मुंबई : (Maharashtra TET Paper Leak) शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपरफुटीप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे सह पोलिस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) गठित करण्याचे निर्देश दिले आहेत. दीड कोटी रुपयांना पेपर विक्री करण्याचा आरोपींचा डाव असून राज्यभरातील ६ लाख १२५ उमेदवारांना या पेपरफुटीचा धक्का बसला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवार, दि. २८ जून रोजी घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ शनिवारी रद्द करण्यात आली. टीईटीचा परीक्षा परिषदेने आता ही परीक्षा पुढे ढकलली आहे. दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्याशी चर्चा केली. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.(Maharashtra TET Paper Leak)
ठाणे जिल्ह्यातील भिवंडीच्या पोलीस उपायुक्तांना २७ जून रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एका ठिकाणी छापा टाकला होता. यावेळी रविवारी होणाऱ्या परीक्षेच्या मूळ प्रश्नपत्रिकेच्या अनेक प्रती जप्त करण्यात आल्या. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता हा पेपर २८ जूनला होणाऱ्या परीक्षेचाच अधिकृत पेपर असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपींना ६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी
या प्रकरणी पोलिसांनी बिहार आणि हरियाणातील तीन संशयितांना अटक केली असून रविवारी त्यांना भिवंडी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने आरोपींना ६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. राजीव शाह, आकाश कुमार आणि धीरज कुमार अशी आरोपींची नावे असून हे तिघेही दिल्लीहून महाराष्ट्रात आले होते. दीड कोटी रुपयांना पेपर विक्री करण्याचा त्यांचा डाव होता. या रॅकेटचे धागेदोरे अनेक राज्यांमध्ये पसरले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.(Maharashtra TET Paper Leak)
विद्यार्थ्यांना नव्याने नोंदणीची आवश्यकता नाही - मंत्री दादाजी भुसे
विद्यार्थ्यांचे हित आणि परीक्षेची पारदर्शकता जपण्यासाठी २८ जून रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच त्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना नव्याने नोंदणी किंवा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असेही ते म्हणाले.(Maharashtra TET Paper Leak)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....