माझे पंख कोण छाटणार? मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंना टोला; मी मनुष्य असल्याने मला पंखच नाहीत

    28-Jun-2026
Devendra Fadnavis Uddhav Thackeray
 
मुंबई : (Devendra Fadnavis Uddhav Thackeray) मी मनुष्य असल्यामुळे मला पंखच नाही. त्यामुळे माझे पंख कोण छाटणार आहेत? माझ्यासोबत महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेचा आणि माझ्या वरीष्ठांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे काहीही काळजी करू नका, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
 
विमान प्रवासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हतबल दिसत होते. त्यांचे पंख छाटले जात आहेत, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला होता. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "विमानात उद्धव ठाकरे एका कोपऱ्यात बसले होते, मी दुसऱ्या कोपऱ्यात होतो. मी विमानात बसलो की, माझ्या मोबाईलमध्ये एखादा सिनेमा, वेबसिरीज असे काहीतरी डाऊनलोड केलेले असते ते बघण्याची माझी सवय आहे.(Devendra Fadnavis Uddhav Thackeray)
 
विमान सुरु झाल्यापासून उतरत पर्यंत मी तेच पाहत होतो. त्यामुळे माझी हतबलता नेमकी त्यांना कुठे दिसली? पण समजा आम्ही आजूबाजूला बसलो असतो तर गप्पा मारल्या असत्या. उद्धव ठाकरे यांच्या सदिच्छा मी स्विकारतो. २०१९ ला असत्या तर चित्र वेगळे राहिले असते. पण त्यावेळी ते देऊ शकले नाहीत. त्यामुळे त्या सदिच्छा आज मी स्विकारतो," असा टोला त्यांनी लगावला.
 
एकत्रित विमान प्रवासावर बोलताना ते पुढे म्हणाले की, "माझ्याकरिता हे राजकीय प्रश्न गौण आहेत. या प्रश्नांनी कुणाचेही भले होणार नाही. लोकांचे भले विकासाने होणार आहे. त्यामुळे माझे सगळे लक्ष विकासावर आहे. ज्यात कुणीही बसू शकतो अशा सर्विस फ्लाईटमध्ये योगायोगाने उद्धव ठाकरे आणि मी एकत्र आल्यानंतर त्याच्या इतक्या चर्चा झाल्या की, त्या बघून कधीकधी आपण राजकीय व्यवस्थेत आहोत की, वेड्यांच्या बाजारात असा प्रश्न पडतो."(Devendra Fadnavis Uddhav Thackeray)
 
 




संबंधित मजकूर