देशाने अलीकडेच दि. १८ जून २०२६ रोजी ‘हल्दीघाटी’ विजयाची ४५०वी वर्षपूर्ती आणि वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची ४८६वी जयंती साजरी केली. महाराणा प्रतापांचे योगदान आणि त्यांचे शौर्य हे आजच्या पिढीलाही आदर्शवतच आहे. या निमित्ताने त्यांच्या युद्धकलेचा घेतलेला आढावा...
इतिहास हा अनेकदा सत्तेच्या जवळ राहणार्यांनी, त्यांच्या दृष्टिकोनातून मांडला. त्यामुळे अनेकदा राष्ट्रीय नायकांच्या योगदानाला, अपेक्षित स्थान मिळाल्याचे दिसत नाही. हल्दीघाटीच्या युद्धासंदर्भातही तथ्यांचे पुनर्मूल्यांकन आवश्यक आहे. आज देशभर महाराणा प्रताप यांची जयंती श्रद्धा आणि सन्मानाने साजरी केली जाते आहे. भारत हे राष्ट्र त्याच्या खर्या नायकांना कधीच विसरत नाही, याचेच मोठे प्रमाण आहे,” असे प्रतिपादन, अलीकडेच दि. १८ जून रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. या दिवशी देशाने ‘हल्दीघाटी’ विजयाची ४५०वी वर्षपूर्ती आणि वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची ४८६वी जयंती साजरी केली.
महाराणा प्रताप यांची युद्धनीती
महाराणा प्रताप हे अत्यंत कुशल लष्करी रणनीतिकार होते. त्यांनी मुघलांसारख्या शत्रूंना पराभूत करण्यासाठी, कायमच विविध डावपेचांचा वापर केला. त्यातील काही महत्त्वाचे डावपेच पुढीलप्रमाणे आहेत : महाराणा प्रताप ‘गुरिल्ला’ युद्धाचे तज्ज्ञ होते. ‘हिट-अॅण्ड-रन’ हल्ल्यांनी त्यांनी मुघल सैन्याला थकवले. आक्रमण करताना ते मुघलांच्या पुरवठा मार्गांवरच हल्ले करत, किल्ल्यांवर छापे घालून ते लगेच डोंगरात अदृश्य होत. यामुळे मुघलांना त्यांचा माग काढणे कठीण जात असे. महाराणा प्रताप हे कायमच युद्ध करण्यासाठी, डोंगराळ व जंगलांच्या प्रदेशाची निवड करत. त्यामुळे अशा ठिकाणी लढताना मुघलांना त्यांच्याकडील लष्करी सामार्थ्याचा वापर करताच येत नसे.
शिवाय, महाराणा प्रतापांचे सैन्य अत्यंत चपळ असल्याने, एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी झपाट्याने हालचाल करून शत्रूला गोंधळात टाकणेही त्यांना लिलया जमत असे. महाराणा प्रतापांचे नेतृत्त्व प्रेरणादायी होते. त्यांच्या सैनिकांची त्यांच्याप्रतिची निष्ठा व आत्मविश्वास हेच त्यांच्या यशाचे मोठे कारण. युद्धादरम्यान महाराणा प्रतापांनी अनेकदा मुघलांच्या ताफ्यांवर व किल्ल्यांवर छापे घालून, त्यांचा पुरवठा खंडित करण्याचा मार्ग स्वीकारलेला दिसतो. यामुळेही मुघल सैन्याला प्रत्यक्ष रणांगणावर टिकणे कठीणच झाले. महाराणा प्रतापांकडील गुप्तहेरांच्या जाळ्यामुळे, त्यांना मुघलांच्या हालचालींची माहिती मिळत असे. याचा उपयोग त्यांना अचूक युद्धयोजना आखण्यात होई. महाराणा प्रताप स्वतः धाडसी योद्धा होते. तसेच ते, घोडेस्वारी व धनुर्विद्येतही निपुण होते. त्यांच्या धैर्यामुळेच सैनिकही प्रेरित होत.
महाराणा प्रतापांच्या सैन्यात कवचधारी व काटेरी शस्त्रांनी सज्ज असलेले हत्तीही होते. हे हत्ती मुघल घोडदळावर धडक देऊन गोंधळ निर्माण करत. महाराणा प्रताप गाफिल शत्रूवर अचानक हल्ले करुन, त्यांचा आत्मविश्वास खच्ची करत.
हल्दीघाटीचे युद्ध
हल्दीघाटीच्या युद्धात महाराणा प्रतापांनी या सर्वच डावपेचांचा वापर केल्याचे दिसते. त्यांनी अरुंद दरडीचा वापर युद्धभूमी म्हणून केला. त्यामुळे, त्यांचा सामना करण्यासाठी मुघलांची लष्करी शक्ती कमी पडली.महाराणा प्रतापांच्या घोडदळाने सतत हल्ले करून, मुघल रांगा विस्कळीत केल्या. हत्तींच्या धडायामुळे, मुघल सैन्यात गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे मोठे नुकसान झाल्याने, मुघलांना माघार घेण्यास भाग पाडले.
