जेव्हा ‘एडिनबर्ग’ने काशीला अभिवादन केले...

    28-Jun-2026
 
Sushruta Statue Edinburgh
 
सभ्यतेचा इतिहास हा केवळ साम्राज्यांचा इतिहास नाही, तो ज्ञानाचा, संशोधनाचा आणि मानवकल्याणासाठी झटलेल्या ऋषिमुनींचा इतिहासही असतो. त्या इतिहासातील एक तेजस्वी अध्याय म्हणजे महर्षी सुश्रुत. अलीकडेच त्यांच्या पुतळ्याचे ‘द रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स ऑफ एडिनबर्ग’ या स्कॉटलंडच्या संस्थेत अनावरण करण्यात आले. त्यानिमित्ताने महर्षी सुश्रुत आणि त्यांच्या वैद्यकशास्त्रातील योगदानाचा मागोवा घेणारा लेख...
 
‘एडिनबर्ग’पासून काशीपर्यंत - एका वारशाचा शोध
 
दि. १९ जून २०२६ रोजी स्कॉटलंडच्या एडिनबर्ग शहरात रिमझिम पाऊस बरसत होता. जुन्या दगडी इमारती, थंडगार वारा आणि इतिहासाची जाणीव करून देणार्‍या वातावरणामुळे प्रत्येकालाच भूतकाळात प्रवेश केल्याचा अनुभव होत असे. शहराच्या मध्यभागी असलेली ‘द रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स ऑफ एडिनबर्ग’ ही वास्तू म्हणजे, जागतिक शल्यचिकित्सकांचे तीर्थक्षेत्रच. १५०५ साली स्थापन झालेल्या या संस्थेने पाच शतकांहून अधिक काळ आधुनिक शल्यचिकित्सेच्या विकासाला दिशा दिली. जागतिक शल्यचिकित्सकांच्या ‘एफआरसीएस’ पदवीच्या परंपरेचे, हीच संस्थाच उगमस्थान. दि. १९ जून रोजी या संस्थेच्या ऐतिहासिक सभागृहात विविध देशांतील नामवंत शल्यविशारद, वैद्यकतज्ज्ञ, आयुर्वेदतज्ज्ञ, संस्कृत संशोधक एकत्र जमले होते. सभागृहात सर्वांचे लक्ष होते एका अशा व्यक्तिमत्त्वाकडे, ज्याने हजारो वर्षांपूर्वी गंगा तीरावरून शल्यचिकित्सेला वैज्ञानिक दिशा दिली. ते व्यक्तिमत्त्व होते महर्षी सुश्रुत!
 
त्या दिवशी ‘रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स’मध्ये महर्षी सुश्रुत यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना झाली. महर्षी सुश्रुतांच्या पुतळ्याचे अनावरण भारताचे स्कॉटलंड येथील राजदूत सिद्धार्थ मलिक, त्या संस्थेच्या अध्यक्षा कार्ल मॅकनॉट यांच्या हस्ते झाले. हा क्षण विज्ञानाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण होता. आधुनिक शल्यचिकित्सेच्या अत्यंत प्रतिष्ठित संस्थेने प्राचीन भारतातील एका महान शल्यवैद्याच्या योगदानाला सार्वजनिकरीत्या मान्यता दिली होती.
 
