इराणपुरस्कृत ‘हमास’, ‘हिजबुल्ला’ यांसारख्या दहशतवादी संघटना, या केवळ इस्रायलपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. ‘हिजबुल्ला’च्या काही दहशतवाद्यांची उपस्थिती पाकव्याप्त काश्मीरमध्येही नोंदली गेली आहे. या संघटनांवर हल्ले करून त्यांची शक्ती खच्ची करताना इस्रायल केवळ स्वत:चीच सुरक्षा जपत नसून, संपूर्ण जगाचीही सुरक्षा निश्चित करीत आहे. त्यामुळे इराणशी शांतता सौदा करण्यापेक्षा, इस्रायलची सुरक्षा निश्चित करणे अधिक महत्त्वाचे आहे.
अमेरिकेला कोणत्याच गोष्टीत फारकाळ गुंतून राहावेसे वाटत नाही. त्यांना सतत काहीतरी नवीन उपक्रम किंवा नवीन गोष्ट हवी असते. तसेच कोणतीही समस्या झटपट निकालात काढण्यावरही त्यांचा भर असतो. म्हणूनच, तेथील न्यायव्यवस्थेत ‘प्ली बार्गेनिंग’ची सुविधा आहे. एखादा गुन्हा सिद्ध करून, त्यानंतर संबंधित गुन्हेगाराला शिक्षा ठोठावण्यात बराच वेळ जातो. त्यापेक्षा आरोपीने गुन्हा मान्य करावा आणि त्याबदल्यात त्याला कायद्यानुसार होणार्या शिक्षेच्या कालावधीपेक्षा कमी कालावधीची शिक्षा मिळते, अशीही सोय आहे. परिणामी, खटला झटपट निकाली निघतो. यालाच ‘प्ली बार्गेनिंग’ म्हणतात. इराणशी युद्ध छेडतानाही, या झटपट तोडग्यावर अमेरिकेचा विश्वास होता. पण, हा अतिआत्मविश्वासच अंगाशी आला.
इराणशी युद्ध सुरू करताना, या तिसर्या जगातील मागास देशाला आपण केवळ १५ दिवस ते एक महिन्यात गुंडाळून टाकू, अशा मुजोर समजुतीतच अमेरिकेने हे युद्ध छेडले. पण, इराण हा ना मागास देश आहे, ना भेकड, ना कमजोर. आता जवळपास साडेतीन महिन्यांनंतरही, या युद्धाचा अंत नजरेत दिसत नाही. त्यामुळे इराणशी कोणत्याही अटींवर शांतता सौदा करून आपण जिंकलो, हे दाखविण्याची अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धडपड सुरू आहे. अमेरिकेतील जनमत वेगाने युद्धविरोधी होत असल्याने, ट्रम्प यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली आहे. नोव्हेंबरमध्ये होणार्या काँग्रेसच्या (अमेरिकी संसदेच्या) दोन्ही सभागृहांच्या निवडणुकीत, ट्रम्प यांच्या रिपब्लिक पक्षाला त्याचा जोरदार फटका बसण्याची चिन्हे आहेत. म्हणूनच, ट्रम्प घायकुतीला आले आहेत.
पण, या सगळ्या चर्चेत मुख्य मुद्द्याचे विस्मरणच झाल्यासारखे दिसते. इराणला अणुबॉम्ब बनविण्यापासून रोखणे आणि इस्रायलची सुरक्षितता जपणे, हा या युद्धाचा उद्देश होता. कारण, असा बॉम्ब इराणच्या हाती लागला, तर तो त्याचा वापर इस्रायलवर करील, हीच प्रमुख भीती अमेरिकेला भेडसावत होती. पण, हे दोन्ही हेतू आजघडीला साध्य झाल्याचे दिसत नाहीत. इराणकडे जरी आज अणुबॉम्ब नसला, तरी तो बनविण्यासाठी लागणारी सारी सामग्री व तंत्रज्ञान त्याच्याकडे आहे. शिवाय, असा बॉम्ब बनविणारे कुशल तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञही आहेत. शिवाय, इराणकडे समृद्ध युरेनियमचा साठाही भरपूर प्रमाणात आहे. तो डोंगरातील भुयारांमध्ये दबला गेला आहे की, कुठे अन्य सुरक्षित स्थळी साठवून ठेवला आहे, याबद्दल अद्यापही संभ्रम आहे. आपण युरेनियम समृद्ध करण्याचे काम सोडणार नाही, हेही इराणने ठामपणे स्पष्ट केले आहे. परिणामी, युद्धापूर्वी जी स्थिती होती, जवळपास तशीच स्थिती आजही कायम आहे. मग या युद्धाने काय साध्य केले?
