आज समाजात घडणार्या भांडणांच्या, खुनांच्या, बलात्कारांच्या किंवा इतर हिंसक घटनांकडे आपण प्रामुख्याने कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नांप्रमाणे पाहतो. गुन्हा घडला, आरोपी सापडला, शिक्षा झाली की विषय संपला, अशीच समाजाची आणि व्यवस्थेची भूमिका असते. मात्र, या प्रत्येक घटनेच्या मुळाशी दडलेले मानसिक असंतुलन, भावनिक अपरिपक्वता यांचा विचार क्वचितच केला जातो. त्यामुळे गुन्ह्यांची कारणे शोधण्याऐवजी आपण केवळ त्यांच्या परिणामांशी झुंज देत राहतो. गुन्हेगारीकडे समाजाच्या बिघडलेल्या मानसिक आरोग्याचे लक्षण म्हणून पाहण्याची वेळ आता आली आहे. समाजातील वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्याच्या विविध पैलूंचा आढावा घेणारा लेख...
रागाच्या एका क्षणात होत्याचे नव्हते होते आणि थंड डोक्याने रचलेल्या कटामुळे, आयुष्यभराची स्वप्ने मातीत मिळतात.सांगलीत एका मुख्याध्यापक वडिलांनी स्वतःच्या बारावीतील मुलीला ठार मारले. कारण, तिने फक्त इतकेच विचारले, ‘तुम्ही तरी कुठे कलेटर झालात?’ त्या एका वाक्याने वडिलांचा राग उसळला, आणि मुलीचा श्वास कायमचा थांबला. मालाड स्टेशनवर लोकलच्या दरवाजात झालेल्या क्षुल्लक भांडणात, एका प्राध्यापकाच्या पोटात हिर्याला पैलू पाडणारा चिमटा खुपसला गेला. किरकोळ वाद; पण किंमत एका माणसाचे आयुष्य. या दोन घटना हे एक टोक. क्षणात उसळलेला राग आणि दुसर्या टोकाला अनेक दिवस प्लॅन करून केलेला खून. नाशिकमध्ये डॉटर पत्नीची आत्महत्या की नियोजित हत्या? लोहगडावरची घटना अपघात की, प्रियकरासोबत रचलेला बनाव?...आणि या सगळ्याच्या मधे आहे नसरापूर. चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिला शेणात पुरणारा असा माणूस, जो आधीही अशाच प्रकारच्या गुन्ह्यात पकडला गेला होता; पण पुराव्याअभावी सुटला.
या पाच घटना वेगवेगळ्या शहरांत, वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक वर्गांत, वेगळ्या कारणांसाठी घडल्या. पण, त्यामध्ये एक धागा समान आहे. तो म्हणजे, आपला समाज भावनिकदृष्ट्या आजारी पडतोय आणि आपण त्याला फक्त ‘गुन्हा’ म्हणतो, ‘आजार’ नाही. आज आपल्या समाजाचेच मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे.
समाजात अनेक गुन्हेगारी घटना घडतात, ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणून त्या सांगितल्याही जातात. गुन्हेगारी वातावरणात वाढलेली माणसे पैशांसाठी मारामारी करतात, त्यामध्ये काही वेळा खूनही होतो. दारू पिऊन अशा घटना होतात, असे म्हणूनच बहुसंख्य मध्यमवर्गीय माणसे त्याकडे सर्रास दुर्लक्ष करताना दिसतात. मात्र, मी तुम्हाला येथे पाच घटना सांगणार आहे, त्या वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या आहेत. यातील दोन घटना या आकस्मिक रागाच्या भरात घडलेल्या आहेत. पण, दोन घटना नियोजन करून झालेल्या असाव्यात आणि एक घटना समाजाला आणि व्यवस्थेलादेखील मानसिक स्वास्थ्याची पुरेशी माहिती नसल्याचेच लक्षण आहे.
