मुंबई : (Mumbai Metro Ganja Seized) मुंबई मेट्रो वनच्या विमानतळ मेट्रो स्थानकावर एका महिला सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे संशयित अंमली पदार्थांची वाहतूक उघडकीस आली. नियमित सुरक्षा तपासणीदरम्यान प्रवाशाच्या बॅगेतून सुमारे ३३८ ग्रॅम वजनाचे संशयित गांजाचे नऊ पुडे जप्त करण्यात आले असून आरोपीला अटक करून पुढील कारवाईसाठी अंधेरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही घटना घाटकोपरकडे जाणाऱ्या प्रवेशद्वारावरील सुरक्षा तपासणीदरम्यान घडली. बॅगेज स्कॅनिंग करत असताना महिला सुरक्षा रक्षक कांचन पांडे यांनी एका प्रवाशाच्या बॅगेतील संशयास्पद वस्तू ओळखली. त्यानंतर करण्यात आलेल्या सखोल तपासणीत बॅगेतून गांजाचे नऊ पुडे आढळून आले.(Mumbai Metro Ganja Seized)
सुरक्षा कर्मचाऱ्यांनी संबंधित प्रवाशाला विचारणा करताच त्याने स्थानकातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, कांचन पांडे यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ ड्युटीवरील सुरक्षा कर्मचाऱ्यांना सतर्क केले. सुरक्षा अधिकारी ए. कांबळे, एएसजी अविनाश (एमएसएफ), पर्यवेक्षक वसीम तडवी आणि इतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने पाठलाग करून आरोपीला पकडले. त्यानंतर आरोपी आणि जप्त करण्यात आलेला संशयित अंमली पदार्थ अंधेरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.(Mumbai Metro Ganja Seized)
मुंबई मेट्रो वनने या घटनेनंतर सांगितले की, प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येते. सर्व स्थानकांवर अत्याधुनिक बॅगेज स्कॅनिंग यंत्रणा आणि प्रशिक्षित सुरक्षा कर्मचारी तैनात असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यात आली आहे.(Mumbai Metro Ganja Seized)
या घटनेबाबत मुंबई मेट्रो वनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्यामंतक चौधरी यांनी महिला सुरक्षा रक्षक कांचन पांडे आणि संपूर्ण सुरक्षा पथकाचे कौतुक केले. "प्रवाशांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च जबाबदारी आहे. संशयित अंमली पदार्थ ओळखून आरोपीला पकडण्यात सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दाखविलेली सतर्कता, धाडस आणि व्यावसायिकता ही कौतुकास्पद असून सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवास सेवा देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे ते प्रतीक आहे," असे त्यांनी सांगितले.(Mumbai Metro Ganja Seized)