भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे माजी कार्यालयमंत्री मुकुंदराव कुळकर्णी यांची दि. १७ जून रोजी प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्र भाजपमधील, जुन्या कार्यकर्त्यांच्या कर्तबगार पिढीतील आणखी एक त्यागी व समर्पित व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
मुकुंदरावांचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य हे की, ते जनसंघ व भाजप या दोन्ही संघटनांच्या वाटचालीत कार्यरत होते. या दोन्ही संघटनांच्या उभारणीत त्यांचा सहभाग होता. आणीबाणीविरोधातील आंदोलनातही त्यांनी भाग घेतला होता. त्यापूर्वीच्या काळात मुंबई महानगरातील, जनसंघाच्या उभारणीतदेखील ते सक्रिय होते. आपल्या आयुष्यातील किमान ६० वर्षे त्यांनी, जनसंघ-भाजपसाठी निरलसपणे कार्य केले. त्यांपैकी जवळपास ३० वर्षे (सन १९९३ ते २०२२) ते पक्षासाठी, पूर्णवेळ काम करत होते. याकाळात त्यांनी कधीही कोणत्याही प्रकारची उमेदवारी पक्षाकडे मागितली नाही किंवा ‘स्वीकृत सदस्य’ म्हणून नियुक्ती मिळावी, यासाठीसुद्धा त्यांनी कधीच प्रयत्न केला नाही. आपल्या आयुष्याची अनेक मौल्यवान वर्षे पक्षाच्या कार्यासाठी, वाढीसाठी देताना त्या बदल्यात त्यांनी पक्षाकडून कसलीही अपेक्षा बाळगली नाही. सामाजिक, राजकीय कार्य करत असताना, कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न बाळगणार्या दुर्मीळ व्यक्तींपैकीच मुकुंदराव एक होते. भाजपमधील अशा निरलस राजकीय कार्यकर्त्यांच्या मावळत्या पिढीतील बहुधा ते अखेरचेच होते, असेच म्हणावे लागेल.
मुकुंदरावांचे बहुतेक आयुष्य मुंबईतच गेले. १९५८ साली ते मुंबई विद्यापीठातून, विज्ञान पदवीधर (बीएस्सी) होऊन बाहेर पडले. त्याच वर्षी त्यांना ‘प्रीमियर ऑटोमोबाईल’ या, त्याकाळातली ‘फियाट पद्मिनी’ ही प्रतिष्ठित मोटारगाडी बनवणार्या नामवंत कंपनीत नोकरी मिळाली. नाकासमोर चालण्याचा स्वभाव व आपल्यावर सोपवलेले काम प्रामाणिकपणे करत राहण्याच्या वृत्तीमुळे, मुकुंदरावांनी तब्बल ३४ वर्षे ‘प्रीमियर ऑटोमोबाईल’मध्ये सेवा केली. याही काळात ते नोकरीबाहेरच्या वेळात, प्रथम जनसंघाच्या व नंतर भाजपच्या कामात सक्रिय होते. १९९० साली ‘प्रीमियर ऑटोमोबाईल’ने आपल्या कर्मचार्यांसाठी स्वेच्छा निवृत्तीची योजना लागू केली. तिचा फायदा घेऊन, मुकुंदरावांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली व पूर्णवेळ भारतीय जनता पक्षाच्या कामाला वाहून घेण्याचे ठरवले. त्यानंतर जवळजवळ ३० वर्षे त्यांनी, विविध स्तरावर भाजपचे काम केले.
मुकुंदराव स्वभावत: संघटनेचे कार्यकर्ते होते. त्यांना संघटनात्मक कामाची व त्यातही कार्यालयीन कामकाजाची आवड होती. तिला अनुसरूनच त्यांनी, पक्षकार्यासाठी दिलेली ही तीन दशके वेगवेगळ्या स्तरावर पक्षाच्या कार्यालयांची उभारणी करणे व त्यांच्या व्यवस्था बसवणे, या कामात खर्च केली. राजकीय पक्षांमध्ये हे काम बर्याच अंशी उपेक्षित व दुर्लक्षित असते. कारण, या कामात कोणताही झगमगाट नसतो, व्यासपीठावरील मोठेपणा नसतो, नेता म्हणून दिली जाणारी किंवा मिळणारी शान नसते, मिरवण्याची संधी नसते. राजकीय पक्षाचे कार्यालयीन काम करणे, हा सर्वच अर्थाने अदखलपात्र व 'Thankless' काम असते. पण, त्याचवेळेला कार्यालयाचे महत्त्वही मात्र फार असते. ते कामकाज बघणार्या व्यक्तीवर जबाबदार्यांचे ओझेही मोठे असते. त्यामुळे अशा स्वरूपाचे झगमगाट नसलेले, मोठेपणा न मिळणारे, अदखलपात्र; पण जबाबदार्यांचे ओझे लादणारे काम करण्यास राजकीय कार्यकर्ते फारसे तयार नसतात. या पार्श्वभूमीवर मुकुंदरावांनी ज्या निष्ठेने कार्यालयीन कामकाजाला वाहून घेतले व ते काम ज्या पद्धतीने पार पाडले, त्याचे मोल व महत्त्वही फारच मोठे आहे.