इतिहासाचा पुनर्शोध : या कार्यक्रमामागे प्रख्यात ब्रिटिश सर्जन प्रा. चंद्रा चेरुवू यांच्या ‘सुश्रुत प्रोजेट’चे प्रयत्न आहेत. या प्रकल्पात आधुनिक शल्यवैद्यकीय इतिहासात महर्षी सुश्रुत यांच्या स्थानाचा पुराव्यांच्या आधारे विचार व्हावा, याचा विचार झाला आहे. गेल्या वर्षभरात विविध देशांतील शल्यविशारद, वैद्यक, आयुर्वेदाचार्य आणि संशोधक यात सहभागी झाले. त्यातूनच महर्षी सुश्रुतांवरील संशोधनपर लेखसंग्रह प्रकाशित झाला. हा ग्रंथ आधुनिक शल्यविशारदांनीच लिहिला, हे विशेष. या ग्रंथात मुंबईचे आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. अश्विन सावंत यांचे तीन संशोधनपर लेख असून, ग्रंथाच्या संपादन प्रक्रियेतही त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी ‘भारत हीच सर्जरीची जन्मभूमी’ या लेखात ‘सुश्रुतसंहिता’, ‘चरकसंहिता’, ‘ऋग्वेद’, ‘अथर्ववेद’, ‘रामायण’, ‘महाभारत’, पाणिनीची ‘अष्टाध्यायी’, पतंजलीचे ‘महाभाष्य’, ‘हस्त्यायुर्वेद’ वगैरे ग्रंथांचा आधार घेत, भारतीय शल्यविद्येची परंपरा उलगडली. या संशोधनग्रंथातील सर्व भारतीय शाखांतील तज्ज्ञांच्या योगदानामुळे हा भारतीय शल्यपरंपरेचा आढावा घेणाराच दस्तऐवज ठरतो. यानंतर जगभरातील वैद्यकीय वर्तुळात महर्षी सुश्रुत नेमके कोण होते? त्यांचे नेमके कार्य काय? असे प्रश्न निर्माण झाले. यांच्या उत्तरासाठी आपल्याला काळाच्या प्रवाहात मागे जावे लागेल.
 
आपल्याला आयुर्वेदाबद्दल प्रेमही आहे आणि गैरसमजही. ‘आयुर्वेद’ हा शब्द उच्चारला की, बहुतेकांच्या डोळ्यांसमोर काढे, चूर्णे किंवा पंचकर्म यांचीच प्रतिमा उभी राहते. आयुर्वेदाच्या शल्यतंत्राविषयी आपण फारसे बोलत नाही. आजही आयुर्वेदात सर्जरी असते का? हा प्रश्न अनेक लोक विचारतात. आयुर्वेदाच्या मूलभूत संहितेतील आयुर्वेदाच्या आठ प्रमुख विभागांपैकी एक स्वतंत्र शाखा म्हणजे ‘शल्यतंत्र’. याला वैज्ञानिक स्वरूप देणारे आचार्य म्हणजेच, महर्षी सुश्रुत! काशी ही जशी धार्मिक नगरी होती, तसेच काशी हे ज्ञानाचेही केंद्र होते. याच नगरीत एका गुरुकुलात शल्यविद्येची अशी परंपरा विकसित झाली. ‘सुश्रुतसंहिते’च्या आरंभी एक सुंदर प्रसंग येतो. आयुर्वेदाचे ज्ञान संपादण्याची इच्छा असलेले अनेक शिष्य, काशी राजा दिवोदास धन्वंतरींच्या आश्रमात येतात. धन्वंतरी त्यांना शल्यविद्या शिकवण्यास तयार होतात. या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक उल्लेखनीय नाव म्हणजे ‘सुश्रुत’ होय! भारतीय परंपरेत धन्वंतरींना आयुर्वेदाचे अधिष्ठाता मानले जाते. काशीतील याच वैद्यकीय शिक्षणपरंपरेचा सर्वांत तेजस्वी प्रतिनिधी म्हणजे महर्षी सुश्रुत!
 
महर्षी सुश्रुतांनी शस्त्रक्रियेला अशी वैज्ञानिक चौकट दिली की, तिचे प्रतिबिंब आधुनिक वैद्यकीय शिक्षणातही दिसते. ‘सुश्रुतसंहिता’ म्हणजे शल्यवैद्याचे प्रशिक्षण, शरीररचनाशास्त्र, मृतदेह विच्छेदन, विविध शस्त्रक्रियांबाबतच्या सर्व पैलूंचा आढावा घेणारा भारतीय वारसा. ‘एडिनबर्ग’मधील पुतळा हा सुश्रुतांनी निर्माण केलेल्या ज्ञानपरंपरांचाच सन्मान आहे. ते वैद्य असण्याबरोबरच उत्तम शिक्षक, संशोधक, विचारवंत आणि उत्कृष्ट निरीक्षक होते.
 