महाराणा प्रताप यांनी अकबराविरुद्ध वापरलेली ‘गुरिल्ला’ युद्धनीती.
महाराणा प्रताप हे कुशल लष्करी रणनीतिकार होते. खालील महत्त्वाच्या युद्धनीतीचा त्यांनी अवलंब केला :
१. ‘गुरिल्ला’ युद्धनीती : थेट युद्ध टाळून ‘हिट-अॅण्ड-रन’ हल्ले, घातपात आणि अचानक छापे घालणे. मुघल सैन्य मोठे व जड शस्त्रांनी सज्ज असल्यामुळे, त्यांना मेवाडच्या डोंगराळ प्रदेशात अडचणी येत. या पद्धतीने महाराणा प्रताप यांनी आपले सैन्य सुरक्षित ठेवत, शत्रूला सतत त्रास दिला.
२. संरक्षणात्मक युद्धनीती : शत्रूची ताकद जास्त असताना, नैसर्गिक अडथळ्यांचा (डोंगर, जंगल, नद्या) वापर करून त्यांनी संरक्षण मिळवले. किल्ले, बुरुज, खंदक बांधून, दीर्घकाळ त्यांनी मुघलांना रोखून धरले.हे किल्लेच मेवाडच्या स्वातंत्र्याचे प्रतीक ठरले.
३. गती आणि वेग : महाराणा प्रतापांचे सैन्य चपळ होते. घोडदळाच्या वेगवान हल्ल्यांनी शत्रूला वेढणे व गोंधळात टाकणे, अचानक हल्ला करून लगेच मागे हटणे, अशा युद्ध पद्धती त्यामुळेच त्यांना अवलंबता आल्या.
४. धनुर्धारींचा वापर : महाराणा प्रतापांच्या सैन्यातील कुशल धनुर्धारी, शत्रूवर दूरवरूनच बाणांचा वर्षाव करत. शत्रूच्या नेत्यांना लक्ष्य करून नेतृत्व कमकुवत करणे, यासाठी या रणनीतीचा वापर होत असे.
५. गुप्तहेर व माहिती संकलन : गुप्तहेर व माहितीदारांच्या जाळ्यामुळे, शत्रूच्या हालचालींची अचूक माहिती मिळे. यामुळे महाराणा प्रतापांना शत्रूकडून होणारे हल्ले टाळता येत व योग्यवेळी प्रत्युत्तरही देता येई.
६. लवचीक व विखुरलेले सैन्य : महाराणा प्रतापांनी त्यांच्या सैन्याचे छोटे-छोटे गट करून, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले करण्याचे आदेश दिले होते. यामुळे शत्रूचे सैन्य सतत अस्थिर राहात असे.
७. मानसिक डावपेच : रणशिंगे, नगारे व ढोल वाजवून, शत्रूला भयभीत करण्याचा मार्गही त्यांनी अवलंबला. तसेच, स्वतःच्या शौर्यामुळेही सैनिकांचा आत्मविश्वास वाढवल्याचे दिसते.
८. छद्मावरण : महारांणांचे सैन्य स्थानिक वेशात, झाडांच्या फांद्या व पानांचा वापर करून लपून बसत. आणि वेळ साधून केलेल्या अचानक हल्ल्याने शत्रूला गोंधळात टाकत.
९. विविध शस्त्रांचा वापर : तलवारी, भाले, धनुष्य-बाण, अग्निशस्त्रे यांचा वापरही महाराणांच्या सैन्याने केला. त्यांनी याचे प्रशिक्षण देऊन, सैनिकांना अनेक शस्त्रांमध्ये प्रवीण बनवले.
१०. विकेंद्रित नेतृत्व : प्रत्येक गटाला स्वतंत्र स्थानिक सेनापती, महाराणा प्रतापांनी नेमला होता. त्यामुळे, परिस्थितीनुसार त्वरित निर्णय घेता येणे शक्य झाल्याने, सैन्य अधिक प्रभावी झाले.
११. घातपात : डोंगर-दर्यांत लपून शत्रूवर वेगवान आणि अचानक हल्ला करण्याचे तंत्रही महाराणा प्रतापांनी अवलंबले. मुघल सैन्य जड असल्यामुळे, या डावपेचात ते कायमच अडकत असल्याचे आपल्याला दिसूने येते.
१२. रणनीतिक माघार : परिस्थिती प्रतिकूल असताना, सैन्याला सुरक्षित ठेवण्यासाठी माघार घेण्याचे तंत्रही त्यांनी वापरल्याचे दिसते. मात्र, त्यानंतर शत्रूला सापळ्यात ओढून अरुंद जागेत हल्लादेखील केल्याची उदाहरणे आपल्याला बघायला मिळतात.