मुकुंदराव १९९२ साली पक्षाचे पूर्णवेळ काम करु लागले, तेव्हा ते मुंबई व मुंबईतही अंधेरी भागात सक्रिय होते. त्या जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली होती. त्याकाळात त्यांनी पुढाकार घेऊन विलेपार्लेच्या पूर्व भागात, मुंबई विमानतळापासून अगदी जवळच्या परिसरात अंधेरी जिल्हा भाजपचे, स्वत:चे प्रशस्त कार्यालय उभारले. मुंबई भाजपचे तेव्हाचे अध्यक्ष कै. रामदासजी नायक, रामभाऊ नाईक व अन्य मुंबईकर भाजप नेत्यांच्या मनात, मुकुंदरावांच्या या क्षेत्रातील कौशल्याबद्दल पूर्ण विश्वास तयार झाला होता. त्यातूनच मुंबई महानगर भाजपचे स्वत:चे कार्यालय उभारण्याची जबाबदारीही मुकुंदरावांवर सोपवली गेली. मुंबईच्या दादर पूर्व भागात, रेल्वे स्टेशनपासून अतिशय जवळ ‘कथ्थक भुवन’ नावाच्या एका जुन्या इमारतीत, प्रथम मुंबई जनसंघाचे व नंतर भाजपचे महानगर कार्यालय भाड्याने होते. ती इमारत व भूखंड मिळवून, त्याठिकाणी पक्षाची स्वत:ची इमारत उभारण्याचा निर्णय घेतला गेला. ही जबाबदारीही मुकुंदरावांवरच सोपवण्यात आली. हे काम खूपच किचकट व अडचणींनी भरलेले होते. पण, ते अशय वाटणारे काम कै. रामदासजी नायक व मुकुंदराव कुलकर्णी यांनी पूर्ण केले. आज त्याठिकाणी मुंबई भाजपचे भव्य कार्यालय उभे आहे.
त्यानंतर मुकुंदरावांवर, महाराष्ट्र भाजपच्या कार्यालयप्रमुखाची जबाबदारी सोपवली गेली. तीदेखील त्यांनी उत्तमरीत्या पार पाडली. मुंबईत मंत्रालयाच्या जवळ महाराष्ट्र भाजपने एक कार्यालय मिळवले होते. ते सुरुवातीला अत्यंत सामान्य व लहानच होते. त्या कार्यालयाच्या प्रमुखाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मुकुंदरावांनी हळूहळू कार्यालयाचा विस्तार केला, अनेक सुधारणाही केल्या. कै. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासह मा. नितीन गडकरी व अन्य सर्व प्रदेश नेत्यांचा अतूट विश्वास मुकुंदरावांनी मिळवलेला होता. कै. उत्तमराव पाटील यांच्यासह जनसंघ-भाजपच्या जुन्या पिढीतील नेत्यांशीही त्यांचे चांगले स्नेहसंबंध होते. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून येणार्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांशीसुद्धा, त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
मुकुंदरावांच्या कुटुंबातच रा. स्व. संघाच्या कामाचा वारसा होता. त्यांचे थोरले बंधू अनंतराव कुलकर्णी हे विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेपासूनच, तिच्या कामाशी जोडलेले होते. ‘विहिंप’चे संघटनमंत्री ही जबाबदारी त्यांनी अनेक वर्षे सांभाळली. स्वत: मुकुंदरावदेखील लहानपणापासून संघाचे स्वयंसेवक होते. त्यांच्या एक भगिनी, विवाहानंतर आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थायिक झाल्या होत्या. त्यांचे पती डॉ. फणसळकर भाजपच्या कामाशी जोडलेले होते. ते एकदा जिल्हा परिषदेवर निवडूनदेखील आले होते. त्यांच्या घराशीही माझा घनिष्ठ संबंध होता. २००६ साली मी पुन्हा प्रदेशाच्या कामात आल्यानंतर, पुन्हा मुकुंदरावांशी संबंध वाढला. त्यावेळी माझ्याकडे प्रवक्ता व प्रसिद्धी या जबाबदार्या होत्या. त्यामुळे मुकुंदरावांशी जवळजवळ रोजच संबंध येत असे. त्यांचे बोलणे-वागणे वरकरणी परखड व तुटक वाटणारे असले, तरी स्वभावाने ते प्रेमळ होते. वयोमान व तब्येत यानुसार पक्षाच्या कामातून निवृत्त झाल्यानंतरही, ते अधूनमधून कार्यालयात येत असत. पण, नंतर तब्येतीमुळे त्यांना बाहेर फिरणेही अशय झाले. त्यामुळे त्यांचे कार्यालयात येणेही बंद झाले.
दि. ५ जून १९३५ साली जन्मलेल्या मुकुंदरावांनी, वयाच्या ९१व्या वर्षी, दि. १७ जून २०२६ रोजी कृतार्थ भावनेने या जगाचा निरोप घेतला. आज दादरच्या ‘वसंत स्मृती’मध्ये किंवा नरिमन पॉईंटच्या प्रदेश कार्यालयात पाऊल टाकताना, मुकुंदरावांची आठवण येणे अपरिहार्यच आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सगळे सहभागी आहोत.
- माधव भांडारी