पहिली घटना- सांगली जिल्ह्यातील एका गावातील मुख्याध्यापक वडिलांनी त्यांच्या बारावीतील मुलीला रागाच्या भरात इतकी मारहाण केली की, त्या मुलीचा मृत्यू झाला. माजी सरपंच असलेल्या मुलीच्या आईनेच, ही घटना पोलिसांना सांगितली. त्या मुलीला एका परीक्षेत कमी गुण मिळाले, त्यासाठी वडील तिला रागावले. यामध्ये फारसे चुकीचे घडलेले नाही. तुमच्या-आमच्या घरातही असे घडतेच. पण, त्यावेळी त्या मुलीने वडिलांना उलट उत्तर दिले की, ‘तुम्ही तरी कुठे कलेटर झाला आहात?’ हे ऐकून वडीलांचा पारा चढला. ते रागाने बेभान झाले. त्यांनी घरातील काठी घेऊनच मुलीला मारहाण केली. या घटनेत मुलीचा खून करण्याचा वडिलांचा हेतू नव्हता. पण, रागाने बेभान झाल्याने, सुशिक्षित व्यक्तीच्या हातूनदेखील कसे भयानक कृत्य होऊ शकते, हेच या घटनेतून अधोरेखित होते.
अशीच किरकोळ भांडणातून मारहाण केल्याची घटना, मालाड रेल्वे स्टेशनवर घडली. दरवाजात उभे राहिल्यावरून प्रवाशांमध्ये वाद झाला. या भांडणातील एक व्यक्ती जी कॉलेजमध्ये प्राध्यापक होती, ती मालाड स्टेशनवर लोकलमधून उतरली. त्याच्यामागून ज्याच्याशी वाद झाला होता, तो माणूसदेखील उतरला. तो हिरे घासण्याचे काम करणारा होता. त्याने त्याच्या खिशातील हिर्यांना पैलू पाडण्याचा चिमटा होता, तो त्या प्राध्यापकाच्या पोटात खुपसला. यामुळे अतिरक्तस्राव होऊन, त्या बिचार्या प्राध्यापकाचा मृत्यू झाला.
या घटनेत मनात साठलेला राग कसा भयानक परिणाम घडवू शकतो, हे आपल्याला पाहायला मिळते. मुंबईत लोकलमधून प्रवास करताना, रोज किमान एकतरी भांडण पाहायला मिळतेच. कारण, परिस्थितीवरील राग माणसे आजूबाजूच्या माणसांवर काढत असतात. मुंबई रेल्वे पोलिसांकडे गेल्या वर्षभरात, एक हजार, ८००हून अधिक रेल्वे परिसरात घडलेल्या मारामारीच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. म्हणजे, मुंबई लोकलमध्ये होणार्या रोज सरासरी पाच मारामार्या पोलिसांपर्यंत पोहोचतात. यावरूनच लोकांच्या मनात किती राग आहे आणि तो कसा व्यक्त होतो, याचा अंदाज आपण करू शकतो.
या प्रकारच्या रागाच्या भरात होणारे खून आणि मारामार्या कमी करायच्या असतील, तर मनातील भावना जाणणे आणि त्यावर काम करणे हे महत्त्वाचे आहे, हे वेळोवेळी सांगत राहावे लागेल. त्यावर लेखन, ठिकठिकाणी चर्चा, त्यामध्ये माणसांना सहभागी करून घेणे, हे समाजातील जाणत्या व्यक्तींनी सतत करत राहायला हवे. मात्र, समाजात मानसिक आरोग्याला महत्त्वच दिले जात नाही, त्याची माहितीही घेतली जात नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्यात नसरापूर येथे घडली, तशाच घटना घडताना दिसतात.