सुश्रुतांचा काळ : महर्षी सुश्रुतांचा नेमका कालखंड हा आजही अभ्यासाचा विषय. काही अभ्यासक त्यांचा काल इ.स. पूर्व १५०० किंवा त्याआधीचा मानतात. मात्र, अलीकडे निलेश ओक यांसारख्या काही संशोधकांनी, विविध संदर्भांच्या आधारे तो इ.स. पूर्व सहाव्या सहस्रकात नेला. डॉ. अश्विन सावंत यांनीही सुश्रुतांचा काळ इ.स. पूर्व ६००० असावा, असाच विचार मांडला. ‘सुश्रुतसंहिता’ ही अनेक पिढ्यांच्या अनुभवातून विकसित झालेली चिकित्सक परंपरा आहे. त्या परंपरेला एक शास्त्रीय स्वरूप देण्याचे श्रेय महर्षी सुश्रुतांना जाते. आयुर्वेदातील तीन प्रमुख ग्रंथांमध्ये ‘चरकसंहिता’, ‘सुश्रुतसंहिता’ आणि ‘अष्टांगहृदय’ यांचा समावेश होतो. यांपैकी ‘सुश्रुतसंहिता’ शल्यतंत्राला स्वतंत्र शाखा म्हणून विकसित करते.
 
शल्यचिकित्सा म्हणजे नेमके काय?
 
शल्यचिकित्सेचा मूलभूत अर्थ व्यापक आहे. ज्या रोगामध्ये शरीरावर प्रत्यक्ष हस्तक्षेप करावा लागतो, तेथे शल्यतंत्राची आवश्यकता असते. शरीरात अडकलेले परकीय पदार्थ बाहेर काढणे, फोड उघडणे, जखमा शिवणे, अस्थिभंग दुरुस्त करणे, मूत्राशयातील खडे काढणे, नाक किंवा कानाची पुनर्रचना करणे, डोळ्यांवरील काही उपचार करणे, यांचा विचार यात आहे. महर्षी सुश्रुतांच्या मते, वैद्याने प्रथम पाहायला शिकले पाहिजे. रुग्णाची चाल, चेहर्‍यावरील भाव, त्वचेचा रंग, वेदनेचे स्वरूप या प्रत्येक गोष्टीत निदानाची सूत्रे दडलेली असतात. आजच्या आधुनिक वैद्यकीय शिक्षणातील 'Listen to the patient; he is telling you the diagnosis' या तत्त्वाशी, सुश्रुतांचा दृष्टिकोन जवळचा वाटतो.
 
प्रत्येक कुशल शल्यचिकित्सकाच्या मागे हजारो तासांचा सराव असतो. आजही विद्यार्थी अनेक वर्षे प्रशिक्षण घेतल्यानंतरच शस्त्रक्रिया करण्यास सक्षम होतात. महर्षी सुश्रुतांनीही हाच मार्ग स्वीकारला होता. ते सांगतात, "ज्याने केवळ ग्रंथ वाचले आहेत; पण प्रत्यक्ष सराव केला नाही, तो रुग्णासाठी धोकादायक आहे आणि ज्याच्याकडे अनुभव आहे; पण शास्त्रज्ञान नाही, तोही घातक ठरू शकतो.” महर्षी सुश्रुतांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रुग्णाऐवजी भोपळा, दुधी, काकडी यांसारख्या भाज्यांवर सराव करण्याचा सल्ला दिला.
 
सुश्रुतांनी वैद्याच्या व्यक्तिमत्त्वालाही तेवढेच महत्त्व दिले आहे. त्यांच्या मते, शल्यतज्ज्ञांचा हात स्थिर असावा, बुद्धी तीक्ष्ण असावी, स्मरणशक्ती उत्तम असावी, संकटसमयी धैर्य राखण्याची क्षमता असावी, स्वच्छतेची सवय असावी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे करुणा असावी. सुश्रुतांनी रुग्णाचा उल्लेखही अत्यंत संवेदनशील भाषेत केला आहे. महर्षी सुश्रुतांचे क्रांतिकारक पाऊल म्हणजे, मृतदेह विच्छेदनाचा आग्रह. त्यांनी शस्त्रक्रियेसाठी शेकडो उपकरणांचीही निर्मिती करून त्यांचे वर्गीकरण करत ‘शल्यशास्त्रा’ला एक स्वतंत्र वैज्ञानिक भाषा दिली.
 
