्रीय चेतना आणि निर्णायक सक्रियतेच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. बंगालला भाषिक अस्मितेच्या आधारावर वेगळे करण्याचे कारस्थान, या निवडणुकीने उद्ध्वस्त केले आहे. बंगाली भाषा वेगळी असली, तरी तिची अस्मिता भारताच्या आध्यात्मिक अस्मितेपेक्षा वेगळी नसून, तिचा एक अविभाज्य भाग आहे. हे या निवडणुकीच्या निकालांनी सिद्ध केले आहे.
१९०५ मध्ये ज्याप्रमाणे ब्रिटिश वसाहतवादी शक्ती आणि जिहादी कट्टरपंथी, भारताची राष्ट्रीय ओळख नष्ट करण्यासाठी एकत्र येऊन काम करत होते. त्याचप्रमाणे २०२६ मध्ये विचारहीन राजकारणी, जिहादी कट्टरपंथी आणि सांस्कृतिक मार्सवाद, बंगालचे भारतासोबतचे संबंध संपवण्यासाठी मिळून काम करत आहे. १९०५ आणि २०२६ या दोन्ही काळांत, बंगालच्या हिंदूंना आपल्या अस्तित्वावर आलेल्या संकटाचा सामना करावा लागला आहे. असे दिसते की, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, श्री अरविंद आणि रवींद्रनाथ टागोरांच्या बंगालची अस्मिता पुन्हा एकदा जागृत झाली आहे. भारताचे सर्वसमावेशक, एकात्म आणि आध्यात्मिक जीवनदर्शन म्हणजेच, भारताचे हिंदुत्व पुन्हा एकदा प्रखरपणे समोर आले आहे.
हा निकाल शक्य करणार्या शासन आणि प्रशासनाच्या सर्व अधिकार्यांचे, तसेच निर्भयपणे अभूतपूर्व संख्येने मतदान करण्याचे धैर्य आणि संकल्प प्रदर्शित करणार्या बंगालच्या सर्व महिला व पुरुष नागरिकांचे मनःपूर्वक अभिनंदन. त्यांच्या लोकशाहीप्रति असलेल्या कटिबद्धतेने आणि परिवर्तनाच्या आकांक्षेने हा ऐतिहासिक निकाल शक्य केला आहे. निःसंशयपणे हा बंगालचा ‘वन्दे मातरम् क्षण’ आहे.
डॉ. मनमोहन वैद्य
(लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य आहेत.)