१३. रात्र हल्ले : अंधाराचा फायदा घेऊन, त्यांनी रात्री हल्ले करण्यास प्राधान्य दिले. काळ्या वस्त्रांमुळे, शत्रूला यांची हालचाल ओळखता येत नसे. मुघल सैन्य रात्रीच्या युद्धात अनभिज्ञ असल्याचाही त्यांनी मोठाच फायदा करुन घेतला.
१४. घोडदळाचा वापर : महाराणा प्रताप यांचे घोडदळ अत्यंत बलवान व चपळ होते. शत्रूला वेढणे, मागील बाजूस अचानक हल्ला करणे, पळवाट बंद करणे, यासाठी घोडदळाचा उपयोग केला जात असे. या हल्ल्यांमुळे शत्रूच्या रांगा विस्कळीत होत व गोंधळ निर्माण होत असे.
१५. आगीचा वापर : मुघल सैन्याच्या हत्तींच्या विरोधात आगीचा वापर होई. हत्ती घाबरून पळू लागल्याने, शत्रूच्या छावणीत गोंधळ माजत असे. तसेच, शत्रूचे तळ व किल्ले जाळूनही गोंधळ निर्माण केला जात असे.
१६. काटे व सापळे : रणांगणावर खड्डे खोदून त्यात काटे व काटेरी झुडपे ठेवली जात. यामध्ये शत्रू सैनिक अडकून जखमी होत. अडथळे व सापळ्यांमुळे शत्रूची हालचाल मंदावली जाई.
१७. धर्माचा उपयोग : महाराणा प्रताप हे कट्टर हिंदू होते. युद्धापूर्वी धार्मिक विधी करून सैनिकांचा आत्मविश्वास वाढवत असत. धार्मिक प्रतीकांचा वापर करूनही, त्यांनी सैनिकांमध्ये एकात्मता निर्माण केली होती.
१८. मुत्सद्देगिरी : काहीवेळा संघर्ष टाळण्यासाठी किंवा सोडवण्यासाठी, मुत्सद्देगिरीचा वापर महाराणा प्रतापांनी केला आहे. इतर राजपूत राजांशी मैत्री करून, त्यांनी त्यांची ताकद वाढवली.
१९. सैनिकांशी स्नेह व निष्ठा : महाराणा प्रताप स्वतः सैनिकांसोबत रणांगणत उतरुन लढत असत.तसेच, शौर्य व निष्ठेला बक्षिसे देऊनही सैनिकांमध्ये आपुलकीची भावना त्यांनी निर्माण केली. त्यामुळे सैनिक त्यांच्यासाठी प्राण देण्यासही तयार होते.
२०. कविता व गीते : महाराणा प्रताप कला व साहित्याचेही आश्रयदाते होते. त्यांनी कवी व भाटांना प्रेरणादायी गीते व कविता रचायण्याचेही आदेश दिले होते. या गीतांनी सैनिक व जनतेमध्ये प्रेरणा निर्माण केली.
२१. नाकेबंदी व वेढ्याची युद्धनीती : शत्रूच्या पुरवठा मार्गांची नाकेबंदी करून, त्यांना उपाशी ठेवण्याचे तंत्रही महाराणा प्रतापांनी अवलंबले. प्रसंगी किल्ले व शहरांना वेढा घालून, शत्रूला शरणागती पत्करायला भाग पाडले.
सारांश
महाराणा प्रताप यांना ‘हिंदुआ सूरज’ हे बिरुद मिळालेले आहे. त्यांनी आयुष्यभर धर्म, संस्कृती, स्वाभिमान आणि राष्ट्रहितासाठी संघर्ष केला. त्यांचे जीवन लोककल्याण, आदर्श शासन आणि राष्ट्रीय अस्मितेच्या संरक्षणाचे उत्तम उदाहरण उदाहरण आहे. त्यांनी निर्माण केलेला आदर्श, आजही राष्ट्रजीवनाला प्रेरणा देत आहे. भारताचा इतिहास हा परकीय आक्रमकांविरुद्ध अखंड चाललेल्या संघर्ष, प्रतिकार आणि आत्मगौरवाचा आहे. ‘हल्दीघाटी’चे युद्ध हा राष्ट्रचेतना आणि स्वाभिमानाच्या रक्षणासाठी, संपूर्ण समाजाचा महासंग्राम होता. ‘हल्दीघाटी’चे युद्ध हे त्यांच्या लष्करी कौशल्याचे उत्तम उदाहरण मानले जाते. त्यांच्या विजयाने राजपूत व भारतीय योद्ध्यांना प्रेरणा दिली. महाराणा प्रताप यांनी त्यांच्या युद्धनीतीत उपलब्ध संसाधनांचा व सैन्याच्या संपूर्ण ताकदीचा उपयोग केला. महाराणा प्रताप भारतीय इतिहासातील महान योद्ध्यांपैकी एक मानले जातात. त्यांचा वारसा आजही प्रेरणादायी आहे.