नसरापूर येथे आरोपीने चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. त्यात मुलीचा गुदमरून मृत्यू झाला. त्यावर त्याने तिचा मृतदेह, तिथेच शेणात लपवून ठेवला. या घटनेच्या विरोधात ‘रस्ता रोको’ झाला, अगदी मुख्यमंत्र्यांनीही या घटनेची दखल घेतली. पण, या घटनेतील आरोपी यापूर्वीदेखील अशाच प्रकारच्या घटनांत पकडला गेला होता. त्यावरूनच हा आरोपी गुन्हेगारी स्वभाव विकृती (antisocial personality disorder) असणारा असावा. अशा व्यक्तींना दुसर्या माणसांच्या भावना समजतच नाहीत. स्वतःला मजा मिळावी, म्हणूनच त्या इतरांवर अत्याचार करतात. ‘पोक्सो’खाली पूर्वी अटक झालेली व्यक्ती पुराव्याच्या अभावी सुटते आणि पुन्हा असे गुन्हे करते. कारण पोलीस, वकील आणि समाज यांना व्यक्तिमत्त्वातील विकृतींची पुरेशी माहिती नसावी. अशा गुन्हेगारांना मनोरोगतज्ज्ञ डॉटरांना दाखवून, ‘जन्मठेपे’सारखी शिक्षा आणि तुरुंगातही मानसोपचारांची व्यवस्था करायला हवी. अन्यथा, मानसिक विकृतीमुळे अशी माणसे पुन्हापुन्हा गुन्हे करतच राहतील.
यानंतरच्या दोन घटना श्रीमंत आणि सुशिक्षित समाजात, नियोजनपूर्वक घडवून आणलेल्या असाव्यात. यातील एका घटनेतील आरोपी फरार आहे, तर दुसर्या पुण्यात घडलेल्या घटनेतील आरोपी पोलीस कोठडीत असून; त्याचे कुटुंबीय फरार आहेत.
नाशिक येथे एक लोकप्रिय डॉक्टर स्त्री, तिच्या बेडरूममध्ये गळफास लावलेल्या स्थितीमध्ये सापडली होती. तिने आत्महत्या केल्याचे भासवले गेले. माहेरच्या माणसांनी याबाबत पोलीस तक्रार केली. जिचा मृत्यू झाला ती डॉटर असून, तिच्या मुलींच्या परीक्षा होईपर्यंत माहेरी जायला तयार नव्हती. ती आत्महत्या कशी करेल? असा त्यांचा प्रश्न. तिच्या डॉटर पतीचे विवाहबाह्य संबंध असून, त्यावरूनच यांच्यात सतत वाद होत असत. पण, आपला नवरा या पातळीवर जाऊन आपल्यालाच ठार मारेल, अशी शंका त्या स्त्रीच्या मनात आली नसावी.
पोलीस तपासात त्यांच्या बेडरूममध्ये दोन इंजेशन सिरिंज मिळाल्या. त्यावरूनच झोपेचे इंजेशन देऊन, नंतर तिला गळफास लावला असण्याची शक्यता समोर आली आहे. त्या स्त्रीचा डॉक्टर पती आणि त्याच्यासोबत काम करणारी डॉक्टर मैत्रीण दोघेही फरार आहेत. त्यावरूनच ही आत्महत्या नसून, खून असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे. आमदार फरांदे यांनी, या प्रकरणात तातडीने तपास व्हावा, अशी मागणी केली आहे.
दुसर्या घटनेत पुण्यात ज्याच्याशी लग्न ठरले आहे, त्या तरुणालाच तरुणीने स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लोहगडावर नेले. सेल्फी काढण्यासाठी त्याला डोंगराच्या कड्यावर नेले आणि तेथे त्याचा पाय घसरला आणि दरीत कोसळून मृत्यू झाल्याचे, चित्र निर्माण केले. ती उपवर तरुणी, या घटनेनंतर चार दिवसांनीच मुलाच्या घरी गेली. त्यावेळी ती घटना कशी घडली हे सांगत असताना, ती विसंगत बोलत होती. तिची देहबोली काहीतरी वेगळेच सांगत होती. त्यामुळे मृत मुलाच्या बहिणीला संशय आला. पोलीस तपास केल्यानंतर, ती मुलगी आणि तिचा प्रियकर यांनी नियोजन करून हा खून केला आहे, असे आढळले. सेल्फी काढताना धक्का देऊन तिनेच त्याला दरीत पाडले, असे ती तरुणी आणि तिच्या प्रियकराच्या फोनमधील माहितीवरून दिसत आहे. ज्यांचे लग्न ठरले होते, ती दोन्ही कुटुंबे पुण्यातील अब्जाधीश व्यावसायिक आहेत.