आताही इराणशी सुरू असलेल्या शांतता चर्चेत, इस्रायला स्थानच नाही. म्हणजे जो देश या युद्धाचे मूळ कारण होता, त्याला या वाटाघाटींमध्येही कसलेही स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे इस्रायलनेही अमेरिकेच्या इशार्याकडे दुर्लक्ष करत, ‘हिजबुल्ला’वर हल्ले सुरूच ठेवले आहेत. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे इराणनेही वाटाघाटी थांबवल्या आहेत. परिणामी, अमेरिका म्हणजे अध्यक्ष ट्रम्प अधिक अस्वस्थ झाले असून, त्यांची चिडचिड वाढली आहे. इस्रायलच्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांचे राजकीय ईप्सित साध्य होताना दिसत नाही. मुळातच, ट्रम्प यांची प्राथमिकताच चुकलेली आहे.
अमेरिकेशी होत असलेला शांतता सौदा अजून अधांतरीच आहे. कारण, इस्रायलकडून लेबेनॉनवर हल्ले सुरू आहेत. जोपर्यंत हे हल्ले थांबत नाहीत, तोपर्यंत कोणताही शांतता सौदा आपण करणार नाही, हे इराणने अधीच स्पष्ट केले आहे. लेबेनॉनमध्ये इराणपुरस्कृत ‘हिजबुल्ला’ या दहशतवादी संघटनेचे मजबूत जाळे आहे, जसे ‘हमास’चे गाझा पट्टीत होते. गाझा पट्टीच्या विध्वंसाबरोबरच ‘हमास’ही जवळपास नष्ट झाली. पण, ‘हिजबुल्ला’ अजूनही शक्तिशाली आहे. इराणची खरी शक्ती ‘हमास’, ‘हिजबुल्ला’, ‘हुती’ यांसारख्या दहशतवादी संघटनाच आहेत (याबाबत त्याचे पाकिस्तानशी बरेच साम्य आहे). ‘हमास’ नष्ट झाल्यामुळे, आता उर्वरित संघटना शक्तिशाली ठेवण्यासाठी इराण प्रयत्न करणार, हे उघड आहे. पण, ‘हिजबुल्ला’ नष्ट होत नाही, तोपर्यंत इस्रायललाही सुरक्षित वाटणार नाही. त्याच्या अस्तित्वाचाच प्रश्न असल्याने, तो ‘हिजबुल्ला’वर हल्ले करतच राहणार मग, अमेरिका काहीही म्हणो. परिणामी, हे युद्ध असेच सुरू राहील.
सध्या इराणबरोबर शांतता वाटाघाटी सुरू असल्याचे दिसत असले, तरी ज्यासाठी मुळात हे युद्ध खेळले गेले, त्या इस्रायलची सुरक्षा निश्चित केली गेली आहे का? त्याचे उत्तर नकारार्थीच येते. इस्रायल या दहशतवादी संघटनांवर करीत असलेल्या हल्ल्यांमुळे, केवळ त्या देशाची सुरक्षा होते आहे असे नव्हे; तर जागतिक परिस्थितीही सुरक्षित होत आहे. या संघटना आता केवळ इस्रायलपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. ‘हिजबुल्ला’चे दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमध्येही सापडले आहेत. ‘हुती’ या संघटनेने, आता तांबड्या समुद्रातील खाडीलाही ओलीस धरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचा परिणामही जागतिक मालवाहतुकीवर होत आहे. इस्रायलची आक्रमक आणि बेधडक कारवाई करण्याची धडाडी नसेल, तर जग सुरक्षित राहणार नाही. इस्रायलकडून क्वचित अतिरेक होत असल्याचे मान्य केले, तरी ‘हिजबुल्ला’ किंवा ‘आयसिस’ यांसारख्या दहशतवादी संघटनांपासून जगाला सुरक्षित राखायचे असेल, तर इस्रायलला आधी सुरक्षित ठेवले पाहिजे. इस्रायल या संघटनांविरोधात जे युद्ध लढतो आहे, त्याबद्दल जगाने त्याचे आभारच मानले पाहिजेत. कारण, दुसर्या कोणत्याच देशात अशा दहशतवादी संघटनांविरोधात लढण्याची कुवत आणि इच्छाशक्ती नाही. अशा संघटनांशी चर्चा करायची नसते, तर त्यांच्या दहशतवाद्यांना थेट गोळीच घालायची असते. तेच इस्रायल करीत आहे. त्यामुळे इराणशी शांतता सौदा झाला नाही तरी चालेल; पण या दहशतवादी संघटनांचे कंबरडे मोडलेच पाहिजे. तसे झाल्यास इराण आपोआपच शरण येईल.
राहुल बोरगांवकर