भारतातील अनेक साम्राज्यांनी देशाच्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध केले. त्यांच्या स्थापत्य-रचनांमुळे आजही त्याकाळातील सुवर्णयुगाचा साक्षीदार आपल्याला होता येते. आजही देशातील अनेक गावांमध्ये अनेक लहान-मोठी मंदिरे आढळतात. अशांपैकीच एक म्हणजे कर्नाटकच्या गोविंदनहळ्ळीतील पंचलिंगेश्वर मंदिर! या मंदिराचा विविध अंगाने आढावा घेणारा हा लेख...
कर्नाटकातील हसन जिल्हा म्हटला की, डोळ्यांसमोर सर्वप्रथम बेलूर आणि हळेबीडूची भव्य मंदिरे उभी राहतात. परंतु, या प्रसिद्ध मंदिरांच्या सावलीत अशी अनेक देवळे दडलेली असून, ती कलात्मकतेच्या दृष्टीने कुठेही कमी नाहीत. अशाच दुर्लक्षित; पण विलक्षण सुंदर मंदिरांपैकी एक म्हणजे, गोविंदनहळ्ळी गावातील पंचलिंगेश्वर मंदिर! हसनमधून म्हैसूरकडे जाताना थोड्या आडवाटेवरच हे गाव आहे. अतिशय शांत भोवताल असलेल्या गावात उभे असलेले हे मंदिर पाहताना पहिल्याच क्षणी जाणवते की, होयसळ शिल्पकारांची प्रतिभा केवळ राजधानीपुरतीच मर्यादित नव्हती; तर ती संपूर्ण राज्यभर समान उत्कटतेने फुलली होती.
१२व्या आणि १३व्या शतकात दक्षिण भारतात उदयास आलेल्या होयसळ साम्राज्याने भारतीय मंदिर स्थापत्याला एक वेगळीच दिशा दिली. साबणदगडावर (Soapstone) केलेली अत्यंत सूक्ष्म कोरीव कामे, तारकाकृती आराखडे, लयबद्ध शिल्पमालिका आणि भूमितीचा अप्रतिम वापर ही होयसळ स्थापत्याची वैशिष्ट्ये आजही जगभरातील अभ्यासकांना आकर्षित करतात. विष्णुवर्धन, नरसिंह आणि वीर बल्लाळ यांसारख्या राजांच्या काळात मंदिरनिर्मिती ही केवळ धार्मिक कृती नव्हती, तर ती साम्राज्याच्या सांस्कृतिक वैभवाचीही घोषणा होती. बेलूर, हळेबीडू आणि सोमनाथपूरप्रमाणेच, गोविंदनहळ्ळीचे पंचलिंगेश्वर मंदिरही या सुवर्णयुगातीलच एक महत्त्वाचा दुवा.
उपलब्ध शिलालेख आणि स्थापत्य वैशिष्ट्यांवरून हे मंदिर इ.स. १२३७-१२३८च्या सुमारास उभारले गेले असावे, असे मानले जाते. हा काळ होयसळ सम्राट वीर नरसिंह दुसरा याच्या राज्यकालाशी संबंधित आहे. त्याकाळी ‘चोल’ साम्राज्याचा प्रभाव कमी होत असताना होयसळ साम्राज्य दक्षिण भारतातील प्रभावी सत्ता म्हणून उदयास येत होते. अशा काळात उभारण्यात आलेल्या या मंदिरात होयसळ स्थापत्याची प्रगल्भता स्पष्टपणे दिसून येते.
या मंदिराचे सर्वांत वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्याची ‘पंचकूट’ रचना. भारतीय मंदिर स्थापत्यात एक, दोन किंवा तीन गर्भगृहांची मंदिरे मोठ्या प्रमाणावर आढळतात. परंतु, पाच स्वतंत्र गर्भगृहांची योजना अत्यंत दुर्मीळ अशीच. पंचलिंगेश्वर मंदिरात उत्तर-दक्षिण दिशेत पाच गर्भगृहे मांडलेली असून, ती सर्व पूर्वाभिमुख आहेत. प्रत्येक गर्भगृहाला स्वतंत्र अंतराळ (मंडप आणि गर्भगृह यांना जोडणारा भाग) आणि नवरंग मंडप असून, ही सर्व रचना एका लांब स्तंभयुक्त सभामंडपाने जोडली गेली आहे. या प्रकारची नियोजनबद्ध वास्तुरचना, होयसळ स्थापत्यकारांच्या कल्पकतेचीच साक्ष देणारी ठरते.
मंदिरात प्रवेश करताच, दगडावर केलेले सूक्ष्म नक्षीकाम लक्ष वेधून घेते. बेलूर किंवा हळेबीडूप्रमाणे अत्यंत दाट शिल्पसंपदा येथे नसली, तरी प्रत्येक कोरीव कामात प्रमाणबद्धता, संतुलन आणि कलात्मकता जाणवते. मंदिराच्या बाह्य भिंतींवर लहान शिखरांच्या प्रतिकृती, अलंकारिक पट्ट्या आणि पुराणकथांवरील शिल्पमालिका कोरलेल्या आहेत. ‘रामायण’, ‘महाभारत’ आणि ‘भागवत पुराणा’तील प्रसंग अत्यंत संयत शैलीत साकारलेले दिसतात. प्रत्येक शिल्प हा केवळ सजावटीचा भाग नसून धर्म, नीती आणि भारतीय सांस्कृतिक परंपरेचे ‘दगडीकथन’ आहे.
