मुंबई : (Ritu Tawde Women Entrepreneurs) महिला केवळ कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या नसून देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि विकासाला गती देणाऱ्या सक्षम भागीदार आहेत. त्यामुळे महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचा सन्मान करणे हे विकसित भारताच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे, असे प्रतिपादन महापौर रितू तावडे यांनी केले.
महिला उद्योजकता, आर्थिक स्वावलंबन आणि नेतृत्वगुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हिंदू आर्थिक मंचातर्फे मुंबई येथे 'संकल्प ते समृद्धी' या विषयावर महिला उद्योजिकांच्या भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला उद्योजिका, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, धोरणनिर्माते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून महापौर रितू तावडे उपस्थित होत्या, तर जागतिक हिंदू आर्थिक मंच आणि हिंदू आर्थिक मंचाचे सचिव रविकांत मिश्रा यांनी अध्यक्षस्थान भूषविले. प्रियम गांधी-मोदी आणि रुबल नेगी यांनी प्रमुख वक्त्या म्हणून उद्योजकता, नेतृत्व, आत्मविश्वास आणि सामाजिक उत्तरदायित्व या विषयांवर मार्गदर्शन केले.
यावेळी आयोजित परिसंवादात नवाज मोदी सिंघानिया, विनीता दलाल, प्रीती राठी गुप्ता आणि सीतू कोहली यांनी महिला उद्योजकतेतील संधी, गुंतवणूक, ओळख निर्माण करणे, आर्थिक स्वातंत्र्य आणि व्यवसाय क्षेत्रातील महिलांची वाढती भूमिका याविषयी अनुभव मांडले.(Ritu Tawde Women Entrepreneurs)
समारंभात समाजसेविका, कलाकार आणि लेखिका रुबल नेगी, अभिनेत्री, माजी मिस इंडिया तसेच सिने आणि दूरचित्रवाणी कलाकार संघटनेच्या निवडून आलेल्या प्रतिनिधी साहिला चड्ढा, 'स्टे व्हिस्टा'च्या सहसंस्थापक अंकिता शेठ, 'यूम'च्या सहसंस्थापक नैना पारेख, 'अंदुरा एक्स्पेडिशन्स प्रायव्हेट लिमिटेड'च्या सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुप्रनायी, 'हेजहॉग अँड फॉक्स'च्या सहसंस्थापक आणि फौजदारी कायद्यातील तज्ज्ञ ॲड. प्रियंका दुबे, 'ऑरम फूड'च्या संस्थापक व संचालक अनीशा आनंद तसेच 'ग्रीन गोल्ड अॅग्रो'च्या संस्थापक श्वेता बर्वे यांचा सन्मान करण्यात आला.
महापौर रितू तावडे यांनी पुरस्कारप्राप्त महिला उद्योजिकांचे अभिनंदन करताना महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, आत्मनिर्भरता आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी शासन विविध स्तरांवर प्रयत्नशील असल्याचे सांगितले. महिलांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात समान संधी मिळणे आवश्यक असून, आजच्या महिला केवळ कुटुंबापुरत्या मर्यादित नसून देशाच्या आर्थिक प्रगतीत आणि राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान देत आहेत. अशा प्रेरणादायी महिला उद्योजिकांचा गौरव केल्याने इतर महिलांनाही उद्योग-व्यवसायात पुढे येण्याची प्रेरणा मिळेल, असे त्यांनी नमूद केले.(Ritu Tawde Women Entrepreneurs)
अध्यक्षीय भाषणात रविकांत मिश्रा यांनी हिंदू आर्थिक मंचाच्या कार्याचा आढावा घेताना यशस्वी उद्योजक, गुंतवणूकदार, व्यावसायिक आणि नवउद्योजक यांना एकत्र आणून संवाद, सहकार्य आणि ज्ञानाची देवाणघेवाण घडवून आणणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले. महिलांना केवळ रोजगार शोधणाऱ्या नव्हे, तर रोजगारनिर्मिती करणाऱ्या उद्योजिका म्हणून घडविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.(Ritu Tawde Women Entrepreneurs)
ते म्हणाले, महिलांसाठी मार्गदर्शन, कायदेशीर सल्ला, मार्गदर्शकांचे सहकार्य, आर्थिक मदत आणि भावनिक पाठबळ उपलब्ध करून देणारी सक्षम व्यवस्था निर्माण करणे ही काळाची गरज आहे. अनेक सुशिक्षित आणि प्रतिभावान महिलांना सामाजिक, कौटुंबिक आणि मानसिक अडचणींमुळे व्यवसायात पुढे जाणे कठीण जाते. त्यामुळे त्यांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.(Ritu Tawde Women Entrepreneurs)
महिला उद्योजिकांच्या कार्याचा गौरव करण्याबरोबरच नव्या पिढीतील महिलांना उद्योग-व्यवसायात पुढे येण्यासाठी प्रेरणा देणे, नेतृत्वगुणांना चालना देणे आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला अधिक बळकटी देण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.(Ritu Tawde Women Entrepreneurs)