भारतीय सांस्कृतिक वारशाचा गौरव बहुधा त्याच्या प्राचीनतेसाठी आणि समृद्धीसाठी होतो. तरीही, भारतीय संस्कृतीची खरी ताकद केवळ तिच्या भूतकाळातच नसून, वर्तमानात जिवंत राहण्याच्या आणि भविष्यासाठी प्रासंगिक ठरण्याच्या क्षमतेतही आहे. संस्कृती केवळ संग्रहालयांमध्ये जतन केल्यामुळे टिकत नाही; तर तिचा सराव, अभ्यास आणि नूतनीकरणामुळे ती जिवंत राहते. एक कलाकार, संशोधक आणि सांस्कृतिक प्रशासक म्हणून माझ्या प्रवासात माझा ठाम विश्वास राहिला आहे की, भारताच्या प्रयोगात्मक कलांचे सातत्य एका समग्र चौकटीवर अवलंबून आहे, जिला मी ‘साधना’ म्हणते. साधना म्हणजेच शिस्तबद्ध रियाझ, समर्पण आणि उत्कृष्टतेचा ध्यास. याच साधनेवर आधारित पाच स्तंभांचा आराखडा, ‘संगीत नाटक अकादमी’च्या कार्याला दिशा देत आहे.
जिवंत वारशाचे जतन : संस्कृती हा एक जिवंत वारसा आहे. स्मारकांपेक्षा वेगळी कला केवळ सादर केली जाते, तेव्हाच अस्तित्वात असते. त्यामुळे सांस्कृतिक संस्थांची जबाबदारी केवळ जपणुकीपुरतीच मर्यादित नसून, सहभाग आणि सादरीकरणाच्या संधी निर्माण करणे ही़ देखील आहे. संगीत नाटक अकादमी ‘कला दीक्षा’, ‘कला धरोहर’ आणि ‘कला संवाद’ यांसारख्या उपक्रमांतून, थेट ज्ञानप्रसार आणि व्यापक जनसहभागाला प्रोत्साहन देते. ‘छऊ’ आणि ‘कुटियाट्टम’ यांसारख्या पारंपरिक कलांमध्ये विशेष प्रशिक्षण देऊन, तरुण पिढीला पुढील मशालधारी म्हणून तयार केले जात आहे.
गुरू-शिष्य परंपरेतील शिष्यत्व : भारतीय संस्कृतीने हे नेहमीच जाणले आहे की, केवळ माहितीच्या माध्यमातूनच कलात्मक उत्कृष्टता हस्तांतरित होत नाही. त्यासाठी मार्गदर्शन, शिस्त आणि साधनेतील तल्लीनताच आवश्यक असते. गुरू-शिष्य नात्यातून तांत्रिक कौशल्यांसोबतच मूल्ये आणि सौंदर्यशास्त्राचे संक्रमण होते. अकादमी आपल्या प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून अमूर्त सांस्कृतिक वारशाचे रक्षण करताना, पारंपरिक ज्ञान एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे सोपवण्याचे मार्ग अधिक बळकट करत आहे.
शास्त्र आणि प्रयोग यांच्यातील संवाद : भारताच्या कलात्मक इतिहासात शास्त्र (सिद्धांत) आणि प्रयोग (सादरीकरण) यांनी, नेहमीच एकमेकांना पूरक म्हणून कार्य केले आहे. ‘नाट्यशास्त्र’, ‘अभिनय दर्पण’ आणि ‘संगीत रत्नाकर’ यांसारखे अभिजात ग्रंथ, आजही समकालीन कलासाधनेसाठी मार्गदर्शकच ठरतात. अकादमी संशोधन, प्रकाशने आणि दस्तऐवजीकरण प्रकल्पांद्वारे या एकात्मतेला प्रोत्साहन देते. याच जबाबदारीमुळे ‘युनेस्को’च्या अमूर्त सांस्कृतिक वारसाविषयक करारांतर्गत, ‘संगीत नाटक अकादमी’ला भारताचे ‘समन्वय केंद्र’ घोषित करण्यात आले आहे.
वारसा-आधारित नवनिर्मिती : सर्वांत अर्थपूर्ण नवनिर्मिती ही परंपरेच्या सखोल आकलनातूनच उदयास येते. सांस्कृतिक मुळांपासून विलग झालेली नवनिर्मिती वरवरची ठरते, तर नूतनीकरणास नकार देणारी परंपरा स्थिरावण्याचा धोका असतो. सातत्य आणि सर्जनशीलता यांच्यात संतुलन साधणे, हेच आपल्यापुढील मुख्य कार्य आहे. अकादमी पुरस्कार आणि शिष्यवृत्तींच्या माध्यमातून, नवनवीन प्रयोग आणि समकालीन अर्थलावणीला प्रोत्साहन देऊनच हा समतोल साधत आहे.
राष्ट्रीय ओळख आणि ‘सॉफ्ट पॉवर’ म्हणून कला : वाढत्या जागतिकीकरणाच्या युगात, संस्कृती ‘सॉफ्ट पॉवर’चे सर्वांत प्रभावी साधन झाली आहे. ऑक्टोबर २०२४ मधील ‘भारतीय नृत्यावरील आंतरराष्ट्रीय परिसंवाद’ आणि जानेवारी २०२५ मध्ये, कर्तव्य पथ येथील ‘जयति जय मम भारतम्’ हा सोहळा याचे उत्तम उदाहरण ठरावे. पाच हजारहून अधिक लोक आणि आदिवासी कलाकारांनी सादर केलेल्या या नृत्याविष्काराची नोंद, ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये झाली. तसेच मार्च २०२६ मध्ये रशियन नॅशनल बॅले ‘कोस्त्रोमा’च्या सहकार्याने आयोजित, ‘द ग्लोबल डान्स ओव्हरचर’ या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाने जागतिक स्तरावर सांस्कृतिक सलोख्याची भावनाही सुंदरपणे प्रतिबिंबित केली.
साधना आराखडा हा अंतिमतः सामूहिक जबाबदारीचे आवाहन आहे. सांस्कृतिक जतन केवळ संस्थांद्वारे होऊच शकत नाही; त्यात कलाकार, शिक्षक, संशोधक आणि प्रेक्षक या सर्वांचा सहभाग आवश्यक असतो. चिरस्थायी परंपरांमध्ये रुजलेली राहूनही, भारतीय संस्कृती सदैव विकसित होत राहिली आहे. ‘साधना’ आराखड्यातील तत्त्वांचा स्वीकार करून, आपण आपला हा अमूल्य वारसा येणार्या पिढ्यांसाठी अधिक चैतन्यमय आणि समृद्ध करू शकतो. थोडक्यात, सांस्कृतिक उत्कृष्टतेचा निरंतर आणि सामूहिक ध्यास, हीच साधनेची खरी भावना आहे.
- डॉ. संध्या पुरेचा