या दोन्ही घटनांमध्ये आपल्या प्रेमसंबंधांमध्ये अडथळा असणार्या व्यक्तीला बाजूला करून तो मृत्यू, हा आत्महत्या किंवा अपघात वाटावा असेच चित्र निर्माण केले आहे. वरवर पाहता हे पहिल्या दोन घटनांसारखे, भावनेच्या भरात केलेले कृत्य नाही. पण, जगाला किंवा कुटुंबीयांना मान्य नसणारे प्रेमसंबंध, शेवटच्या दोन्हीं घटनांमध्ये आहेत. प्रेम किंवा लैंगिक आकर्षण ही भावना, माणसाच्या मनात ठरावीक पद्धतीचेच विचार निर्माण करते. त्यामुळे क्रिएटिव्ह आयडिया सुचतात. आपण आपल्या संबंधातील अडथळा दूर करून नामानिराळे राहू शकतो, असे वाटू लागते. आपण आपल्या हुशारीचा उपयोग करून एखाद्या व्यक्तीला संपवू शकतो आणि बनाव निर्माण करू शकतो, असे या माणसांना वाटत राहते. स्वतःच्या सुखासाठी, एका व्यक्तीला ठार करण्याचे थंड डोयाने नियोजन केले जाते. हे म्हणजे हा गुन्हा करणार्या माणसांप्रमाणेच, समाजाचेच मानसिक आरोग्य ठीक नसल्याचे लक्षण आहे. ज्या निष्पाप व्यक्ती बळी पडल्या, त्यांनी आपल्या जोडीदारावर पूर्ण विश्वास ठेवला, हाच त्यांचा दोष ठरला.
हे केवळ या पाच घटनांपुरते मर्यादित नाही. या घटना हे हिमनगाचे दिसणारे टोक आहेत. ‘नीट’ परीक्षेतील घोटाळ्यामध्ये, अनेक बुद्धिमान प्राध्यापक अडकले आहेत. परीक्षेत अपेक्षित यश मिळावे म्हणून, पेपर विकत घेण्यासाठी हजारो विद्यार्थी आणि त्यांचे पालक आज तयार आहेत. आता ती परीक्षा पुन्हा द्यावी लागणार म्हणून, अनेक विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. अशा अनेक घटना रोज घडताना दिसत आहेत. त्यावरूनच स्वतःला जे मिळवायचे आहे, त्यासाठी कोणताही मार्ग निवडण्याची तयारी केवळ राजकारणी लोकांचीच नसून; तर डॉक्टर, उद्योगपती, प्राध्यापक अशा बुद्धिजीवी वर्गाचीदेखील असल्याचे दिसते. ते मिळवण्यासाठी दुसर्या व्यक्तीला किंवा स्वतःला संपवणे, यामध्ये काही चूक आहे असे या माणसांना वाटतच नाही.
या पाचही घटना एकच गोष्ट ओरडून सांगतात ती म्हणजे आपण राग, हट्टीपणा आणि शरीर सुखाचा हव्यास यांना फक्त कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न समजत आहोत. पण, हा प्रश्न मानसिक आरोग्याचादेखील आहे, हे आपल्या लक्षातच येत नाही. या पाचही घटनांमध्ये, मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते पुढीलप्रमाणे
१. क्षणिक रागाचे स्फोट : सांगलीतील वडील किंवा मालाडमधील प्राध्यापकाचा खून या घटनांमध्ये हेतू खुनाचा नव्हताच; पण ‘इमोशनल रेग्युलेशन’ अर्थात भावनिक व्यवस्थापन शून्य असल्याने असे घडले. सुशिक्षित झाल्याने, पैसे मिळवण्यासाठी एखादे काम करू लागल्याने माणसे भावनिकदृष्ट्या प्रगल्भ होतातच असे नाही. त्यासाठी स्वतःच्या मनःस्थितीकडे लक्ष देण्याचा सराव करावा लागतो. असे लक्ष देणे आवश्यक आहे, हे पटावे लागते. अठराशे पेक्षा अधिक मारामार्या, फक्त रेल्वे परिसरात निव्वळ एका वर्षात नोंदवल्या गेल्या. याचा अर्थ, राग ही वैयक्तिक भावना राहिली नसून, तो आता सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न झाला आहे.
