चवदार तळ्याचा सत्याग्रह हा सामाजिक न्यायासाठीचा आग्रह होता : केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू

    28-Jun-2026   
 
Kiren Rijiju Mahad Chavdar Tale Satyagraha
 
महाड : (Kiren Rijiju Mahad Chavdar Tale Satyagraha) "महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह हा केवळ पाण्याचा अधिकार मिळविण्याचा संघर्ष नव्हता, तर सामाजिक न्यायासाठी केलेला ऐतिहासिक आग्रह होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून देशाला सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समानतेचा मार्ग दिला. आजही त्याच विचारांच्या प्रेरणेने केंद्र सरकार सर्वसमावेशक विकासासाठी कार्यरत आहे," असे प्रतिपादन केंद्रीय संसदीय कामकाज व अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी केले.
 
महाड येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिनानिमित्त विवेक विचार मंच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे आणि सहयोगी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद २०२६ व छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
 
कार्यक्रमापूर्वी मान्यवरांनी चवदार तळ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. महाडमध्ये प्रथमच येण्याची संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त करत रिजिजू म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव संपूर्ण भारतावर आहे. संविधानामुळे सामाजिक न्याय आणि समानतेची दिशा देशाला मिळाली. भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपासून प्रेरणा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार सामाजिक, आर्थिक आणि सर्वसमावेशक विकासासाठी काम करत आहे. समाजात विषमता निर्माण करणाऱ्या आणि बाबासाहेबांच्या नावाने दिशाभूल करणाऱ्या कथनांपासून सावध राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
 
 
 
महाड चवदार तळे आणि डॉ. आंबेडकरांच्या कार्याशी निगडित स्थळांच्या संवर्धनासाठी केंद्र व राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक न्यायाचे खरे शिल्पकार आहेत. त्यांना एका समाजापुरते मर्यादित करण्याचा प्रयत्न अयोग्य आहे. महाड चवदार तळ्याच्या विकासासाठी राज्य शासनाने ५६ कोटी रुपयांहून अधिक निधी दिला असून आणखी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. चवदार तळ्याचा विकास आदर्श स्वरूपात पूर्ण करून त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा प्रयत्न राहील. बोधगया येथे बौद्ध समाजासाठी स्वतंत्र जागेच्या मागणीबाबतही शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.
 
पद्मश्री दादा इदाते यांनी सामाजिक न्यायाचा प्रश्न सर्व समाजाचा असल्याचे सांगत महापुरुषांचे विचार व्यापकपणे स्वीकारण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्व समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत, असे सांगत संवाद आणि समतेच्या मूल्यांची गरज अधोरेखित केली.
 
यावेळी अॅड. विजय लक्ष्मण गव्हाळे, मिलिंद मधुकर जाधव, जागेश मोहन कंडारे, प्रा. डॉ. राजेश नारायणराव रगडे, नागसेन शामराव पुंडगे, डॉ. अनुप्रिता जाईबाई मोरे, प्रभाकर मनोहर शिंदे, शाम वसंत माळवंदे, स्मिता सुशांत कवडे, विजय अंबुजी जाधव आणि महादेव कृष्णाजी गोठणकर यांना छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमास प्रा. डॉ. राजनिश कामत, आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे, अॅड. संजय सहदेव भिसे, रा. स्व. संघाचे रमेश पांडव , आमदार प्रशांत ठाकूर, आमदार सुनील कांबळे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित गायकवाड, आप्पासाहेब पारधे, जयवंत तांबे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
 
शाहीर शिर्के व सहकाऱ्यांनी शाहिरी लोककलेचे सादरीकरण केले. महेश पोहनेरकर यांनी प्रास्ताविक करून विवेक विचार मंचाच्या कार्याचा आढावा मांडला. निलेश धायरकर यांनी सूत्रसंचालन केले. सुनील वारे यांनी आभार प्रदर्शन करत स्वतः रचलेली 'जय भीम' कविता केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांना सादर केली.
 
डॉ. शरणकुमार लिंबाळे ( ज्येष्ठ साहित्यिक)
 
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कोणत्याही एका समाजापुरते मर्यादित नसून संपूर्ण समाजासाठी मार्गदर्शक आहेत. समता, बंधुता आणि संवाद या मूल्यांवर समाज उभा राहिला तरच सामाजिक न्यायाची संकल्पना अधिक बळकट होईल. विवेक विचार मंचाने विविध समाजघटकांना एकत्र आणण्याचा केलेला प्रयत्न महत्त्वाचा असून अशा संवादातून व्यापक सामाजिक परिवर्तनाची दिशा निश्चित होऊ शकते.
 
सुनील वारे
(व्यवस्थापकीय संचालक आर्टी)
 
"राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद ही महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करण्यापुरती मर्यादित नसून ते विचार समाजाच्या कृतीत उतरविण्याचे व्यासपीठ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समतेच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी सर्व समाजघटकांनी एकत्रितपणे कार्य करण्याची आवश्यकता आहे."
 
 
 
 




सागर देवरे

सागर देवरे, सामाजिक न्याय प्रतिनिधी, दैनिक मुंबई तरुण भारत.
शिक्षण : बी.ए. एल.एल.बी. (अभ्यासक्रम सुरू).
सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून विविध सामाजिक, शैक्षणिक व अन्य चळवळींवर वृत्तांकनाचा अनुभव.
समुदायाधारित प्रश्नांवर सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन.
सामाजिक न्याय, हिंदू बहुजन समाजाचे प्रश्न व विद्यार्थी चळवळींवर विशेष लेखन.
संबंधित मजकूर