मृतदेह विच्छेदनापासून प्लास्टिक सर्जरीपर्यंत : ‘शास्त्र हे केवळ वाचनाने नव्हे; तर निरीक्षण, प्रयोग आणि सातत्यपूर्ण सरावातूनच सिद्ध होते’ हा आधुनिक वैद्यकशास्त्रातील विचार सुश्रुतांनी सहा हजार वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांसमोर ठेवला. आज वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुरुवात anatomy Dissection Hall मधून होते. पण, हा विचार प्राचीन काळात सहजस्वीकार्य नव्हता. त्यावेळी प्रत्यक्ष शरीररचनेच्या अभ्यासाविना कुशल शल्यवैद्य होणे अशक्य असल्याचे महर्षी सुश्रुतांनी म्हटले. ‘सुश्रुतसंहिते’मध्ये त्यांनी मृतदेह निवडण्यापासून त्याच्या अभ्यासापर्यंतची पद्धत सविस्तर वर्णिली. युरोपमध्ये मानवी विच्छेदनाला मान्यता मिळण्याच्या अनेक शतकांपूर्वीच भारतात हा विचार मांडला होता. सुश्रुतांनी याद्वारे मानवी शरीराची अंतर्गत रचना समजून घेण्याचा प्रयत्न केला.
 
महर्षी सुश्रुतांनीही शल्यक्रियांचेही वर्गीकरण केले. त्यांनी शल्यतंत्राच्या आठ मूलभूत क्रिया सांगितल्या- छेदन, भेदन, लेखन, वेधन, एषण (शोध घेणे), आहरण (बाहेर काढणे), विस्रावण (द्रवाचा निचरा करणे) आणि शिवण. ‘सुश्रुतसंहिते’त शस्त्रक्रियेच्या उपकरणांचेही वर्णन असून, त्यात सुमारे १२५ प्रकारची शस्त्रसाधने आढळतात. आजच्या आधुनिक ‘ऑपरेशन थिएटर’मधील शस्त्रक्रियापूर्व तयारी आणि शस्त्रक्रियापश्चातची काळजी, या संकल्पनांचीही मांडणी ‘सुश्रुतसंहिते’त आहे. महर्षी सुश्रुतांनी मांडलेली नैतिक भूमिकाही महत्त्वाचीच. ते सांगतात, "ज्याला एखादी शस्त्रक्रिया अवगत नाही, त्याने ती करण्याचा प्रयत्न करू नये. तसेच रुग्णांशी आदराने वागावे, त्याचा विश्वास कधीही तोडू नये. लोभापोटी उपचार करू नये. गुरूंचा सन्मान करावा आणि ज्ञान सतत वाढवावे.” अलीकडे वैद्यकीय पदवीदान समारंभात घेतल्या जाणार्‍या शपथेचा आत्मा आणि सुश्रुतांच्या संदेशात साम्य दिसते.
 
महर्षी सुश्रुतांचे नाव जगभर ओळखले जाते ते, नाकाच्या पुनर्रचना शस्त्रक्रियेमुळे. आज ‘प्लास्टिक सर्जरी’ म्हणजे सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया किंवा अपघातानंतरचे पुनर्वसन, अशी कल्पना आहे. परंतु, प्राचीन काळी ही सामाजिक गरज होती. त्याकाळी शिक्षा म्हणून नाक कापले जाई, युद्धांमध्ये तलवारीच्या घावांनी चेहरा विद्रूप होई, यामुळे व्यक्तीची समाजिक प्रतिष्ठाही नष्ट होत असे. त्यामुळेच नाकाची पुनर्रचना ही मानवी प्रतिष्ठा परत मिळवून देणारी ठरत असे. सुश्रुतांनी याचे केलेले वर्णन आजही अभ्यासकांना आश्चर्यचकित करते. यात नाकावरील दोषग्रस्त भागाचे मोजमाप झाल्यानंतर, गालावरील किंवा कपाळावरील त्वचेचा तुकडा योग्य आकारात कापून, रक्तपुरवठा सुरू राहाण्यासाठी काही भाग शरीराशी जोडून ठेवण्याबाबत ते सांगतात. नंतर ही त्वचा नाकावर बसवण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केले आहे. आधुनिक सर्जरीशी याचे साम्य दिसते.
 
