पालघर : (Vadhvan Port Land Acquisition) वाढवण बंदरासाठी आम्ही संवादातूनच भू-संपादन करत आहोत. सुरुवातीच्या काळात अनेक लोकांनी अनेक अफवा पसरवल्याने लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज होता. तो गैरसमज हळूहळू आम्ही दूर केला असून आता गावकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद पाहता आम्ही हे काम लवकरच पूर्ण करू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
गुरुवारी, मुख्यमंत्र्यांनी डहाणू येथे प्रस्तावित वाढवण पोर्ट स्थळाची पाहणी केली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "जेएनपीटी हे देशातील सर्वात मोठे बंदर आहे. जवळपास ७० लाख मेट्रिक टन माल हाताळण्याची क्षमता या बंदरात आहे. पण वाढवण बंदर हे जेएनपीटीपेक्षा तीन पट मोठे आहे. हे देशातील सर्वात मोठे आणि जगातील पहिल्या दहापैकी एक असलेले बंदर आहे. हे बंदर झाल्यानंतर इथे जगातील सर्वात मोठे जहाजदेखील येऊ शकेल.
या बंदराचे काम वेगाने सुरु आहे. जवळपास ३० ते ४० टक्के भू-संपादन पूर्ण झाले आहे. कुठेही बळजबरीने भू-संपादन होऊ नये हा आमचा प्रयत्न आहे. यादृष्टीने ग्रामस्थ आणि मासेमारी करणाऱ्या बांधवांना विश्वासात घेऊन त्यांचे योग्य पुनर्वसन करतच हा प्रकल्प करायचा आहे. त्यांच्याशी चांगला संवाद प्रस्थापित झाला आहे. या एका प्रकल्पातून १० लाख रोजगारनिर्मिती होणार आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील स्थानिकांना आणि डहाणू तालुक्यातील लोकांना मोठ्या प्रमाणात सामील कसे करून घेता याचा प्रयत्न सुरु आहे." (Vadhvan Port Land Acquisition)
ते पुढे म्हणाले की, "मासेमारी करणाऱ्यांना एक मासेमारीचे बंदर तयार करून देतो आहोत, जेणेकरून त्यांचा व्यवसाय वाढेल. वाढवण बंदर, विरार-अलीबाग कॉरिडोर आणि विरारच्या जवळ एक नवीन विमानतळ तयार करणार आहोत. या सगळ्या प्रकल्पांमुळे या भागात चौथी मुंबई तयार होणार असून एक मोठी आर्थिक गुंतवणूक येणार आहे. या संपूर्ण आर्थिक परिवर्तानात स्थानिकांना सामील करून घेण्यासाठी इथे मोठ्या मत्स्यपालन संस्था तयार करणे आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहे. इतक्या वर्षांपासून अडलेले सगळे प्रकल्प पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकारने मार्गी लावले आहेत."
...तोपर्यंत विकासाला अर्थ नाही
"एका वाढवण बंदरामुळे पुढचे तीस वर्ष महाराष्ट्राची आणि देशाची अर्थव्यवस्था वर्धित वेगाने विकसित होताना पाहायला मिळेल. त्यामुळे देशाच्या इतिहासातील विकासाचे एक महत्वाचे पान म्हणजे वाढवण बंदर आहे. काहीही झाले तरी आम्ही स्थानिकांना घेऊनच विकास करू. स्थानिकांना विकासाचा भाग केल्याशिवाय कुठलाही विकास होऊ शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत स्थानिकांचे जीवन बदलत नाही तोपर्यंत या विकासाला अर्थ नाही हे लक्षात घेऊनच नियोजन केले आहे. पुढच्या तीन वर्षांत ठळक काम पूर्ण करून हे बंदर अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न आहे. वाढवणवरून मल्टीमॉडेल कनेक्टिविटी देण्याचे नियोजन केले आहे," असेही त्यांनी सांगितले. (Vadhvan Port Land Acquisition)
बोईसर बुलेट ट्रेन स्टेशनची पाहणी
"आम्ही बुलेट ट्रेनच्या बोईसर स्टेशनची पाहणी केली असून त्याचे काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे. डिसेंबर २०२७ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या बुलेट ट्रेनमुळे आर्थिक विकासाकरिता मोठे क्षेत्र खुले होईल. तसेच एकप्रकारे बीकेसीचा विस्तार होईल. कारण इथून बीकेसीपर्यंत अर्ध्या तासात पोहोचता येणार आहे," असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (Vadhvan Port Land Acquisition)