२. विकृतीकडे दुर्लक्ष : नसरापूरची घटना ही 'Antisocial Personality Disorder' या प्रकारातील. अशा पद्धतीत असलेले गुन्हेगार पुराव्याअभावी सुटतात आणि पुन्हा गुन्हा करतात. आपल्याकडे पोलीस, वकील, न्यायव्यवस्था यांना ‘फॉरेन्सिक सायकियाट्री’चे योग्य ट्रेनिंग नसावे. त्यामुळेच ‘पर्सनॅलिटी डिसऑर्डर’ हादेखील एक मानसिक आजार आहे, याची जाणीवच होत नाही. अशा माणसांना शिक्षा आणि उपचार दोन्हींची आवश्यकता असून, ही संकल्पनाच व्यवस्थेत आज नाही. त्यामुळे ती निर्माण करावी लागेल.
३. थंड डोक्याने केलेले गुन्हे : नाशिकचे डॉक्टर जोडपे आणि लोहगडचा सेल्फी काढताना दाखवलेला अपघात, यामध्ये प्रश्न फक्त प्रेमाचा नाही, तर जगण्याच्या हक्काचाही आहे. आम्हाला हवे ते मिळवण्यासाठी आम्ही कोणालाही संपवू शकतो, ही भावनाच मानसिक विकृतीच आहे. ‘नीट’ घोटाळ्यातील प्राध्यापक असोत वा डॉक्टर आणि सुशिक्षित तरुण-तरुणी, त्यांच्या बुद्धीचा वापर नीतीसाठी नाही; तर गुन्हा लपवण्यासाठी करतात, तेव्हा तो समाजाच्या मानसिक आजाराचा पुरावाच म्हणायला हवा.
समाजाचे मानसिक आरोग्य सुधारता येईल का?
हो! आपण भावना व्यवस्थापन करण्याचे शिक्षण घरात, शाळेत, कामाच्या ठिकाणी, कुठेही घेत नाही. भावनांची सजगता येण्यासाठी, कुणीही फारसे महत्त्वच देताना दिसत नाही. राग आला की शांत कसे व्हायचे, अपमान झाला तरी तो कसा पचवायचा, हे आपल्याला कुठेच शिकवलेही जात नाही. त्यामुळे अनेक उच्चशिक्षित नवविवाहित बेभान होऊन, एकमेकांना मारायला धावतात. त्यांना त्यांच्यातील मतभेद शांतपणे चर्चा करून, सोडवताच येत नाहीत.
मानसिक विकृती म्हणजे वेडेपणा, हा आपल्या समाजातला मोठाच गैरसमज आहे. तो आधी दूर करायला हवा. माणसात स्वभाव विकृती असतात. अशा विकृती असलेले लोक मोकाट फिरतात आणि पुन्हा गुन्हे करत राहतात. हे थांबवायचे असेल, तर विविध स्वभाव विकृतींची माहिती सर्वांनी घ्यायला हवी. यश म्हणजे पैसा, स्टेटस, मार्स, सेस, स्वतःला हवे ते मिळवणे आणि आपण किती यशस्वी आहोत याचे प्रदर्शन करणे आणि त्यासाठी कोणताही मार्ग चालतो; असाच समज आज समाजात दृढ झाला आहे. त्यामुळे नीतिमत्ता दुय्यम झाली आहे. भावनिक आरोग्य यावर आज चर्चा होत नाही. घरात, शाळेत, ऑफिसमध्ये मानसिक आरोग्यावर बोलणे म्हणजे, कमजोरी दाखवणे असा एक समज असल्याचे पाहायला मिळते. समाज माध्यमांवर कोणत्याही लेखाखाली येणार्या प्रतिक्रिया, ट्रोल करणे, शिव्या घालणे हेदेखील समाजाचे मानसिक आरोग्य बिघडत असल्याचेच द्योतक आहे,
फक्त पोलीस-न्यायालये आणि शिक्षेने हे प्रश्न सुटणार नाहीत!