पुण्यापासून लंडनपर्यंत : सुश्रुतांच्या या ज्ञानाची दखल युरोपमध्ये १८व्या शतकाच्या उत्तरार्धात घेतली गेली. १७९४ मध्ये पुण्याजवळ एका भारतीय वैद्याने केलेली नाकाची यशस्वी पुनर्रचना शस्त्रक्रिया दोन इंग्रज शल्यचिकित्सकांनी पाहिली. त्याचे वर्णन त्यांनी लंडनच्या The Gentleman's Magazine मध्ये केले. यामुळे युरोपच्या वैद्यकीय जगतात खळबळच माजली. याने प्रेरित होऊन इंग्लंडचे प्रसिद्ध शल्यविशारद जोसेफ कॉन्स्टंटाईन कार्प्यू यांनी याचा अभ्यास करत १८१४ मध्ये इंग्लंडमध्ये यशस्वीपणे नाकाची पुनर्रचना शस्त्रक्रिया केली. त्यांनी त्यांच्या ग्रंथात याचे भारतीय मूळ स्पष्टपणे नमूद केले आहे.
 
सुश्रुतांनी वर्णन केलेल्या नेत्रविकारांपैकी सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे, मोतीबिंदूवरील उपचार. त्याकाळी विशिष्ट सुईच्या साहाय्याने अपारदर्शक पडदा बाजूला करून रुग्णाला काही प्रमाणात दिसू लागावे, असा प्रयत्न असे. सुश्रुतांनी अस्थिभंगाबाबतही मार्गदर्शन केले आहे. याशिवाय, मूत्राशयातील खडे काढणे, फोडांवरील उपचार, विविध प्रकारच्या जखमांचे आणि परकीय पदार्थ शरीरातून बाहेर काढण्याचेही उल्लेख संहितेत आहेत.
 
भारतातून अरब जगतात... आणि तेथून युरोपमध्ये!
 
सातव्या ते आठव्या शतकादरम्यान बगदादमधील प्रसिद्ध ‘बैत अल-हिमा’ येथे भारतीय, ग्रीक आणि पर्शियन ग्रंथांचे अरबी भाषांतर झाले. अनेक अभ्यासकांच्या मते, ‘सुश्रुतसंहिते’चेही अरबी भाषांतर ‘किताब-इ-सुश्रुद’ किंवा तत्सम नावाने उपलब्ध होते. यातूनच भारतीय शल्यविद्येतील संकल्पना पश्चिम आशियात पोहोचल्या. पर्शियन भाषा ते अरबी भाषा ते लॅटिन भाषा असा प्रवास करत, हे ज्ञान युरोपात पोहोचले. तर काहींच्या मते, हे विज्ञान अरब विद्वानांच्या माध्यमातूनच युरोपात गेले. अर्थात, यात विविध संस्कृतींनी अनुभवांची भर घातलीच.
 
निरीक्षण, प्रयोग, कौशल्य आणि मानवकल्याण या चार स्तंभांवर उभारलेली महर्षी सुश्रुतांची ‘शल्यविद्या’ आजही तितकीच अर्थपूर्ण आहे. आज भारत जगातील सर्वांत मोठ्या वैद्यकीय शिक्षणव्यवस्थांपैकी एक आहे. अशा काळात महर्षी सुश्रुतांचा नैतिकतेचा संदेश महत्त्वाचा ठरतो.
 
शतकानुशतके सुश्रुतांचे ज्ञान ग्रंथांतून, विविध देशांमध्ये झालेल्या भाषांतरातून, संशोधनातून पुढे जात राहिले. मात्र, त्याचे श्रेय आद्यसंशोधक म्हणून महर्षी सुश्रुतांना मिळत नव्हते. अखेर एडिनबर्गच्या ‘रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स’ने त्यांना मानवजातीच्या शल्यवैद्यकीय इतिहासातील अग्रणी व्यक्तिमत्त्वाचा सन्मान दिला. तो भारतीय ज्ञानपरंपरेचाही विजय ठरला. इतिहासातील काही व्यक्तिमत्त्वे काळाच्या पडद्याआड जात नाहीत, काळ उलट त्यांच्याकडे परत येतो. महर्षी सुश्रुत हे त्यांपैकीच एक!
॥जयतु आयुर्वेदः जयतु भारतम्॥
 
रुचिता राणे
(लेखिका स्वतंत्र संशोधिका आहेत)




संबंधित मजकूर