पदभार स्वीकारताच अतिरिक्त आयुक्तांचा पालिका रुग्णालयांचा अचानक दौरा; रुग्णांकडून सुविधांची घेतली माहिती

    28-Jun-2026
 
Prajakta Verma BMC Hospitals
 
मुंबई : (Prajakta Verma BMC Hospitals) महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्त झालेल्या प्राजक्ता वर्मा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पालिकेच्या रुग्णालयांचा अचानक दौरा केला. यावेळी त्यांनी रुग्णांशी थेट संवाद साधत पालिकेकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांची माहिती घेतली. तसेच रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमधील पायाभूत सुविधा अधिक आधुनिक करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
 
प्राजक्ता वर्मा म्हणाल्या की, "महापालिकेच्या आरोग्य सेवा रुग्णसेवेसाठी ओळखल्या जातात. मात्र, बदलत्या काळानुसार रुग्णालयांच्या पायाभूत सुविधांमध्येही सुधारणा करणे गरजेचे आहे."
 
अतिरिक्त आयुक्तांनी 'सी' विभागांतर्गत चंदनवाडी येथील दवाखाना, आरोग्य केंद्र, पॉलीक्लिनिक, ठाकूरद्वार येथील सूर्यकांत वगळ प्रसूतिगृह तसेच 'जी (उत्तर)' विभाग कार्यालयाला भेट देऊन आरोग्य सुविधांची पाहणी केली. त्यानंतर महापालिका मुख्यालयात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आणि आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला.
 
निरीक्षणादरम्यान त्यांनी चंदनवाडी दवाखान्यातील नोंदणी कक्ष, औषध वितरण केंद्र, मलेरिया नियंत्रण विभाग, प्रयोगशाळा, उपचार कक्ष आणि स्वच्छतागृहांची पाहणी केली. तसेच एचएमआयएस (HMIS) संगणकीकृत प्रणाली, रुग्णसंख्या, प्रमुख आजार, उपचार व्यवस्था आणि आरोग्य सेवांसमोरील आव्हानांची माहिती घेतली.
 
चंदनवाडी आरोग्य केंद्रात त्यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचा, लसीकरण मोहिमेचा आणि इतर योजनांचा आढावा घेतला. ठाकूरद्वार येथील सूर्यकांत वगळ प्रसूतिगृहात दाखल असलेल्या गर्भवती महिला आणि नवजात बालकांच्या प्रकृतीची विचारपूसही त्यांनी केली.(Prajakta Verma BMC Hospitals)
 
बैठकीदरम्यान प्राजक्ता वर्मा यांनी अधिकाऱ्यांना प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याचे तसेच प्रसूतिगृहांमध्ये आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. महिला आणि बालकांच्या आरोग्यासाठी अधिक प्रभावी सेवा विकसित करण्यावरही त्यांनी भर दिला.(Prajakta Verma BMC Hospitals)
 
तसेच, शहरातील स्मशानभूमींमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. रुग्णांना आवश्यकतेनुसार आरोग्य केंद्र, पॉलीक्लिनिक किंवा दवाखान्यातून सामान्य अथवा अतिविशेषज्ञ (सुपर स्पेशालिटी) रुग्णालयांमध्ये पाठविण्यासाठी डिजिटल, संगणकीकृत आणि जीआयएस-आधारित संदर्भ (रेफरल) प्रणाली विकसित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.(Prajakta Verma BMC Hospitals)
 
यावेळी उपायुक्त शरद उघडे, वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. शैलेश मोहिते, 'सी' विभागाच्या सहाय्यक आयुक्त अलका ससाणे, 'जी (उत्तर)' विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश देसाई यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.(Prajakta Verma BMC Hospitals)
 
 




संबंधित मजकूर