समाजाचे मानसिक आरोग्य चांगले होण्यासाठी भावनिक साक्षरतेची गरज आहे. स्वतःच्या भावना ओळखणे, राग आला की लगेच कृती न करणे, काहीही बोलण्यापूर्वी काही सेकंद थांबणे, आवश्यक असते तेव्हा मदत मागणे आणि विकृत वर्तणूक दिसली की त्या व्यक्तीला तज्ज्ञांकडे घेऊन जाणे, हे उपाय आपण सर्वजण करूच शकतो.
धार्मिक कट्टरता किंवा ईश्वराची भीती हा उपाय समाजाचे मानसिक आरोग्य सुधारू शकतो, असेही काहीजणांना वाटते. मात्र, ईश्वराची भीती ही काही प्रमाणात माणसावर धाक ठेवते. पण, त्यामुळे भावनेच्या भरात होणारे गुन्हे कमी होत नाहीत. कारण, माणसाचा भावनिक मेंदू अधिक प्रभावी झाला की, माणसाला विवेक राहत नाही. माणसाची श्रद्धा असली किंवा नसली, अगदी तो नास्तिक असेल तरीही त्याच्या मेंदूत असे घडूच शकते.त्यामुळे, धार्मिक उपासना आणि न्यायव्यवस्था हे उपाय यासाठी पुरेसे नाहीत. त्याच्या बरोबरीनेच मानसिक आरोग्याची सजगता, हा तिसरा स्तंभ विकसित करणे आवश्यक आहे. याचा विकास सर्व स्तरांतील आणि धर्मांतील माणसांसाठी होणे देखील महत्त्वाचे झाले आहे. धर्मग्रंथ आणि भारताचे संविधान महत्त्वाचे आहेतच पण, त्याचबरोबर स्वतःच्या मनाचे वाचन करणेदेखील आवश्यक आहे.
आपल्या सर्वांच्याच मनात एक हिंसक व्यक्ती दडलेली असते, असे आधुनिक मानसशास्त्र सांगते आहे. आपल्या मराठीमध्ये ‘रिकामे मन सैतानाचे घर’ अशी म्हण आधीपासूनच प्रचलित आहे. तो सैतान आपल्याच मनात असून, त्याच्यापासून पळाल्याने तो नष्ट होत नाही. या हिंसक आणि स्वतःच्या सुखासाठी इतरांचा विचार न करणार्या, आपल्याच मनातील सैतानाला सामोरे जाणेही तितकेच आवश्यक असते. आपल्या पूर्वजांनी त्यासाठी काहीवेळ साक्षी होऊन, आपल्या मनात आपोआप येणारे विचार पाहण्याचे तंत्र विकसित केले होते. पण, आपल्याला त्याचा विसर पडला आहे. आपण बाह्य अवधानात इतके व्यग्र आहोत की, स्वतःच्या मनात काय दडले आहे, हे पाहायलाच आपल्याकडे वेळच नाही आहे.
यावर उपाय म्हणजे भावना, नीतिमूल्ये याविषयी घरात, कामाच्या ठिकाणी गप्पा, चर्चा, विचारविनिमय करायला हवा. घरात मुलांना दात घासायला शिकवले जाते, तसे भावनिक व्यवस्थापनही शिकवायला हवे. पालकांनी स्वतःच्या वागण्यातूनच त्याचा आदर्श मुलांसमोर ठेवायला हवा. मुलांचे गुण आणि शैक्षणिक यश पुरेसे नाही; तर संवेदनशील माणूस म्हणून त्याची जडणघडण होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अन्यथा, तुम्ही तुमच्या घरात भविष्यात खून, आत्महत्या किंवा बलात्कार करणारी व्यक्ती मोठी करत आहात, याची जाणीव सर्वांनाच ठेवावी लागेल.
- डॉ. यश वेलणकर