पंचलिंगेश्वर मंदिराच्या मध्यवर्ती मंडपात उभे राहिल्यावर होयसळ कलाकारांच्या अभियांत्रिकी कौशल्याची जाणीव होते. घडीव स्तंभ, त्यावरील सूक्ष्म अलंकार आणि प्रमाणबद्ध छतांमुळे संपूर्ण मंडपात एक लय निर्माण होते. प्रकाश आणि सावली यांचा खेळदेखील या दगडी रचनेला अधिकच जिवंत करतो. दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरी बदलणारा प्रकाश मंदिरातील शिल्पांना नव्याने उजाळा देतो.
या मंदिरातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे, त्याचे शिखर. मुख्य गर्भगृहावरील शिखर त्रिस्तरीय असून, त्यावर उभ्या रेषा आणि लहान उपशिखरांची मांडणी सुंदर अशीच करण्यात आली आहे. अंतराळावर उठून दिसणारी ‘सुकनासिका’ (पोपटाच्या चोचीसारखा पुढे आलेला भाग) मंदिराच्या उभ्या रचनेत संतुलन निर्माण करते. अभ्यासकांच्या मते, काही बाह्य अलंकरण अपूर्ण राहिलेले दिसते. त्यामुळे मंदिराच्या बांधकामात काही टप्पे पूर्ण झाले नसावेत, अशी शक्यताही व्यक्त केली जाते. ही अपूर्णतादेखील मंदिराच्या इतिहासाचा एक भाग झाली आहे.
मंदिराच्या प्रवेशद्वारांवर उभे असलेले द्वारपाल विशेष उल्लेखनीय आहेत. स्थानिक परंपरेनुसार, प्रसिद्ध होयसळ शिल्पकार मल्लितम्मा यांनी यांपैकी काही शिल्पे घडविल्याचे मानले जाते. मल्लितम्मा हे होयसळ काळातील सर्वांत नामवंत शिल्पकारांपैकी एक होते. त्यांच्या हातून घडलेल्या शिल्पांमध्ये शरीराची लय, अलंकारांची सूक्ष्मता आणि चेहर्यावरील भाव विशेष प्रभावी दिसतात. एखाद्या शिल्पकाराचे अशा पद्धतीने नाव उपलब्ध होणे, हादेखील दुर्मीळ योगच!
गोविंदनहळ्ळीचे पंचलिंगेश्वर मंदिर हे केवळ स्थापत्याचा अभ्यास करण्याचे ठिकाण नाही, तर होयसळ साम्राज्याच्या सांस्कृतिक दृष्टिकोनाचेही प्रतिबिंब त्यात आहे. या साम्राज्याने ‘शैव’, ‘वैष्णव’ आणि ‘जैन’ परंपरांना समान आश्रय दिला. त्यामुळे त्यांच्या मंदिरांमध्ये धार्मिक सहिष्णुता आणि कलात्मक स्वातंत्र्यांचा सुंदर मिलाफ दिसून येतो. पंचलिंगेश्वर मंदिरात शिवोपासनेचे महत्त्व असले, तरी त्यावरील शिल्पांमध्ये संपूर्ण भारतीय पुराणपरंपरेचे दर्शन घडते. ही पाच गर्भगृहे म्हणजे, शिवाची ‘सदाशिव’ रूपात साधना करण्यासाठी तर केली नव्हती ना, असा प्रश्नदेखील अभ्यासकांना पडू शकतो.
आज हे मंदिर बेलूर किंवा हळेबीडूइतके प्रसिद्ध नाही, पर्यटकांची गर्दीही येथे क्वचितच दिसते. त्यामुळे या परिसरात अजूनही एक वेगळीच शांतता अनुभवण्यास मिळते. मंदिराच्या सभोवतालची हिरवाई, दूरवर दिसणारी शिवारे आणि त्यामध्ये उभे असलेले हे दगडी सौंदर्य पाहताना काळ जणू थांबल्याचा भास होतो. पंचलिंगेश्वर मंदिर हे आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवते की, भारतीय स्थापत्याचा इतिहास केवळ प्रसिद्ध स्मारकांपुरता मर्यादित नाही. अनेक लहान गावांमध्ये विस्मृतीच्या उंबरठ्यावर उभी असलेली अशी असंख्य मंदिरे, आपल्या सांस्कृतिक समृद्धीची साक्ष आजही देत आहेत. त्यांच्याकडे पाहण्यासाठी केवळ डोळेच पुरेसे नसून; त्यामागील इतिहास, शिल्पकारांची कल्पकता आणि त्याकाळातील समाजजीवन समजून घेण्याची संवेदनशीलताही आवश्यक आहे.
गोविंदनहळ्ळीच्या या शांत मंदिरासमोर उभे राहिल्यावर आपल्याला जाणवते की, होयसळ शिल्पकारांनी दगडात केवळ देवालयच घडवले नाही; तर त्यांनी भूमिती, संगीत, भक्ती आणि सौंदर्य यांचा सुरेख संगमही साधला आहे. काळाच्या ओघात साम्राज्ये लयाला गेली, राजे, संस्थानिकही इतिहासात विलीन झाले; पण या दगडी मंदिरातून आजही होयसळ साम्राज्याची सांस्कृतिक प्रतिभा व्यक्त होत राहते. ही वास्तू म्हणजे, एका विस्मृतीत गेलेल्या सुवर्णयुगाची अत्यंत प्रभावी साक्ष आहे.
इंद्रनील बंकापुरे
७८४१९३४७७४