मुंबई : (Karmala ITI Madandas Devi) करमाळा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (आयटीआय) नामकरण आता ज्येष्ठ प्रचारक तथा माजी सह सरकरार्यवाह कै. मदनदास देवी यांच्या नावाने करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक निर्णयानिमित्त मंगळवार, दि. ३० जून २०२६ रोजी संस्थेच्या परिसरात विशेष नामकरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा हे कै. मदनदास देवी यांचे जन्मगाव. सामाजिक आणि राष्ट्रीय क्षेत्रातील त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे मानले जाते. त्यांनी एम.कॉम., एलएल.बी. तसेच चार्टर्ड अकाउंटंट (सीए) अशी उच्च शिक्षणाची पदवी प्राप्त केली होती. मात्र, उज्ज्वल व्यावसायिक कारकीर्दीचा मार्ग स्वीकारण्याऐवजी त्यांनी १९६९ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णकालीन प्रचारक म्हणून स्वतःला राष्ट्रकार्यासाठी समर्पित केले. (Karmala ITI Madandas Devi)
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) संघटनात्मक उभारणी, वैचारिक बळकटी आणि देशव्यापी विस्तारात त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण राहिले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय सह सरकार्यवाह या महत्त्वपूर्ण पदाची जबाबदारी दीर्घकाळ यशस्वीपणे सांभाळली. (Karmala ITI Madandas Devi)
राष्ट्रकार्यासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या या थोर व्यक्तिमत्त्वाच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या जन्मभूमीशी असलेल्या नात्याचा सन्मान म्हणून करमाळा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला त्यांचे नाव देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे करमाळा परिसरासह राज्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि स्वयंसेवी क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, ३० जून रोजी होणाऱ्या नामकरण समारंभाला स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. (Karmala ITI Madandas Devi)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक